मारी आंत्वानेत : (२ नोव्हेंबर १७५५ — १६ ऑक्टोबर १७९३). फ्रान्सची फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळची प्रसिद्ध राणी आणि सोळाव्या लूईची पत्नी. तिचे पूर्ण नाव जोझेफ झान मारी आंत्वानेत. पवित्र रोमन सम्राट ऑस्ट्रियाचा राजा पहिला फ्रान्सिस व राणी माराया टेरिसा यांची अत्यंत देखणी अकरावी मुलगी. तिचा जन्म व्हिएन्ना येथे झाला.

लूई फ्रान्सचा युवराज असतानाच तिचा त्याच्याशी विवाह झाला (१७७०). चैनी व उधळ्या स्वभावाच्या या ऑस्ट्रियन छानछोकी स्त्रीबद्दल फ्रेंचांना प्रथमपासूनच तिटकारा होता. लग्‍नानंतर राजा झाल्यावर लूई तिच्या तंत्राने वागत होता. लहानपणापासून बेफिकीर वृत्ती व राजकीय चालीरीतीचे अज्ञान यांमुळे लईच्या सरदारांशी तिचे फारसे पटत नसे आणि त्यामुळे साहजिकच तिला प्रथमपासून अनेक अंतर्गत शत्रू निर्माण झाले. सोळावा लूई १७७४ मध्ये तिच्या खर्चिक राहणीमानात वाढ झाली आणि सामान्य लोकांचा तिरस्कार करू लागली; प्रजेची तिला काडीमात्र पर्वा नव्हती. तिने आन रॉबेअर झाक त्यूर्गो, झाक नेकेर यांसारख्या लायक अर्थमंत्र्यांना बाजूला सारून आपल्या मर्जीतल्या लोकांना उच्‍चपदी नेमले. फ्रान्सच्या गौरवचिन्हांचा तिने आदर केला नाही. फ्रेंच लोकमताची दिशा ती ओळखू शकली नाही. हिऱ्याच्या हाराच्या प्रकरणाने तिची आणखी नालस्ती झाली. स्टेट्‌स जनरल या प्रातिनिधिक सभेच्या अधिवेशनास (१७८९) तिचा सक्त विरोध होता. क्रांतीच्या काळात तूलरीझच्या राडवाड्यात तिला जवळजवळ नजरकैदेतच राहावे लागले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या ऐन धुमश्चक्रित तिच्या सांगण्यावरून लुईने तूलरीज राजवाड्यामधून १० जून १७९१ व १० ऑगस्ट १७९२ असा दोनदा कुटुंबासह परदेशी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परराष्ट्रीय सरकारशी विशेषतः ऑस्ट्रियाशी व परदेशात पळून गेलेल्या सरदारांशी गुप्त संधान बांधण्यात तिचा प्रमुख भाग होता. तिने क्रांतिकारकांविरुद्ध ऑस्ट्रियाची मदत मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे क्रांतिकारकांच्या मनात राजापेक्षा तिच्याबद्दल अधिक चीड उत्पन्न झाली. यामुळे जनता खवळली आणि साहजिकच एका मंदिरात मारी, तिची मुले आणि राजा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले (१७९३). त्यानंतर गुन्हेगार म्हणून क्रांतिकारकांच्या कोर्टापुढे तिला उभे करण्यात आले.

१६ ऑक्टोबर १७९३ मध्ये क्रांतिकारकांच्या न्यायालयाने राजद्रोहाचा आरोप ठेवून तिचा शिरच्छेद (गिलॉटीनवर चढविले) केला. तिचे सौंदर्य, उच्छृंखलपणा, चारित्र्य, उधळेपणा आणि धैर्य यांविषयी अनेक वदंता असून नंतरच्या काळात त्यावर विपुल लेखन झाले.

संदर्भ :

  • Kenyon, Frank Wilson, Marie Antoinette, London, 1971.
  •  Mayer, D. M. Marie Antoinette : The Tragic Queen, New York, 1969.