एश्चेरीश, थिओडोर 

(२९ नोव्हेंबर, १८५७ – १५ फेब्रुवारी,  १९११)

थिओडोर एश्चेरीश यांचा जन्म जर्मनीतल्या आंसबाख येथे झाला. त्यांचे वडील फर्डिनांड एश्चेरीश हे आरोग्य विभागात जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच उत्तम वैद्यकीय सांख्यिकीतज्ञ म्हणून ते सर्वांना परिचित होते.

थिओडोर यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सहा महिने स्ट्रासबर्ग, ऑस्ट्रिया येथे सैन्यात नोकरी केल्यानंतर एश्चेरीश यांनी वुर्झबर्ग येथे वैद्यकीय अभ्यास सुरु केला. त्यापुढील वैद्यकीय शिक्षण त्यांनी स्ट्रासबर्ग, ऑस्ट्रिया, बर्लिन,  म्यूनिक आणि किएल येथील केंद्रांवर पूर्ण केला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे सहा महिने सैन्याच्या म्यूनिक येथील गॅरीसन इस्पितळात काम केल्यानंतर वुर्झबर्ग येथील ज्युलिया हॉस्पिटल (Julia Hospital) मधील प्रौढांच्या (Internist) औषधी विभागातील प्राध्यापक कार्ल सी. ए. जे. गेरहार्ट ( Karl C.A.J. Gerhardt) यांचे सहाय्यक म्हणून रुजू झाले.

जरी गेरहार्ट हे प्रौढांच्या आजारांचे तज्ञ होते तरी त्यांना बालरोगशास्त्रात विशेष रुची होती. गेरहार्ट यांच्या प्रभावामुळे एश्चेरीश यांना देखील बालरोगशास्त्रामध्ये रुची निर्माण झाली आणि त्यांनी गेरहार्टच्या मार्गदर्शनाखाली एक प्रबंध लिहिला, शीर्षक होते, मरानटीक थ्रोमोसिनुसिटीस इन कॉलरा इन्फन्टम (‘Marantic Thromosinusitis in Cholera Infantum’). हे एश्चेरीश यांचे पहिले लेखन होते. त्यानंतर एश्चेरिच यांचे सहा लेख प्रकाशित झाले.

एश्चेरिच यांच्या बालरोगशास्त्राच्या आवडीला प्रोत्साहन देण्यासाठी गेरहार्ट यांनी नेपल्स, इटली येथील कॉलराच्या साथीच्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड केली. या अभ्यासादरम्यान एश्चेरीश यांनी लवकरच जीवाणूशास्त्रातील संशोधनपद्धती अवगत करून घेतल्या आणि रुग्णांच्या नमुन्यामधील व्हिब्रिओ कॉलरी (Vibrio cholerae) चे निरीक्षण ते करू लागले.

म्यूनिकला परत आल्यानंतर एश्चेरीश यांनी त्यांचे संशोधन पुढील तीन विषयांवर केंद्रित केले : १) अर्भकाच्या आतड्यामध्ये  नैसर्गिकरित्या उपस्थित असलेल्या जीवाणूंचा अभ्यास; २) त्यात होणारे बदल, अन्नपचन क्रियेमध्ये या जीवाणूंचे कार्य आणि ३) या सर्वांचा आजारी अर्भकांमधील परिस्थितीशी असलेला संबंध.

एश्चेरीश यांनी जीवाणू शुद्धीकरण, विलगीकरण व जीवाणूंचा गुणधर्मीय अभ्यास याबाबत प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण घेतले. एश्चेरीश यांनी हे सिद्ध करून दाखवले की मिकोनियम (Meconium,  नवजात बाळाने जन्मल्यानंतर केलेल पहिले मलविसर्जन) हे निर्जंतुक असते आणि जन्मानंतर पहिल्या ३ ते २४ तासांमध्ये होणारे आतड्यांमधील जीवाणूंचे वसाहतीकरण हे अर्भकाच्या आतड्यामधील वातावरणावर (दूध धरून) अवलंबून असते.

