दांताँ, झॉर्झ झाक :  (२६ ऑक्टोबर १७५९–५ एप्रिल १७९४). फ्रेंच राज्यक्रांतीतील एक प्रभावी वक्ता व मुत्सद्दी. त्याचा जन्म आर्सीस्यूरोब ऑबे (शँपेन) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील झाक एक सामान्य वकील होते. त्यांच्या मारी मादलेन काम्यू या दुसऱ्या पत्नीचा झॉर्झ हा मुलगा. रीम्‌झ या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन (१७८५) तो नोकरीसाठी पॅरिस येथे आला आणि अल्पावधीतच त्याने अर्थसंचय करून अधिवक्त्याचे कार्यालय विकत घेतले. हळूहळू तो फ्रेंच राज्यक्रांतीत सहभागी झाला. त्याने आंत्वानेत शारपांत्ये या मुलीशी विवाह केला.

१७८९ मध्ये प्रत्यक्ष क्रांतीस सुरुवात होताच कॉर्दल्येच्या नागरी फौजेत तो सामील झाला आणि लवकरच जिल्ह्याचा अध्यक्ष झाला. त्याने कॉर्दल्ये क्लब या राजकीय संस्थेची स्थापना केली. यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. त्याची पॅरिस येथे विभागशासक म्हणून निवड झाली (१७९१). या वेळी जॅकबिन्झ आणि जिराँदिस्त या दुसऱ्या दोन राजकीय संस्थाही फ्रान्समध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या खटपटीत होत्या. संविधानात्मक राजेशाही नष्ट करण्यात व १७९२ मध्ये झालेल्या राजघराण्यातील व्यक्ती व सरदार यांच्या कत्तलीस (सप्टेंबर कत्तल) त्याला इच्छा असूनही विरोध करता आला नाही, म्हणून लोकमतासाठी त्याने संमती दर्शविली. यानंतर फ्रान्सवर ऑस्ट्रिया व प्रशिया यांनी स्वारी केली, त्यावेळी त्याने जे भाषण केले ते संस्मरणीय ठरले. त्याचे म्हणणे असे होते की, क्रांतिकारकांनी प्रथम फ्रान्सच्या नैसर्गिक सीमा ठरवून राष्ट्राची उभारणी करावी. साहजिकच क्रांतीनंतरच्या हंगामी सरकारात त्याची मंत्री म्हणून निवड झाली आणि कार्यकारी समितीचा तो सर्वाधिकारी झाला. सु. एक वर्ष दांताँ हा जवळजवळ हुकूमशाह होता. १७९३ मध्ये त्याची संरक्षण समिती आणि क्रांतिकारी लवाद यांचा अध्यक्ष म्हणून निवड झाली; पण त्याच वर्षी झाक रने एबेअरचे वर्चस्व कॉर्दल्ये क्लबमध्ये वाढले. अंतर्गत कलह कमी करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. लोक जॅकबिन्झकडे नव्या नेतृत्वासाठी आशेने पाहू लागले. या वेळी रोब्‌झपीअर व त्याचे अनुयायी यांचे महत्त्व वाढले होते. यामुळे १० जुलै १७९३ रोजी त्याची फेरनिवड झाली नाही. क्रांतीची सर्व सूत्रे ओघानेच रोब्‌झपीअरच्या हातात गेली. दांताँने राजकारणातून निवृत्त होण्याचा मार्गही हाताळून पाहिला; पण मित्रांच्या आग्रहाने तो पुन्हा राजकारणात खेचला गेला. रोब्‌झपीअरने प्रथम एबेअरच्या अनुभागांचे खच्चीकरण केले आणि रोब्‌झपीअरच्या धोरणास दांताँ पाठिंबा देऊनही अखेर रोब्‌झपीअरने त्याच्या अनुयायांसह त्याला पकडले आणि पॅरिस येथे फाशी दिले.

दांताँच्या चरित्र आणि चारित्र्य यांबद्दल मतभेद आहेत. काहींच्या मते तो एक संधिसाधू राजकारणी होता आणि धनसंचयासाठी त्याने खऱ्याखोट्याची कधीही तमा बाळगली नाही, तर इतर त्यास निष्ठावान देशभक्त मानतात. कसेही असले, तरी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काही वर्षे तो फ्रान्सचा अनभिषिक्त राजा होता.

संदर्भ :

  • Christophe, Robert, Trans. Danton: A Biography, New York, 1967.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.