संगीतात रागतत्त्व निर्माण झाल्यावर त्या रागांचे पद्धतशीर वर्गीकरण करण्याचे प्रयत्न फार प्राचीन काळापासून झाल्याचे दिसून येतात. त्या रागांच्या वर्गीकरणाबाबत जे प्रयत्न झाले, त्यांचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार करणे संयुक्तिक होईल. रागवर्गीकरणाचे प्रयत्न होण्याचे प्रमुख कारण हे, की त्यामुळे रागांचे स्वरूप समजण्यास मदत होते. अर्थात रागांमध्ये असलेल्या समान तत्त्वाच्या आधारे अशा वर्गीकरणाच्या पद्धती अनेक असू शकतील; परंतु साधारणपणे स्वरसाम्याच्या आधारावर किंवा स्वरूपसाम्याच्या आधारावर प्रचलित रागांचे वर्ग पाडून वेगवेगळ्या रागांच्या स्वरूपांचे आकलन करण्याच्या उद्दिष्टाने रागवर्गीकरण करण्याची पद्धती फार पूर्वीपासून अवलंबली गेली आहे. रागतत्त्व ज्यांनी प्रथम विशद केले, त्या मतंग मुनींच्या बृहद्देशी ग्रंथाच्या काळापासून असे वर्गीकरण दिसून येते.
मतंगांनी स्वत:च्या काळात अस्तित्वात असलेल्या सात गीतींमध्ये रागांची विभागणी केली आहे : (१) शुद्धा, (२) भिन्नका, (३) गौडिका, (४) राग-गीती, (५) साधारणी, (६) भाषा-गीती आणि (७) विभाषा-गीती. या प्रत्येक विभागाचे पोटविभाग असत. राग-गीतीमध्ये मतंगांनी आठ रागांची नावे दिली आहेत. जातींपासून ग्रामरागांची कल्पना या काळात दिसून येते. यातूनच पुढे तेराव्या शतकात शार्ङ्गदेवांनी संगीतरत्नाकर ग्रंथात दशविध रागवर्गीकरण−पद्धती मांडली, तिचे स्वरूप असे आहे : त्याकाळी प्रचलित असलेल्या सर्व रागांचे त्यांनी वर्गीकरण केले आणि ग्रामराग, राग, उपराग, भाषाराग, विभाषाराग, आंतरभाषाराग, रागांग, भाषांग, उपांग व क्रियांग असे रागांचे दहा प्रकार मानले. त्यापैकी पहिले सहा मार्गी रागांचे प्रकार सांगून पुढील चार देशी रागांचे प्रकार म्हणून त्याने सांगितले. या पद्धतशीर रागवर्गीकरणाच्या पद्धतीला दशविधरागवर्गीकरण−पद्धती असे म्हणतात. यापूर्वीच रागवर्गीकरण म्हणजे सात प्रकारच्या गीतींमध्ये विभागलेले ग्रामरागांचे वर्गीकरण होते. यानंतर मात्र रागांच्या लक्ष्य व लक्षणांवरून पुढील काळात रागवर्गीकरणाच्या पद्धती मांडल्या गेल्या. त्यांच्ये स्वरूप असे :
(१) दशविधरागवर्गीकरण−संगीतरत्नाकर−तेरावे शतक. (२) ह्याच्याच जोडीला रागवर्गीकरणाची दुसरी पद्धत संगीतरत्नाकरमध्ये आढळते, ती म्हणजे ‘शुद्ध’, ‘छायालग’ व ‘संकीर्ण’ अशा प्रकारे तीन गटांत केलेली रागांची विभागणी : (१) शुद्ध स्वरूपात मांडलेला राग, (२) ‘अन्य राग छायालगत्वेन रंजक:’ म्हणजे दुसऱ्या रागाची छाया घेऊन मांडलेला राग व (३) संकीर्ण म्हणजे एकापेक्षा अधिक रागांची छाया असलेले राग. सध्याही अशाप्रकारचे वर्गीकरण दिसून येते.
