फार, विल्यम

(३० नोव्हेंबर १८०७ – १४ एप्रिल १८८३)

विलियम फार यांचा जन्म इंग्लंडमधील केनले (kenlay), शॉर्पशायर (Shorpshire) या प्रांतात एका गरीब कुटुंबात झाला. तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. पिअर लुईस (Pierre Louise) यांनी क्लिनिकल संशोधनात सांख्यिकीय दृष्टीकोन स्थापन केला होता, त्यांच्या वर्गात फार यांनी काही काळ अध्ययन केले. फार यांनी वैद्यकीय संख्याशास्त्रातील प्रशिक्षण स्वित्झर्लंड येथे घेतले. १८३३ मध्ये लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर फार यांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि संख्याशास्त्र यांची सांगड घालणारे काही लेख लिहीले. त्या लेखांच्या गुणवत्तेमुळे लॅन्सेंट या प्रतिष्ठित मासिकाचे संपादक डॉ. थॉमस वॅकले यांचे फार यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी संख्याशास्त्रीय अधीक्षक या पदासाठी फार यांच्या नावाची शिफारस केली.

  फार यांनी जीवनविषयक वैद्यकीय आकडेवारी दरवर्षी संकलीत करण्यास सुरूवात केली. यामध्ये मृत्यूचे कारण तसेच व्यवसायामुळे झालेले मृत्यू यांचा समावेश होता. आपल्या कामाला आधार म्हणून त्यांनी रोगांच्या शास्त्रीय वर्गीकरणाची एक पद्धत विकसित केली. त्यातूनच आय. सी. डी. (International Statistical Classification of Diseases and related Health problems) ही आता वापरली जाणारी व मान्यताप्राप्त रोग-वर्गीकरणाची पद्धत पुढे आली.

१८३७मध्ये फार यांनी जॉन रॅमसे मॅककुल्लोख (John Ramsay McCulloch) यांच्या ब्रिटिश साम्राज्याचा संख्याशास्त्रीय हिशेब या पुस्तकासाठी (Statistical Account for British Empire) जीवन विषयक वैद्यकीय आकडेवारी (Vital statistics) नावाचे एक प्रकरण लिहिले.

१८३९च्या जुलैमध्ये विल्यम फार यांची इंग्लंडचे पहिले गोषवारा संकलक (Compiler of Abstracts) – संख्याशास्त्रीय अधीक्षक म्हणून जी. आर. ओ. (GRO – General Registered Office) मध्ये नेमणूक केली गेली. तिथे त्यांनी बेंन्जामिन गॉम्पर्टझ (Benjamin Gompertz) यांचा सांख्यिकी आलेख (The Gompertz Curve) वापरला आणि थॉमस रोव एडमंड (Thomas Rowe Edmonds) यांच्या ‘मृत्युचा नियम’ च्या (law of mortality) जवळपास जाणारा नियम शोधला.

इंग्लंडमध्ये १८४८-४९मध्ये आलेल्या रोगांच्या साथीचा फार यांनी अभ्यास केला. त्यांच्याकडे असलेल्या मृत्युच्या नोंदींवरुन फार यांनी इंग्लंडमधील पटकीची (कॉलरा) साथ कोणत्या ऋतूत येते आणि एकदा आली की किती काळ टिकते यांचा अभ्यास केला. त्यासोबत लोकसंख्या, सामाजिक व पर्यावरणसंबंधी घटक, वय, लिंग, तापमान, पाऊस, वारा, घरातील माणसांची संख्या असे अनेक परिणाम करू शकणारे घटक लक्षात घेतले आणि जी. आर. ओ. मध्ये स्वतःच्या देखरेखीखाली १०० पानांची प्रस्तावना असलेला ३०० पानी अहवाल १८५२साली तयार केला. त्यात तक्ते, नकाशे व आलेख यांचा समावेश होता. त्या अहवालात मृत्युच्या नोंदींच्या अभ्यासातून त्यांनी रोगाचा (कॉलरा) एक संख्याशास्त्रीय नियम शोधला. या संख्याशास्त्रीय नियमात असे अध्याहृत होते की या रोगाची घटना घडण्यात पुष्कळदा नियमितता व क्रमवारी असते.

फार यांनी १८८७ सालच्या पटकीच्या साथीनंतर जैव-सामाजिक घटकांतील नोंदींच्या मालिका तयार केल्या. नियमित बदलणाऱ्या परिस्थितीत गोळा केलेल्या प्रत्यक्ष नोंदींच्या खूपच जवळपास फार यांनी तयार केलेल्या नोंदी होत्या. हा शोधलेला संबंध किंवा नियम संख्याशास्त्रीय नियमाप्रमाणे व्यक्तीसाठी नसून मोठ्या लोकसंख्येसाठी वापरणे योग्य असते. फार यांच्या काळात रोगासंबंधी आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध नसल्याने त्यांना फक्त मृत्युचीच उपलब्ध आकडेवारी वापरावी लागली. हा संख्याशास्त्रीय नियम व फार नेहमी वापरत असलेल्या बेरजेच्या पद्धती यापासून प्रेरणा घेऊन आयुर्विम्याच्या आकडेवारीत ‘मृत्युचा नियम’ (law of mortality) हा जीवन तक्ता (life table) तयार करण्यात आला. जी. आर. ओ. साठी गोळा केलेल्या आकडेवारीचा उपयोग करून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही जीवनतक्ते तयार केले.  सामाजिक सिद्धांत तपासणे किंवा वैद्यकीय क्षेत्रातील अनपेक्षित संबंध तपासणे यासाठी फार यांनी संख्याशास्त्रीय नियमाचा वापर, प्रात्यक्षिक तसेच संख्याशास्त्रज्ञांसाठी महत्वाच्या चाचण्या हे आवश्यक मानले. संसर्गजन्य रोगात आणि साथीच्या रोगात वातावरणातील प्रदुषण हे महत्वाचे कारण असल्याचेही फार यांनी आकडेवारीने सिद्ध केले. सोशल सायन्स असोसिएशनच्या स्थापनेपासूनच फार यांचा त्यात सहभाग होता. १८५८मध्ये फार यांनी वैवाहिक स्थिती व आरोग्य यामधील संबंध याचा अभ्यास केला.

जीवनविषयक आकडेवारीचा उपयोग करून साथीच्या, संसर्गजन्य रोगांचा केलेला अभ्यास या फार यांच्या कामाची दखल लंडन संख्याशास्त्रीय संस्थेने (नंतर तिचे नाव रॉयल संख्याशास्त्रीय संस्था असे झाले) घेतली व फार यांची तिचे प्रथम खजिनदार, उपाध्यक्ष आणि १८७१मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. इंग्लंडच्या जनगणनेच्या कामात त्यांनी आयुक्त म्हणून काम केले. जैविकसंख्याशास्त्राच्या क्षेत्रात फार यांनी केलेल्या कामाबद्दल ब्रिटिश मेडीकल असोसिएशनकडून त्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. अनेक युरोपियन संख्याशास्त्रीय परिषदांमध्ये फार यांनी ब्रिटीश सरकारचे प्रतिनिधीत्व केले कारण जर्मन, फ्रेंच व इटालियन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे स्थानिक भाषेत ते संवाद साधू शकत.

फार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील संख्याशास्त्रीय काम रोगांचे वर्गीकरण, नियंत्रण तसेच आयुर्विमा क्षेत्रासाठी पथप्रदर्शक ठरले गेले.

संदर्भः

                                                           समीक्षक : पाटकर, विवेक