मेचानिकॉफ, इल्या इलिच
( १५ मे, १८४५ – १५ जुलै, १९१६ )
मेचनिकॉफ यांनी खार्किव्ह लायची (Kharkiv Lycée), खार्किव्ह विद्यापीठात आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तर सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात आपली डॉक्टरेट प्राप्त केली. खार्किव्हमध्येच त्यांना जीवशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली. बक्ले यांच्या इंग्लंडच्या संस्कृतीचा इतिहास या पुस्तकाने ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी शरीरशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे विषय अभ्यासासाठी निवडले. १८६४ साली हेलिगोलॅन्ड (Heligoland) या समुद्रावरील बेटावर त्यांनी समुद्री जीवांचा अभ्यास केला. या ठिकाणी फर्डिनंड ज्युलिअस कॉन यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी रुडॉल्फ ल्युकार्ट (Rudolf Leuckart) यांच्याकडे गिसेन (Giessen) येथे पुढील काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. ल्युकार्ट यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी सूत्रकृमी (नेमाटोड) जातीच्या प्राण्यांमध्ये त्यांची प्रजनन क्रिया कधी लैंगिक तर कधी अलैंगिक अशा रितीने बदलू शकते याचा शोध लावला. गिसेन येथे असतांना त्यांनी चपट्या कृमींच्या पेशीत होणाऱ्या पचन क्रियेवर संशोधन केले. त्यांनी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात अलेक्झांडर कोव्हालेव्हस्की यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या या संशोधन कार्याला कार्ल अर्न्स्ट फॉन बेर पुरस्कार मिळाला. नव्याने स्थापन झालेल्या ओडेसा [Odessa] विद्यापीठात त्यांची सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. नंतर त्यांनी मेस्सिना (Messina) येथे स्वतःची प्रयोगशाळा काढली. १८८२ साली ते लुई पाश्चरचा सल्ला घेण्यासाठी पॅरीसला आले. त्यांनी मेचनिकॉफ यांना रुजू करून घेतले आणि आयुष्यभर त्यांनी तेथेच काम केले.
मेचनिकॉफ यांना पाश्चर संस्थेत सूक्ष्मजीवांच्या अभ्यासात रस निर्माण झाला. प्रामुख्याने रोग प्रतिकारक शक्ती या विषयात त्यांनी काम केले. मेस्सिना येथे त्यांनी स्टारफिशच्या डिंभामध्ये पेशीभक्षण (phagocytosis) या प्रक्रियेचा शोध लावला होता. त्यांनी स्टारफिशच्या डिंभामध्ये सूक्ष्म काटे टोचले होते आणि त्या काट्यांच्या भोवती काही पेशी जमा झाल्याचे बघितले. त्यांच्या असेही लक्षात आले की रक्त असलेल्या प्राण्यांमध्ये शरीराच्या सुजलेल्या, टोचलेल्या वा इजा झालेल्या भागात पांढऱ्या रक्त पेशी जमा होतात आणि त्यांनी असे गृहितक मांडले की या प्रक्रियेत बाह्य सूक्ष्मजींवांना पांढऱ्या रक्त पेशी नष्ट करतात. या गृहितकाबद्दल त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक कार्ल फ्रेड्रिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनीच या प्रक्रियेला पेशीभक्षण (फॅगोसायटॉसिस) अशी संज्ञा वापरली. पेशीभक्षण म्हणजे पेशींच्या छ्द्मपादांच्या सहाय्याने कण किंवा पेशी किंवा पेशीतील द्रव्ये पेशीमध्ये शोषून घेऊन त्यांचा नाश करणे. पेशीतील विकरांच्या साहाय्याने पेशीमध्ये घेतलेल्या बाह्यद्रव्याचे विघटन केले जाते. ही पद्धत अमीबा अन्नभक्षणासाठी वापरतो. शरीरातील भक्षक पेशी हीच पद्धत रक्तातील परकीय पेशी नष्ट करण्यासाठी वापरतात.
मेचनिकॉफ यांनी विविध प्राण्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी या काही जीवाणूंकडे कशा आकर्षिल्या जातात याचे संशोधन केले. जीवाणूंनी बाहेर टाकलेल्या आणि रक्तात विरघळलेल्या पदार्थांमुळे रक्तातील पांढऱ्या पेशी त्याकडे आकर्षिल्या जातात असे लक्षात आले. मेचनिकॉफच्या फॅगोसायटोसिस प्रक्रियेला पेशी प्रेरित (सेल मेडीएटेड) प्रतिकारक शक्ती असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे अँटीबॉडी प्रेरित प्रतिकारक शक्ती, ज्याला ह्युमोरल प्रतिकारक शक्ती असे म्हणतात.
मेचनिकॉफ यांनी रोगकारक जीवाणूमुळे माणसाला वृद्धत्व येते असा सिद्धांत मांडला. लॅक्टिक आम्ल हे माणसाला दीर्घायुषी करते म्हणून ते स्वतः रोज ताक पीत असत. लॅक्टोबासिलस डेलब्रुकी (Lactobacillus delbrueckii). या जीवाणूमध्ये दीर्घायुष्याचे रहस्य सामावलेले आहे. बल्गेरियात लोक भरपूर योगुर्ट पितात म्हणून ते दीर्घायुषी आहेत असा त्यांचा सिद्धांत होता. पुढे झालेल्या संशोधनाने त्यांचा हा सिद्धांत खरा ठरला.
मेचनिकॉफ यांना रॉयल सोसायटीचे कोपले मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. १९०८ साली त्यांना पॉल अर्लिक यांच्या समवेत फॅगोसायटोसीसच्या संशोधनाबद्दल शरीरशास्त्र आणि औषधी या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेनिनग्राड आणि सेंट पीटर्सबर्ग मेडीकल संस्थांचे एकत्रीकरण करून नॉर्थ-वेस्ट स्टेट मेडीकल विद्यापीठाला मेचनिकॉफ यांचे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या सन्मानार्थ ओडेसा, युक्रेन येथे मेचनिकॉफ राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
मेचनिकॉफ यांचा हृदय विकाराने पॅरीस येथे मृत्यू झाला.
मेचनिकॉफ यांनी खालील पुस्तके लिहिली :
- Leçons sur la pathologie comparée de l’inflammation(1892; Lectures on the Comparative Pathology of Inflammation)
- L’Immunité dans les maladies infectieuses(1901; Immunity in Infectious Diseases)
- Études sur la nature humaine(1903; The Nature of Man)
- Immunity in Infective Diseases(1905)
- The New Hygiene: Three Lectures on the Prevention of Infectious Diseases(1906)
- The Prolongation of Life: Optimistic Studies(1907)
संदर्भ :
- https://www.encyclopedia.com/…biographies/elie-metc..
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/…/PMC4909730/
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19039772
समीक्षक : बोधनकर , मुकुंद.