लोकवस्ती नसते किंवा असलेली लोकवस्ती उठून गेलेली असते अशा शुष्क, रुक्ष, निर्जल व निर्जन प्रदेशाला ओसाड प्रदेश असे म्हणतात. सामान्यत: जगातील वाळवंटी प्रदेश, बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश, समुद्रापासून दूरवर असलेले रुक्ष प्रदेश यांचा समावेश ओसाड प्रदेशात केला जातो; परंतु डोंगराळ व अरण्यमय प्रदेश जरी ते निर्जन असले तरी त्यांचा ओसाड प्रदेशात समावेश केला जात नाही. उच्च तापमान, अति कमी वर्षण, पाण्याचा अभाव, बाष्पीभवनाचा वेग जास्त, विषम व शुष्क हवामान, वर्षातील बहुतांश काळ सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता शून्याच्या जवळपास, दैनिक आणि ऋतुनुसार तापमानकक्षा जास्त ही ओसाड प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. शुष्क हवामान व पाण्याच्या तीव्र दुर्भिक्षामुळे तेथे वनस्पती व प्राणिजीवनाच्या वाढीत आणि विकासात अडथळे येतात. त्यामुळे तेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते किंवा नसते, तसेच मनुष्यवस्तीही नसते किंवा अतिशय विरळ असते. जीवनोपयोगी साधनांच्या अभावामुळे हे प्रदेश निर्जन बनले आहेत.
ओसाड प्रदेशाचे ढोळबमानाने उष्ण ओसाड व थंड ओसाड प्रदेश असे दोन प्रकार पडतात. ओसाड प्रदेशाच्या निर्देशांकानुसार (Aridity Index) ओसाड प्रदेशाचे (१) अति-ओसाड, (२) ओसाड, (३) निम-ओसाड आणि (४) शुष्क उपआर्द्र प्रदेश असे चार प्रकार पडतात. एखाद्या प्रदेशातील ओसाड प्रदेशाच्या वितरणाला तेथील वातावरणातील सर्वसाधारण अभिसरण कारणीभूत ठरते. प्रामुख्याने दीर्घकालीन हवामान बदलामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. उदा., नाईल नदीच्या खोर्यात पुढील ३० ते ४० वर्षांत तापमान जरी १.५ ते २.१ टक्क्याने वाढले तरी तेथील निम-ओसाड प्रदेशाचे रूपांतर ओसाड प्रदेशात होईल. परिणामत: कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होईल. त्याशिवाय भूमि-उपयोजनातील बदलामुळे जमिनीत पाण्याची अधिक गरज निर्माण होऊन तेथे ओसाड प्रदेशाचे प्रमाण वाढत जाईल. उष्ण ओसाड किंवा वाळवंटी प्रदेश निर्माण होण्यामागे त्या प्रदेशातील विदारणही कारणीभूत ठरते.
पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणात निर्माण होणारे अक्षवृत्तीय कमी-जास्त भार-पट्टे व त्यांना अनुसरून नियमित वाहणारे ग्रहीय वारे यांमुळे दोन्ही गोलार्धांत साधारणपणे २०° ते ३०° अक्षवृत्तांच्या दरम्यान म्हणजेच कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान, खंडांच्या पश्चिम भागांत कोरडी वाळवंटे किंवा उष्ण ओसाड प्रदेश आढळतात. कर्क व मकरवृत्तांच्या दरम्यान असलेल्या वातावरणाच्या जास्त भाराच्या पट्ट्यांमुळे या प्रदेशांत वृष्टीचा अभाव असतो. जगातील काही मोठी वाळवंटे कर्क व मकरवृत्तांच्या जास्त भाराच्या पट्ट्यातच आढळतात. आफ्रिकेच्या उत्तर भागातील सहारा आणि दक्षिण भागातील कालाहारी व नामिब वाळवंटे, दक्षिण अमेरिकेतील अटाकामा वाळवंट, पश्चिम आशियातील अरेबियन व इतर वाळवंटी प्रदेश, पश्चिम ऑस्ट्रेलियातील ग्रेट ऑस्ट्रेलियन वाळवंटी प्रदेश हे जगातील प्रमुख ओसाड किंवा उष्ण वाळवंटी प्रदेश आहेत. कमी पर्जन्य हा पृथ्वीवरील सर्वच वाळवंटांत किंवा ओसाड प्रदेशांत आढळणारा सामान्य घटक असला, तरी प्राकृतिक आणि भूविज्ञानाच्या दृष्टीने त्यांच्यात बरीच भिन्नता आढळते त्यांच्या निर्मितीचा काळ वेगवेगळा आहे. काही वाळवंटे लक्षावधी वर्षांपूर्वीच निर्माण झालेली आहेत.
उंच पर्वतश्रेण्या ओलांडून खाली उतरू लागणार्या बाष्पयुक्त वाऱ्यामधील बाष्पाचे प्रमाण कमी होऊन पर्वतांच्या वातविमुख बाजूकडील पर्जनछायेच्या प्रदेशांत शुष्क प्रदेशांची निर्मिती झालेली आढळते. उदा., भारतात दख्खनच्या पठारावरील पर्जन्यछायेचा प्रदेश, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्वेस विशिष्ट अंतरावर उत्तर-दक्षिण विस्तारलेला पर्जन्यछायेचा शुष्क किंवा निम-शुष्क प्रदेश आढळतो.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावरील खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे तसेच जलसिंचनाच्या सुविधा व पाण्याच्या उपलब्धतेमुळे अनेक ओसाड प्रदेशांत मनुष्यवस्ती बरीच वाढली आहे.
थंड ओसाड प्रदेशात उत्तर अमेरिका खंडातील व यूरेशियातील उत्तरेकडील अति थंड हवामान व सतत बर्फाच्छादित असणारा सलग पट्ट्याचा तसेच अंटार्क्टिका खंडाचा समावेश होतो. या ओसाड प्रदेशात वनस्पतींची वाढ होणे अवघड ठरते. तेथे केवळ शेवाळे, दगडफूल, लव्हाळा व काही जातीचे गवत या वनस्पती आढळतात. या प्रदेशाला ‘टंड्रा’ म्हणून ओळखले जाते. याच्या उत्तरेकडील भागात, तर वनस्पती अजिबातच आढळत नाहीत. या ओसाड प्रदेशाला ‘वाळवंटी टंड्रा’ किंवा ‘थंड वाळवंट’ असे म्हटले जाते. ग्रीनलंडसारख्या वनस्पतिरहित व विस्तृत हिमाच्छादित प्रदेशाला काही वेळा ‘हिम वाळवंट’ म्हणूनही संबोधले जाते. वर्षातील बहुतांश काळ येथील पाणी हिमस्वरूपातच आढळते. त्यामुळे वनस्पतींना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. अंटार्क्टिका हे सर्वाधिक शुष्क किंवा ओसाड खंड आहे.
समीक्षक : अ. ना. ठाकूर