ज्युलियस युफेल्मन (Julius Uffelmann) या समकालीन शास्त्रज्ञाने अर्भकाच्या विष्ठेमधून केवळ दोन प्रकारचे जीवाणू सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले असल्याचे सांगितले होते. परंतु एश्चेरीश यांनी वर्तुळाकार आणि आयताकार असे विविध प्रकारचे १९ जीवाणू वेगळे केले. यामध्ये कम्पायलोबॅक्टर (Campylobacter) आणि एंटरोकोकाय (Enterococci) व त्याबरोबरच  बॅसिलस सटिलीस (Bacillus subtilus) व स्यूडोमोनास (Pseudomonas) हेही होते. एश्चेरीश यांनी क्रिस्चिअन ग्राम (Christian Gram) यांच्या रंगद्रव्यिकरणाच्या  नवीन पद्धतीचा वापर केला होता. एश्चेरीश यांनी बॅक्टरीयम कोली कम्युन (Bacteria coli commune) (आताचा एश्चेरिचिया कोलाय) आणि बॅक्टरीयम लॅक्टीस एरोजन्स (Bacterium lactis aerogens, आताचा क्लेब्सिएला न्यूमोनी) यांचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यांनी या जीवाणूंचे किण्वन क्रिया करू शकण्याचे गुणधर्म व त्याद्वारे निर्माण होणारे वायु यावर प्रकाश टाकला. त्यांनी दाखवून दिले की ऑक्सिजन विरहीत वातावरणात जीवाणूंची वाढ ही पूर्णतः कर्बोदकांच्या किण्वन (Fermentation) प्रक्रियेवर अवलंबून असते. एश्चेरिश यांनी असा निष्कर्ष काढला की, पोषणामध्ये जीवाणूंचा सहभाग हा कमी प्रमाणात पण उत्तम असा असतो.

एइश्चेरिश यांनी त्यांच्या जीवाणूविषयक पद्धतींवर म्यूनिक येथील सोसायटी फॉर मॉर्फोलॉजी अँड फिजिऑलॉजी येथे व्याख्यान दिले आणि वर्षभरातच त्यांनी त्याच संस्थेसमोर बी. कोलाय कम्यून (B. Coli commune) वरील त्यांचे निष्कर्ष मांडले. त्याच्या पुढच्या वर्षी एश्चेरिश यांनी प्रबंध प्रकाशित केला, शीर्षक होते द इंटेस्टीनल बॅक्टरीआ ऑफ इन्फण्ट अँड देयर रिलेशन टू द फिजिऑलॉजी ऑफ डायजेशन. एश्चेरिश यांचे हे संशोधन फोर्टस्क्रिटे देर मेडिसिन (‘Fortschritte der Medicine’) मध्ये प्रकाशित झाले आणि त्याचे पुनर्मुद्रण इंग्रजी भाषेमधील रिव्ह्यूज ऑफ इन्फेक्शियस डिसिजेसमध्ये झाले.

एश्चेरिश यांनी गाईच्या दुधातील सोडिअमच्या अतिप्रमाणाचे तोटे ओळखले व बाळाला स्तनपान दिले जाण्यावर विशेष भर दिला.

१८९० पर्यंत त्यांनी म्यूनिक येथे काम केले. वयाच्या ३३ व्या वर्षी ऑस्ट्रियन मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने त्यांना बालरोगशास्त्राच्या प्राध्यापक पदी तसेच ग्रेझमधील सेंट अँना चिल्ड्रन हॉस्पिटलच्या  संचालकपदी नियुक्त केले.

एश्चेरिश यांनी व रुडॉल्फ क्लेमेंसिविज् (Rudolph Klemensiewicz) यांनी दाखवून दिले की, घटसर्प या रोगातून बऱ्या होत असलेल्या मुलांच्या रक्तामध्ये घटसर्पाचे प्रतिविष असते. प्रचंड विरोध असूनही एमिल वॉंन बेहरिंग (Emil von Behring) यांनी तयार केलेल्या घटसर्प प्रतिविषाच्या, घटसर्पाच्या बाल रुग्णांवरील वापरासाठी एश्चेरश यांनी त्यांना मदत केली. पुढे एश्चेरिश यांनी घटसर्प व सिरम थेरपी यावर एक पुस्तक लिहिले.

एश्चेरिश यांची व्हिएन्ना विद्यापीठातील चेअर ऑफ पेडिऍट्रिक्स तसेच व्हिएन्ना येथीलच सेंट अँना चिल्ड्रन हॉस्पिटलच्या संचालकपदासाठी निवड झाली.

कोर्ट कौन्सलर म्हणून एम्परर फ्रान्झ जोसेफ (Emperor Franz Joseph) यांनी एश्चेरिश यांना गौरविले. एश्चेरिश यांच्या योगदानाप्रीत्यर्थ कम्युन कोलायचे नाव एश्चेरिशिया कोलाय असे ठेवले.

एश्चेरिश यांचे सेरिब्रोव्हेस्कुलर अॅक्सिडंटने (Cerebrovascular accident) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे निधन झाले.

 

कळीचे शब्द : एइश्चेरिशिया कोलाय, गाईच्या दुधातील सोडिअम, घटसर्प व सिरम थेरपी.

संदर्भ :

  • Wcherich Coli-CDC National Center for Emerging and Medicine(5th ed) Wiley PP444-454 ISBN 0-471-98880-4
  • Vogt RL Dippold (2005) Eschrich Coli 0157H7 outbreak associated with consumption of ground beef June-July 2002 Public Health Reports 120(2) 174-8 PMC 1497708 PMID 15842119
  • Biography on Who Named it
  • Literature by and about Theodore Escherich in the German national Library Catalog.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.