फ्रेशे, मॉरिस रेने 

(२ सप्टेंबर १८७८ – ४ जून १९७३)

मॉरिस रेने फ्रेशे यांचा जन्म मालिन्यी, फ्रान्स (Maligny, France) येथे झाला. त्यांनी पॅरिसमधील लायसी बुफॉ (Lyc’ee Buffon) या शाळेत शिक्षण घेतले. त्यांना जाक हाडामार्द (Jacques Hadamard) या सुप्रसिद्ध गणितज्ज्ञाने गणित शिकवले. त्याचवेळी फ्रेशे यांची गणिती क्षमता ओळखून हाडामार्द यांनी फ्रेशेना वैयक्तिकरित्या शिकवायचे ठरवले. पुढे १८९४ मध्ये हाडामार्द बोर्डो विद्यापीठात (University of Bardeaux) गेल्यावरही त्यांनी फ्रेशे यांच्यावर लक्ष ठेवले. ते फ्रेशे यांना गणितातील प्रश्न विचारत आणि चुकीच्या उत्तरावर कठोर टीका करत असत.

१९०० मध्ये फ्रेशे यांनी गणिताच्या अभ्यासासाठी एकोल नॉर्माल सुपिरियमध्ये (Ecole Normale Superieure) नाव दाखल केले. १९०३ सालीच त्यांचे चार शोधनिबंध प्रसिद्ध झाले. पॅरिसमध्ये असलेले अमेरिकन गणिती एडविन विन्सटन् (Edwin Winston) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काही शोधनिबंध अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

पहिल्या महायुद्धानंतर फ्रेशे यांची स्ट्रासबर्ग विद्यापीठाच्या (Strasbourg University) पुनर्स्थापनेसाठी निवड झाली. उच्च विश्लेषणाचे (Higher Analysis) प्राध्यापक तसेच गणित संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी तिथे काम केले. कार्यालयीन कामाचा बोजा असूनही त्यांनी अनेक प्रकारचे दर्जेदार संशोधन केले.

फ्रेशे काही काळ सोरबोनच्या रॉकफेलर फाउंडेशन (Sorbonne’s Rockefeller Foundation) मध्ये व्याख्याते होते. १९२८ मध्ये प्राध्यापक म्हणून असलेल्या फ्रेशे यांना १९३३ मध्ये सर्वसामान्य गणिताचे मानद आणि १९३५ मध्ये विकलन व संकलन याचे मानद प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. १९४१ साली बोरेल यांच्यानंतर संभाव्यतेचे कलन (Calculus of Probability) आणि गणितीय भौतिकी (Mathematical physics) या विषयांचे मानद पद फ्रेशे यांनी १९४९ साली निवृत्त होईपर्यंत भूषविले. १९२८-३५ या कालावधीत एकोल नॉर्माल सुपिरिय येथेही प्रभारी व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले.

मॉरिस फ्रेशे यांनी काय फॅन (Ky Fan) या सहलेखकासह ‘चयन संस्थितीचे निमंत्रण’ (Invitation to Combinatorial Topology) हे पुस्तक लिहीले. पोलिश विज्ञान व कला अकादमीचे ते १९२९ मध्ये विदेशी सभासद होते, तसेच १९५० मध्ये नेदरलँडच्या विज्ञान व कला रॉयल अकादमीचे ते विदेशी सभासद होते.

मॉरिस फ्रेशे यांना पुढील सन्मान मिळाले : १९२८ व १९३६मध्ये आंतरराष्ट्रीय गणित काँग्रेसमध्ये प्रमुख वक्ता, १९४७ मध्ये एडिनबर्गच्या रॉयल सोसायटीचे फेलो.

अनेक संकल्पना फ्रेशे यांच्या नावाने ओळखल्या जातात : फ्रेशे अवकाश, फ्रेशे सांस्थितिक अवकाश, फ्रेशे विकलज (derivatives), फ्रेशे वितरण, फ्रेशे मध्य, फ्रेशे अंतर, फ्रेशे निस्यंदक (filter), फ्रेशे असमानता, फ्रेशे अवकाशातील विकलन, फ्रेशे फलीय विश्लेषण.

फ्रेशे वितरण हे वेईबूल (Weibull) वितरणाचा व्यस्त म्हणूनही ओळखले जाते. फ्रेशे यांनी १९२७ साली त्याच्याशी संबंधित शोधनिबंध लिहिला. त्यावर पुढे इतरांनी बरेच कार्य केले. फ्रेशे अंतर दोन वक्र रेषांमधील समरुपतेचे मापक आहे, ज्यात वक्र रेषांवरील बिंदूंचे स्थान व क्रम लक्षात घेतला जातो. फ्रेशे हे एस्परॅन्टिस्ट होते (Esperantist). एसपेरेन्तो ही तयार केलेली एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. यूरोपातील अनेक भाषांतील समान शब्द वा त्यांचे समान मूळ घेऊन त्यावर आधारीत याचा शब्दसंग्रह आहे. २६ जुलै १८८७ रोजी पोलिश ज्युइश नेत्रतज्ञ एल. एल. झामेनहॉफ (L.L. Zamenhof) यांनी एसपेरेन्तोची तपशीलवार माहिती ‘उनुआ लिब्रो’ (Unua Libro) या पुस्तकात दिली आहे. ही कुठल्याही देशाची अधिकृत भाषा नाही. पण ती मध्य व पूर्व यूरोप, पूर्व आशिया तसेच दक्षिण अमेरिका येथील ११५ देशातील जवळपास २ दशलक्ष लोकांकडून दुसरी भाषा म्हणून बोलली जाते. एसपेरेन्तो याचा अर्थ आशादायी माणूस. या विशेष तयार केलेल्या भाषेत फ्रेशे यांनी काही शोधनिबंध आणि लेख लिहीले होते. १९५०-५५ या काळात ते आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक एस्परॅन्टिस्ट असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष होते.

संदर्भ :

 

  समीक्षक : पाटकर, विवेक