टडाओ आंडो ( १३ सप्टेंबर १९४१ – )

टडाओ आंडो हा एक स्वयंशिक्षित, जगप्रसिद्ध जपानी वास्तुविशारद आहे. आंडो यांना १९९५ साली त्याच्या कामासाठी प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले.

आंडो यांचा जन्म, जपानमध्ये ओसाका या शहरात १३ सप्टेंबर १९४१ साली झाला. आर्किटेक्ट  होण्याआधी ते मुक्केबाजी करीत असत. मुक्केबाजीच्या सामन्यांसाठी बँकॉक, थायलंडला गेलेले असताना तेथील बौद्ध मंदिरांनी आंडो यांना मोहित केले. त्यानंतर बरीच वर्ष त्यांनी जपान, युरोप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांचा प्रवास करुन तिथल्या इमारतींचा अभ्यास केला. पुढे मुक्केबाजीतील कारकीर्द सोडून वास्तुविज्ञानात स्वतःला झोकून दिले.  १९६८ मध्ये ओसाकाला परतून आंडो यांनी स्वतःचे टडाओ आंडो आर्किटेक्ट आणि असोसिएटस डिझाइन स्टुडिओ सुरू केला.

आंडो यांना अलवार आलटो मेडल (१९८५), कार्लबर्ज वास्तुकला पुरस्कार (१९९२), रिबा रॉयल गोल्ड मेडल (१९९७), एआयए गोल्ड मेडल (२००२), न्युट्रा मेडल फॉर प्रोफेशनल एक्सलन्स (२०१२) हे पुरस्कार देखील मिळाले आहेत. रो हाऊस, सुमीयोशी (१९७९), चर्च ऑफ द लाइट, ओसाका (१९८९), वाटर टेम्पल, अवाजी (१९९१), रोकोको हाउसिंग १,२,३ (१९८३-१९९९), 4×4 हाऊस (२००३) ही त्यांची काही प्रसिद्ध कामे होत.

आंडो म्हणतात ‘माझ्या डिझाइनचा हेतू, माझ्या स्वत: च्या आर्किटेक्चरल सिद्धांतांना मूर्त स्वरुप देण्याखेरीज, नैसर्गिक घटक व दैनंदिन आयुष्यातील अनेक पैलूंमधून अर्थपूर्ण स्पेस तयार करणे, असा आहे. घरात, प्रकाश आणि हवेची ओळख, जेव्हा बाहेरपेक्षा वेगळी होते तेव्हा या घटकांना अर्थ प्राप्त होतो.’

जपानी धर्म व जीवनशैली यांचा आंडो यांच्या कामावर लक्षणीय प्रभाव दिसतो. त्यांच्या वास्तुकलेच्या विशिष्ट शैलीतून हायकु परिणाम तयार होतो, असे तज्ज्ञ म्हणतात. जागेच्या न्यूनतावादी रचनेतून, जपानी संस्कृतीतील शून्यत्वाचे तत्त्व, साधेपणा व सौंदर्य दर्शविण्यात आंडो विशेष पारंगत आहेत. झेन तत्त्वज्ञानाचादेखील आंडो यांच्या कामावर स्पष्ट प्रभाव दिसतो. झेन तत्त्वज्ञान एकूणच साधेपणा व बाह्यरूपापेक्षा अंतर्मनाच्या सौंदर्यावर केंद्रित आहे. आंडोची वास्तुकला अतिशय साधी, सोपी व तरंगणारी (वजनरहित) आहे, असे भासते.

आंडोची सर्व कामे काँक्रिटमध्ये असतात. काँक्रिटचा वापर करताना आंडोमधील कवी बाहेर डोकावतो. काँक्रिट हे अतिशय कठोर आणि तीक्ष्ण दिसते. याउलट निसर्ग आहे. काँक्रिटची शिस्त व निसर्ग यात एक विरोधाभासी फरक तयार होतो ज्यामुळे दोन्ही घटक उठून दिसतात असे आंडो म्हणतात.

चर्च ऑफ द लाइट

आंडो यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक घरं व चर्चचे आराखडे तयार केले आहेत. ते म्हणतात, ‘घर आणि मंदिराचं डिझाइनमध्ये फरक करण्याची गरज नाही. घरात रहाणे ही नुसती भौतिक गरज नसून अध्यात्मिक गरज सुद्धा असते. घरात मनाचा वास असतो आणि मनात देवाचा.’ तसेच, निसर्ग आणि वास्तुशिल्प यांमध्ये एक खोल नातं आहे असे त्यांना वाटतं; निसर्गाचा आत्मा व सौंदर्य आर्किटेक्चरमधून लोकांनी अनुभवावे असे त्यांना वाटते. नैसर्गिक आकार अनुसरण करणाऱ्या रचना व नैसर्गिक प्रकाशाचा सर्जनशील उपयोग यावर आंडो यांनी प्रभुत्व मिळविले आहे.

वॉटर टेंपल

आंडो यांचा असा विश्वास आहे की वास्तुकलेत समाज बदलायची ताकद आहे. आंडो म्हणतात, ‘वास्तुकलेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवन प्रोत्साहित होऊन, सामाजिक सुसंवादाचा प्रचार होणे गरजेचे आहे. मी माझ्या कामातून असे वातावरण तयार करु इच्छतो जे लोकांना, गोष्टींकडे बघण्याचा एक ताजा व नवीन दृष्टीकोन देईल व त्यांना पुन्हा नैसर्गिक लयींच्या संपर्कात आणेल.

 

संदर्भ :  

  • Peltason R., Ong-Yan G., P. ( 2010) The Pritzker Prize Laureates In Their Own Words London: Thames and Hudson.
  • Jodidio P. (2007)  Ando Complete works  Köln: Taschen

 

                                               समीक्षक : श्रीपाद भालेराव