पट्टदकल मंदिर समूह
कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘पट्टदकल’ येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. ७ व्या शतकाच्या आरंभी सुरु झालेले मंदिरांचे बांधकाम ९ व्या शतकापर्यंत चालू राहिले. चालुक्यकालीन वास्तुतज्ज्ञांनी मंदिरे बांधताना निरनिराळ्या धाटणीच्या वास्तुशैलीत प्रयोग केले. भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या ‘द्रविड-विमन’ आणि ‘रेखा-नागर’ अशा दोन वास्तुशैलीतील मंदिरे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पट्टदकल मंदिर समूहाला तज्ज्ञांकडून ‘वास्तुकलेची कार्यशाळा’ असे संबोधले जाते. या वास्तुसमूहात एकूण १२ प्रमुख मंदिरे आहेत व ती पायवाटेने एकमेकांना जोडली आहेत. ही सर्व शिव मंदिरे असून त्यांच्या गाभाऱ्यात आजही चांगल्या स्थितीतील शिवलिंग आहेत.
मंदिरांचा आराखडा :
वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम मुखमंडप, सभामंडप, अर्ध-मंडप, आतील बाजूस अंतरिक्ष आणि भोवती प्रदक्षिणा पथ असलेले चौकोनी गर्भगृह असा आराखडा येथे आढळतो. काही ठिकाणी अंतरिक्षामध्ये समोरासमोर गणपती व देवी यांची उपतीर्थे (sub-shrines) आहेत. याचबरोबर आकाराने मोठ्या मंदिरांमध्ये मुखमंडपाच्या समोरच्या बाजूस स्वतंत्र नंदीमंडप आहे, तर लहान मंदिरात निराळा नंदीमंडप नसून मंडपातच नंदीची मूर्ती आहे. यातील बहुतांश मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. सामुदायिक संमेलनासाठी सभामंडपांचा वापर केला जात असल्यामुळे ते चौकोनी/आयताकृती व मोठ्या विस्ताराचे आहेत. आकारातील फरक वगळता, ढोबळमानाने सर्व मंदिरांचा आराखडा अशा प्रकारचा आहे. मात्र मंदिरांच्या एलीव्हेशनमध्ये शैलीनुरूप विविधता दिसून येते.
‘द्रविड-विमन’ शैलीतील मंदिरे:
या वास्तुसमुहातील विरुपाक्ष, मल्लिकार्जुन व संगमेश्वर ही मंदिरे द्रविड वास्तुशैलीत बांधलेली आहेत. विरुपाक्ष हे एकमेव मंदिर आज कार्यरत असून समूहातील सर्वांत मोठे व मुख्य मंदिर आहे. इ.स. ७४० च्या सुमारास अनिवारीतचारी गुंड (Anivaritachari Gunda) नावाच्या वास्तुविशारदाने या मंदिराची रचना केली. हा वास्तुविशारद पल्लव देशातील असल्याने विरुपाक्ष मंदिर म्हणजे द्रविड वास्तुशैली व स्थानिक वास्तुशैली यांचे मिश्रण आहे. मंदिराच्या रचनेवर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराचा प्रभाव जाणवतो. वास्तूची लांबी २२४ फूट तर रुंदी १०५ फूट असून पाच स्तरांच्या चौथऱ्यावर हे बांधण्यात आले आहे. मंडप आणि गर्भगृहाच्या भिंतींना प्रक्षेपणे (Projections) आहेत, ज्यामुळे तेथे कोनाडे तयार झाले आहेत. त्यामध्ये शैव आणि वैष्णव देवता तर काही ठिकाणी जाळीदार नक्षी असलेल्या खिडक्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहावर ३ मजली शंकूच्या आकाराचे (pyramidal) द्रविड विमन असून त्यावर चौकोनी शिखर आणि कळस आहे. अंतराळावर मोठ्या आकाराचा शुकनासी आहे, ज्यामुळे मंदिर दुरून देखील दृष्टीस पडते. हे मंदिर ९ व्या शतकात बांधलेल्या मंदिरांपैकी सर्वांत उंच मंदिर आहे. याच्या फरसबंदीपासून कळसापर्यंतची उंची सुमारे ५७ फूट आहे.
मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्याच काळात बांधण्यात आले. समकालीन असल्यामुळे रचनेच्या बाबतीत या दोन्ही वास्तूंमध्ये बरेच साम्य आहे. परंतु मल्लिकार्जुन मंदिर हे आकाराने लहान असून याचे विमन देखील निराळे आहे. येथे वास्तुशैलीत नवीन प्रयोग केल्याचे दिसून येते. शुकनासीच्या कमानीवर नटराज कोरला आहे. विमनाच्या तिसऱ्या स्तरावर कूट किंवा शाला यांचा अभाव दिसतो. तसेच याचे शिखर चौकोनी नसून अर्धवर्तुळाकार आहे.
संगमेश्वर मंदिर येथील सर्वांत जुने मंदिर आहे. विजयादित्य राजाच्या काळात, इस. ७२० मध्ये याचे बांधकाम सुरु झाले. तज्ज्ञांच्या मते, यातला गाभाऱ्याचा भाग आधी बांधला गेला. नंतर बराच काळ हे अपूर्ण स्थितीत होते, काही काळानंतर सभामंडप बांधण्यात आला. येथील प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतींवर पुरेसा उजेड येण्यासाठी एक खिडकी आहे. मंदिराचा वरचा भाग सुस्थितीत असून छताच्या कडेने असलेल्या भिंतीवर कर्णकूट (चौकोनी) व आयताकृती आकारातील सुसंगत कोरीवकाम आहे. याचबरोबर तेथे ‘कुडू’ म्हणजे गवाक्ष कोरले आहेत. या मंदिराचे दोन मजली विमन म्हणजे द्रविड शैलीतील शिखराचे परिपूर्ण उदाहरण समजले जाते. येथे चौकोनी आकाराचे ‘कूट शिखर’ असून त्यावर कळस आहे.