तेराव्या शतकानंतर मध्यकालीन ग्रंथांमध्ये रागवर्गीकरणाच्या आणखी काही पद्धती सांगितल्या गेल्या. या मध्यकालीन मुस्लिम प्रभावामुळे संगीतात काही परिवर्तने झाली आणि त्यांतूनच प्रचलित रागांची व्यवस्था लावण्याकरिता काही वर्गीकरण-पद्धती निर्माण झाल्या. यांतील उत्तरेकडे विशेष प्रचारात असलेली एक पद्धत म्हणजे राग−रागिणी पद्धती होय. या पद्धतीमध्ये काही रागांना मूळ राग समजून व ते पुरुषप्रकृतीचे मानून त्यांतून त्यांचे भार्या, पुत्र, पुत्रवधू वगैरे कुटुंबपद्धतीवर आधारित संबंधांप्रमाणे रागवर्गीकरण मानले गेले. राग, त्यांचे रस, भाव, त्यांचे व्यक्तिगुण वगैरे काही साहित्यिक कल्पनांवर आधारित अशा प्रकारची रागांची पुरुषवाचक व स्त्रीवाचक अशी विभागणी करण्यात येऊन मूळ रागांचा हा सर्व कुटुंबविस्तार आहे, असे दाखवण्यात आले. यातही नंतर चार मते निर्माण झाली व भरत-मत, शिव-मत, हनुमान-मत, कल्लिनाथ-मत अशी त्यांची नावे रूढ झाली. या चारही मतांमध्ये मूळ राग भिन्न असून त्यांचे कुटुंबही वेगळ्या प्रकारचे होते. पण राग-रागिणीपद्धतीमध्ये रागांची कुटुंबपद्धती ही कल्पना मूळ असून, त्याच्या मागची कल्पना रागांच्या विस्तारामध्ये साम्य ही असावी; असा काही विद्वानांचा अभिप्राय आहे. उदा., प, गमधप, गमप, गम, रे सा ही स्वरसंगती घेतली तर राग कामोदचे स्वरूप दिसते. यात रे, ध कोमल केल्यास हीच स्वरसंगती भैरव रागवाचक होईल. तेव्हा या स्वरसंगतीचे साम्य मान्य करून भैरव व कामोद यांचा एका कुटुंबात समावेश करणे क्रमप्राप्त ठरेल. राग-रागिणी वर्गीकरण पद्धतीमागची कल्पना अशी आहे.
मुस्लिमांच्या प्रभावामुळे आपल्याकडे बारा स्वरांचे स्वरक्षेत्र एका षड्जग्रामात परिवर्तित झाले, या स्वरक्षेत्राला पर्शियन संगीतात ‘मुक्काम’ म्हणतात. त्यावरून संस्थान किंवा थाट अथवा दुसरा शब्द मेल (स्वरमेल) हा प्रचारात येऊन याच मध्यकाळात रागरागिणीच्या जोडीला मेलपद्धतीही रूढ झाली. काही विशिष्ट मेल हे मूळ मानून त्यांतून स्वरसाम्याच्या तत्त्वावर निरनिराळे राग निर्माण झाले, असे मानण्यात आले. थाटपद्धती आणि जन्य-जनक पद्धती ही एकच होय. आता हे मूळ मेल अथवा थाट कोणते व किती, याबाबत निरनिराळ्या ग्रंथकारांमध्ये मतभेद आहेत. परंतु यात रागांची विभागणी स्वरसाम्याच्या तत्त्वावर आहे, हे नक्की. पुढे व्यंकटमखी यांनी कर्नाटक संगीतातील रूढ असलेल्या बारा स्वरांच्या निरनिराळ्या नावांवरून असे सिद्ध केले, की मेलांची संख्या जास्तीत जास्त ७२ च होऊ शकते आणि सिद्धांतावरून मेलपद्धतीमध्ये हिंदुस्थानी संगीतात ३२ मेल व कर्नाटक संगीतात ७२ मेल अशा मेलपद्धतीच्या दोन वेगळ्या संख्या दर्शविल्या गेल्या. रागवर्गीकरणाच्या दृष्टीने तत्त्वत: ही एकच मेलपद्धती आहे.
