सोया, कार्ल : (३० ऑक्टोबर १८९६-१० नोव्हेंबर १९८३). डॅनिश नाटककार आणि कथा-कादंबरीकार. जन्म कोपनहेगन येथे. त्याचे वडील सी. एम्. सोया येनसेन हे प्रसिद्ध चित्रकार होते. १९१५ मध्ये तो मॅट्रिक झाला. सोयाने कथा-कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्याने डॅनिश साहित्याला दिलेले योगदान, मुख्यतः नाटककार म्हणून आहे.
द पॅरासाइट्स (इं. शी.) हे त्याचे पहिले महत्त्वपूर्ण नाटक त्याने १९२६ मध्ये लिहिले. दुसऱ्याच्या जिवावर जगणारी बांडगुळी वृत्तीची माणसे ह्या नाटकात त्याच्या टीकेचे लक्ष्य झालेली आहेत. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या नाटकांत (सर्व इं. शी.) द न्यू प्ले ऑफ एव्हरिमन (१९३८), माय टॉप हॅट (१९३९), ब्लाइंड मॅन्स बफ हे नाट्यचतुष्ट्य (१९४०-४८) ह्यांचा समावेश होतो. द न्यू प्ले ऑफ एव्हरिमन ह्या नाटकात अप्रामाणिक वर्तणुकीच्या एका आरोपीला दोषमुक्त करताना विज्ञान आणि धर्म ह्यांच्या अपयशावर सर्व खापर फोडलेले आहे. माय टॉप हॅट मध्ये दाखवलेला प्राध्यापक स्पोया हा उदासवाणे जीवन जगणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात परिवर्तन घडवून आणून त्यांना त्यांची स्वप्ने वास्तवात अनुभवू देतो. ब्लाइंड मॅन्स बफ ह्या नाट्यचतुष्ट्यात (सर्व इं. शी.) फ्रॅगमेंट्स ऑफ अ पॅटर्न (१९४०), टू थ्रेड्स (१९४३), थर्टी यीअसर्र् रिप्रिव्ह (१९४४) आणि फ्री चॉइस (१९४८) ह्यांचा समावेश होतो. ह्या चार नाट्यकृतींपैकी पहिल्या तीन शोकात्मिका आहेत, तर अखेरची नाट्यकृती उपरोधप्रधान आहे. प्राचीन ग्रीक नाटकांच्या धर्तीवर केलेल्या ह्या नाट्यचतुष्ट्यात, शोकात्मिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला काही दिलासा मिळावा म्हणून एक उपरोधप्रधान नाटक अंतर्भूत केलेले आहे. ह्या चतुष्ट्यातील प्रत्येक नाटक स्वतंत्र आहे पण त्यांच्यात एक विषय समान आहे आणि तो म्हणजे यदृच्छेने घडणाऱ्या घटनांचा जीवनावर पडणारा प्रभाव.
सोयाच्या उत्तरकालीन नाटकांत (सर्व इं. शी.) आफ्टर (१९४७) आणि लायन विथ कॉर्सेट (१९५०) ह्या नाटकांचा समावेश होतो. युद्धोत्तर काळातील डेन्मार्कचे चित्र आफ्टरमध्ये आहे, तर लायन विथ कॉर्सेट मध्ये युद्धविरोधी भूमिका मांडलेली आहे. सर्वमान्य कल्पनांना उलटेपालटे करून प्रेक्षकांना धक्का देणे हे त्याच्या नाटकांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. फॅ्रगमेंट्स ऑफ अ पॅटर्न आणि आफ्टर ह्या त्याच्या नाटकांवर चित्रपट निघाले.
Min Farmors Hus (१९४३, इं. भा. ग्रँडमदर्स हाउस, १९६६) आणि सेव्हन्टीन (१९५३-५४, इं. शी.) ह्या त्याच्या कादंबऱ्या उत्कृष्ट गणल्या गेल्या आहेत.
रूकबिंग (डेन्मार्क) येथे त्याचे निधन झाले.
पहा : डॅनिश साहित्य.
संदर्भ : https://www.britannica.com/biography/C-E-Soya