मानव आणि परिसंस्था (पर्यावरण) यांमधील जटिल संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. भूमी, हवामान, वनस्पती आणि सभोवतालच्या इतर सजीव-निर्जीव घटकांबरोबर मानवाचा सतत संपर्क असतो. याचा परस्पर परिणाम पर्यावरणाच्या विविध घटकांवर आणि त्याबरोबरच मानवांवरसुद्धा होतो. पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या मानवसमाज आणि संस्कृती यांचे भौतिकवादी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न परिसंस्थीय मानवशास्त्र करते, असे सेमर-स्मिथ म्हणतात.
परिसंस्थीय मानवशास्त्रात अनेक मुलभूत मुद्दे आहेत. प्रत्येक समाज हा विस्तीर्ण वातावरणात स्थापन झालेल्या संस्कृतीशी एकरूप असतो. प्राणीमात्रांच्या अथवा सजीवांच्या सभोवतालच्या वातावरणाला त्यांचे ‘निवासस्थान’ म्हणतात आणि त्या वातावरणातील विशिष्ट ठिकाणाला त्यांचे ‘स्थान’ संबोधतात. कोणताही समाज तंत्रज्ञानाचा उपयोग करून झाडे, प्राणी, हवामान व खनिजे तसेच अन्न, वस्त्र आणि निवारा याचबरोबर इतर वस्तू निसर्गातून मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय अनेकदा लोक त्यांच्या संस्कृती आणि परिस्थितीशी संबंधित इतर सामाजिक, सांस्कृतिक असे पर्यावरण पूरक आणि प्रेरक वातावरण निर्माण करत असतात.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवशास्त्रज्ञ ब्रॉनीस्लॉ कास्पेर मॅलीनोस्की, ॲल्फ्रेड रेजिनल्ड रॅडक्लिफ-ब्राऊन आणि फ्रँट्स बोॲस यांनी आपल्या अभ्यासातून मानवाचा पर्यावरणाशी असलेला संबंध दार्शविला आहे. पैकी बोॲस व मॅलिनोस्की यांनी पर्यावरणीय निश्चिततेचा अभ्यास केला. काही मानवशास्त्रज्ञांनी पर्यावरणीय निश्चितीचे स्पष्टीकरण देण्यासाठी डार्विन यांच्या सिद्धांताचा आधार घेतला. सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि मानवी तंत्रज्ञान यांच्यात परस्पर संबंध जोडले गेले आहेत, असे मिल्टन यांनी मत मांडले. ज्युलियन स्टीव्हर्ड यांनी ‘सांस्कृतिक परिस्थितिविज्ञान’ हा शब्द वापरला आणि समान वातावरणास अनुकूल प्रतिसाद शोधले. त्यामुळे सांस्कृतिक समानता वाढविण्यास मदत झाली. स्टीव्हर्ड यांचा सिद्धांत एका संस्कृतीच्या भोवती केंद्रित होता. परिसंस्था आणि संस्कृतीचा यांचा सखोल अभ्यास वेगवेगळ्या मानवशास्त्रज्ञानी केला आहे. पर्यावरणीय अनुकुलतेच्या दृष्टीने काही धार्मिक प्रथासुद्धा परिसंस्था मानवशास्त्रामध्ये स्पष्ट केल्या गेल्या आहेत. हॅरिस यांच्या मते, ‘भारतातील हिंदू धर्मामध्ये गायींना पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत होती. त्यांच्यासाठी अन्नधान्य पुरेसे पिकत नव्हते. गायी-गुरांनाही चारा उपलब्ध होत नव्हता. अशा वेळी असलेला चारा गायी-गुरांसाठी वापरून गायींचे दुध माणसासाठी उपलब्ध करणे, ही गरज झाली. त्यामुळे गायी-गुरांच्या मांसावर बंदी घालून यांच्या दुधाचा मानवाने आहारात समावेश केला; तर दुसरीकडे धान्य उत्पादनासाठी, नांगरण्यासाठी बैलांचा वापर करून धान्य उत्पादन वाढविले. शेती, गुरेपालन आणि पर्यावरणाचा समतोल या तिन्हीची सांगड घालण्यासाठी गायी–गुरांना शेतकऱ्यांनी धार्मिक अधिष्ठान दिले, असा सिद्धांत हॅरिस यांनी मांडून पर्यावरणीय संबंध दर्शविला आहे. ते पुढे म्हणतात की, वेगवेगळ्या प्रदेशात गायीचे मांस खाणे हे निषिद्ध नाही; परंतु भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांनी गायीचा उपयोग हा वेगळ्या प्रकारे करून घेतला. हॅरिस यांनी जनावरांची निरूपयोगिता आणि आर्थिक स्थान यांवर युक्तिवाद करून ‘सांस्कृतिक भौतिकवादाचे’ उदाहरण दिले आहे.
जागतिक पर्यावरणीय समस्यांमध्ये परीसंस्थीय मानवशास्त्रज्ञ आपल्या अभ्यासाद्वारे शाश्वत विकासांवर योगदान देतात. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून सांकृतिक आणि धार्मिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. परीसंस्थेचे जतन होण्यासाठी धार्मिक निषिद्ध बाबींवर परिसंस्थीय मानवशास्त्राद्वारे प्रकाशझोत टाकला जातो.
संदर्भ :
- Barfield, Thomas, The Dictionary of Anthropology, 1997.
- H. J. Bire, Encyclopedia of anthropology, London, 2006.
समीक्षक : शौनक कुलकर्णी