सेव्हीन्ये, मादाम द : (५ फेब्रुवारी १६२६ – १७ एप्रिल १६९६). फ्रेंच लेखिका. संपूर्ण नाव मार्क्विस दे मारी द राब्यूतँ-शांताल. जन्म पॅरिस शहरी एका बर्गंडियन सरदार घराण्यात. वयाच्या सहाव्या वर्षी ती अनाथ झाली. त्यानंतर तिचा सांभाळ तिच्या काकाने केला. चांगल्या शिक्षकांकडून उत्तम शिक्षण तिला मिळालेले होते. १६४४ मध्ये तिचा विवाह आंरी द सेव्हीन्ये ह्या सरदार घराण्यातील व्यक्तीशी झाला. १६५१ मध्ये एका द्वंद्वयुध्दात तिचा हा पती मारला गेला.
त्याच्यापासून तिला दोन मुले झाली होती. त्यांपैकी फ्रांस्वाझ मार्गरीत ह्या कन्येचा विवाह प्रॉव्हांसचा लेफ्टनंट जनरल काँत द ग्रिग्नन ह्याच्याशी झाला आणि ती तेथे निघून गेली. त्यानंतर मादाम सेव्हीन्येला असह्य एकाकीपण जाणवू लागले. त्यापासून काही दिलासा मिळावा म्हणून तिने आपल्या मुलीला पत्रे लिहावयास आरंभ केला. अशी १७०० पत्रे तिने लिहिली. ह्या पत्रलेखनामागे कोणतीही वाङ्मयीन आकांक्षा नव्हती पण उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या त्या पत्रांतून तिच्यात लपलेली एक लेखिका सहजपणे प्रकट झाली. तिच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील घटना, तिला भेटलेल्या व्यक्ती, तिच्या भोवतालच्या उच्चभ्रू फ्रेंच समाजात घडत असलेल्या घटना ह्यांचा तसेच तत्कालीन विषयांवरील व घटनांवरील तिचे भाष्य त्या पत्रांत आढळून येते. हे सर्व सांगण्याची तिची शैली, तिच्यातील संभाषणात्मक सूर तिच्या पत्रातील आशय विलक्षण जिवंतपणाने पुढे आणतो. त्यामुळेच ही पत्रे अविस्मरणीय ठरली.
ग्रिग्नन येथे ती निधन पावली.
संदर्भ : https://www.britannica.com/biography/Marie-de-Rabutin-Chantal-marquise-de-Sevigne