पामर्स्टन, लॉर्ड : (२० ऑक्टोबर १७८४ – १८ ऑक्टोबर १८६५). इंग्लंडचा एक मुत्सद्दी पंतप्रधान. पामर्स्टनचा जन्म सधन कुटुंबात हँपशर येथे झाला. हॅरो आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १८०६ मध्ये तो राजकारणात उतरला. दोनदा अपयश मिळाल्यानंतर एका छोट्या बरोतर्फे तो १८०७ मध्ये संसदेत निवडून आला.
वडिलांमुळे त्याला पोर्टलंडच्या मंत्रिमंडळात एक लहानशी जागा मिळाली. दोन वर्षांनी पर्सिव्हलने त्यास अर्थमंत्रिपद देऊ केले; पण त्याने त्याखालचे पुरवठा खाते पसंत केले. त्यानंतर वीस वर्षे त्याने विविध पंतप्रधानांच्या हाताखाली त्यांच्या मंत्रिमंडळात काम केले; पण त्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला नाही. १८२७ मध्ये जॉर्ज कॅनिंगने त्यास कॅबिनेट दर्जाचा मंत्री केले. १८३० साली लॉर्ड ग्रे याने आपले लिबरल पक्षाचे मंत्रिमंडळ बनविताना कॅनिंगचे काही अनुयायी बरोबर घेतले. त्यात पामर्स्टनकडे परराष्ट्रखाते आले. जवळजवळ वीस वर्षे पामर्स्टन ह्या पदावर होता.
पामर्स्टनचे वर्तन गृहखात्यात सनातनी आणि परराष्ट्रीय राजकारणात उदारमतवादी असे होते. मतदानाचा हक्क जास्त प्रमाणावर विस्तृत करणे त्यास पसंत नव्हते. मात्र यूरोपातील प्रजेने केलेल्या उठावांस त्याची सहानुभूती होती. हंगेरीतील उठावाचा पुढारी लॉयोश कॉसूथ (१८०२–१८९४) ह्याचा त्याने गौरवपर उल्लेख केला. त्यामुळे व्हिक्टोरिया राणीने त्यास काढून टाकावे अशी मागणी केली; पण त्याच्या कामगिरीमुळे पंतप्रधान लॉर्ड रसेल ह्याने तसे केले नाही. पुढे १८५० मध्ये तिसऱ्या नेपोलियनने फ्रेंच प्रजासत्ताक बरखास्त करून सम्राटपद धारण केल्यानंतर पामर्स्टनने त्यास अभिनंदनपर संदेश पाठविला. त्या वेळी मात्र राणीच्या मागणीस पंतप्रधान रसेलने मान्यता देऊन त्यास बडतर्फ केले. पामर्स्टन आणि त्याचे अनुयायी यांनी ह्या गोष्टीचा लगेच सूड घेतला आणि रसेलच्या मंत्रिमंडळाचा पाडाव केला. रॉबर्ट पीलच्या व्हिग पक्षाकडे आलेल्या अनुयायांपैकी लॉर्ड ॲबरडीन याच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळात त्याची गृहमंत्रिपदावर नियुक्ती झाली. ह्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत रशियाबरोबर चालू असलेल्या क्रिमियन युद्धात अनेक घोटाळे झाल्यामुळे लोकांनी पामर्स्टनच्याच हातात सत्ता यावी, अशी मागणी केली. त्याची ७० वर्षे उलटल्यानंतर १८५५ मध्ये तो पंतप्रधान झाला. तुर्कस्तानला मदत करून रशियास पूर्वेकडे फार बलिष्ठ होऊ न द्यायचे त्याचे धोरण होते. १८५७ च्या भारतातील बंडामुळे काही काळ त्यास अधिकारत्याग करावा लागला. पण १८५९ साली तो पुन्हा पंतप्रधान झाला. अखेरपर्यंत तो त्याच पदावर होता.
हर्टफर्डशर (इंग्लंड) येथे त्याचे निधन झाले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.