रेखा-नागर शैलीतील मंदिरे:
रेखा-नागर शैली हा उत्तर भारतीय वास्तुशैलीतील एक उपप्रकार आहे. समूहातील गलगनाथ, काडसिद्धेश्वर, जाम्बुलींगेश्वर व काशी विश्वेश्वर ही मंदिरे या शैलीत बांधलेली आहेत.
गलगनाथ मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याचे प्रमाणबद्ध आणि अजूनही सुस्थितीत असेलेले शिखर. शिखर उंच आणि वक्राकार असून त्यावर मोठ्या आकाराचा कळस आणि अमलक आहे. शुकनासीची पडझड झालेली आहे. मंदिराची रचना पाहता ८ व्या शतकाच्या पूर्वार्धात ही वास्तू बांधली गेली असावी. जॉर्ज मिशेल या तज्ज्ञाच्या मते गलगनाथ मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील अलामपूर येथल्या ‘स्वर्ग ब्रह्मा’ (इ.स.६८९) मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. पट्टदकल व अलामपूर हि दोन्ही ठिकाणे चालुक्यांच्या राजवटीखाली असल्यामुळे अशा प्रकारचे वास्तुशैलीतील साधर्म्य शक्य आहे.
काडसिद्धेश्वर मंदिरातील अक्षीय विस्तार ही वास्तुकलेतील प्रायोगिक पायरी समजली जाते. काडसिद्धेश्वर, जाम्बुलींगेश्वर व काशी विश्वेश्वर ही तुलनेने लहान मंदिरे असून त्यांचा आराखडा व बांधणी यांत बरेच साधर्म्य आढळते. येथील काशी विश्वेश्वर मंदिर सर्वांत अखेरीस बांधले गेले. या मंदिरात पाणी वाहून जाण्यासाठी पाईप (Pranala) आहे. याचबरोबर, समूहातील काही मंदिरांमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या वास्तुशैलीचे मिश्रण दिसून येते. ती मंदिरे खालीलप्रमाणे :
पंपानाथ मंदिर : हे मुख्य समूहापासून लांब असून द्रविड आणि नागर अशा दोन्ही शैलीतील बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना म्हणजे या शैलींच्या मिश्रणाची महत्वाची पायरी समजली जाते. बांधणीच्या आरंभाचे फारसे संदर्भ आढळत नाहीत, तरीही सुमारे ८ व्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधले गेले असावे. तीन टप्प्यात बांधले गेल्यामुळे मंदिराची रचना बाकीच्यांपेक्षा निराळी असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. मंदिरातील शिल्पकाम, संरक्षक भिंत तसेच आराखड्यातील काही बाबी द्रविड शैलीतील आहेत. तर शिखर आणि लहान खांब असलेले कोनाडे नागर शैलीतील आहेत. येथील प्रदक्षिणा पथाच्या भिंतींवर देवकोष्ठ आहेत.(देवांची शिल्पे असलेले कोनाडे) देवकोष्ठांवर चैत्य शैलीतील कमानी आणि जाळीदार खिडक्या आहेत. मंदिरावरील ‘रेखा-नागर’ शैलीतील शिखर हा या वास्तूचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आहे. शुकनासीवर चैत्य कमान आणि नटराज कोरले आहेत.
जैन नारायण मंदिर: हे मुख्य समूहाच्या पश्चिमेस सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर आहे. समूहातील इतर मंदिरांपेक्षा या मंदिराची वास्तुशैली आणखी चांगल्याप्रकारे विकसित झालेली आहे. यावरून साधारण ९ व्या शतकात वास्तूची बांधणी झाली, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वास्तू लालसर रंगाच्या वाळूच्या दगडातून तीन स्तरांत बांधली आहे व इतर पारंपरिक मंदिरांप्रमाणे याचा आराखडा आहे. मुखमंडप शोभिवंत असून तेथे लेथ यंत्रावर तयार केलेल्या खांबांच्या चार रांगा आहे. मुखमंडपात कक्षासने आहेत. (कक्षासन = मंडपाच्या आतील बाजूला असणारे लांब दगडी बाक) सभामंडप सात भागात विभागला असून, नागर शैलीतील आहे. येथील अष्टकोनी विमन द्रविड शैलीतील आहे. मंदिराचा विस्तार आणि उंची पाहता, विमन तुलनेने छोटे आहे.
ह्या वास्तू चालुक्य काळात असणाऱ्या वास्तुकलेतील प्रयोगशीलतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे यूनेस्को तर्फे पट्टदकल समूहाला ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक महत्त्व असणाऱ्या वारसास्थळाचा दर्जा मिळाला आहे.
संदर्भ सूची :
ग्रंथ –
- Karnataka: A garden of Architecture, A.V. Narasimha Murthy & Dr. R. Gopal (Published by the Directorate of Archaeology & museum, Karnataka)
वेबसाईट –
- http://asi.nic.in/asi_monu_whs_pattadakkal_intro.asp
- https://www.ancient.eu/article/899/the-temples-of-pattadakal/
- https://karnatakatravel.blogspot.in/2012/05/papanatha-temple-pattadakal.html
समीक्षक : श्रीपाद भालेराव.