विल्श्टॅट्टर, रिखार्ड मार्टीन
(३ ऑगस्ट, १८७२ – ३ ऑगस्ट, १९४२)
रिखार्ड यांचे शिक्षण न्यूरेंबर्ग तांत्रिक शाळेत पूर्ण झाल्यावर त्यांनी म्यूनिक (Munich) विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात अॅडोल्फ व्हॉन बेयर (Adolph von Baeyer) यांच्या मार्गदर्शनाखाली कोकेनच्या रासायनिक रचनेसंबधात संशोधन केले. याच विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली (१८९४). पुढे वनस्पतींमधील अल्कोलॉईडस् या विषयावर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे आणि अध्यापन कौशल्यामुळे प्राध्यापक म्हणून ते नावाजले गेले.
रिखार्ड १९०५ मध्ये म्यूनिक विद्यापीठातून झुरीक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून रुजू झाले. येथे त्यांनी वनस्पतीमधील हरितरंगद्रव्य या विषयावर काम करण्यास सुरुवात केली आणि या हरितद्रव्याच्या संरचनेचे सूत्र त्यांनी शोधले. संशोधन कामाचे समाधान आणि आनंद त्यांना याच काळात मिळाला. म्हणून हा काळ रिखार्ड यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. बर्लिन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि कैसेर विल्हेल्म इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले (१९१२-१९१६).
रिखार्ड यांच्या आयुष्यातील मोठे यश म्हणजे त्यांना मिळालेला नोबल पुरस्कार (१९१५). हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला निसर्गात पहायला मिळतात. या प्रत्येक रंगछटांमधील हरितरंगद्रव्याची संरचना एकाच प्रकारची आहे असे शास्त्रज्ञांचे मत होते. रिखार्ड यांनी सुकलेल्या शंभरएक पानांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळून आले की वनस्पतींमध्ये प्रामुख़्याने दोन प्रकारची हरितद्रव्ये असतात. नील-हरित किंवा ए प्रकारचे रंगद्रव्य आणि पिवळसर हिरव्या रंगाचे बी प्रकारचे हरितद्रव्य. हरितद्रव्यातील रंगद्रव्याची रचना वलयाकृती असून मध्यभागी मॅग्नेशियम या मूलद्रव्याचा अणू असतो. वनस्पतींमधील हरितद्रव्यांची रचना या त्यांच्या संशोधनाला नोबेल पुरस्कार देण्यात आला.
रिखार्ड यांनी रक्तपेशीमधील हिमोग्लोबीन आणि वनस्पतीच्या हरितद्रव्यांमध्ये एक साम्य असते हे सिद्ध केले. ज्याप्रमाणे हरितद्रव्याच्या संरचनेत केंद्रस्थानी मॅग्नेशियमचा अणू असतो त्याप्रमाणेच हिमोग्लोबीनमध्ये लोह हे मूलद्रव्य केंद्रस्थानी असते.
म्यूनिक विद्यापीठात संशोधन करत असताना त्यांनी वितंचकात होणा-या अभिक्रियांमधील कार्यपद्धती उलगडून दाखवली. त्यावरून वितंचके ही जैविक घटक नसून रासायनिक द्रव्ये आहेत हे दाखवून दिले. तसेच त्यांनी प्रकाशसंश्लेषण क्रियेविषयी सुद्धा संशोधन केले. निसर्गातील वितंचके प्रथिने नसतात हा रिखार्ड यांचा विचार १९३० पर्यंत प्रभावी होता.
#कळीचे शब्द – वितंचकात होणा-या अभिक्रिया, हरितद्रव्यातील रंगद्रव्ये, वलयाकृती रचना, मॅग्नेशियम मूलद्रव्याचा अणू , वनस्पतींमधील हरितद्रव्यांची रचना
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1915/willstatter-bio.html
- http://www.chemistryexplained.com/Va-Z/Willst-tter-Richard-Martin.html
समीक्षक : मनोहर, श्रीराम