भातखंडे यांनी प्रचलित रागांची स्वरूपे, या रागात आढळणाऱ्या निरनिराळ्या बंदिशींच्या आधारावर व निरनिराळ्या विद्वान कलावंतांशी चर्चा करून काही प्रमाणात निश्चित केली व ती लक्ष्यसंगीत नावाचा ग्रंथ लिहून लोकांपुढे मांडली. ही रागस्वरूपे मांडताना त्यांनी मेलपद्धती ही आधार म्हणून स्वीकारली होती. त्यात प्रचलित अशा रागांचा समावेश, दहा मुख्य थाट हे आधार म्हणून घेऊन करता येतो, असा त्यांचा सिद्धांत. कर्नाटक संगीतपद्धतीतील व्यंकटमखींची पद्धत याकरिता त्यांनी स्वीकारली. हिंदुस्थानी संगीतात १२ स्वर मानून त्यांनी ३२ थाट पद्धतीचे अस्तित्व मान्य करूनही सोयीसाठी १० थाट स्वीकारले आणि त्यांत स्वरसाम्याच्या तत्त्वावर मुख्यत: व स्वरूपसाम्याच्या तत्त्वावर अंशत: असे रागांचे वर्गीकरण करून सर्व प्रचलित व थोड्याफार प्रमाणात अप्रचलित राग हे सुद्धा समाविष्ट केले. त्यांनी स्वीकारलेले १० थाट असे : कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, काफी, पूर्वी, मारवा, तोडी, आसावरी व भैरवी, पं. भातखंडे यांचे हे वर्गीकरण संगीतक्षेत्रातील काही विद्वानांना पटले नाही. विशेषत: स्वरसाम्याच्या आधारावर केलेले हे वर्गीकरण, रागाच्या स्वरूपाबाबत आणि रागाच्या विशिष्ट स्वरसंगतीवरून, रागनिर्मिती होते असे तत्त्व मानणाऱ्यांना पटणारे नव्हते. तेव्हा संगीतरत्नाकरामध्ये वर्णिलेल्या दशविध रागवर्गीकरण पद्धतीच्या आधारे पं. नारायण खरे या संगीतज्ञांनी ‘रागांगवर्गीकरण पद्धती’ अशी एक निराळी रागवर्गीकरण पद्धती मांडली. या पद्धतीमध्ये ३० मूळ राग कल्पून या रागांची छाया ज्या इतर रागांमध्ये आढळते ते रागांग राग, अशी वर्गीकरणाची पद्धती आहे. याशिवाय रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय. हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध शुद्ध असणारे राग; रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग. यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशा वेळी संधिप्रकाशसमयी सामान्यत: रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात. सकाळी ७ ते १० व रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून, रात्री १० ते ४ व दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. या समयाप्रमाणे वर निर्देशिलेल्या तीन वर्गांच्या रागांना प्रस्तुत केले जाते. हे रागांचे समयाश्रित वर्गीकरण होय. कर्नाटक पद्धतीमध्ये रागांचा आणि वेळेचा असा संबंध मानला गेला नाही, त्यामुळे अशा प्रकारचे वर्गीकरण किंवा अमुक वेळेला अमुक राग प्रस्तुत केला जावा, असा संकेत या पद्धतीत नाही.
संदर्भ :
- Clements, E.The Ragas of Tanjore, London, 1920.
- Danielou, Alain,The Ragas of Northern Indian Music, London, 1968.
- Kaufmann, Walter, The Ragas of North India, Bombay, 1968.
- Prajnananda, Swami, A Historical Study of Indian Music, New Delhi, 1981.
- Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, IV, Madras, 1963, 1964.
- Sastoi, Subrahmanya S. Ragavibodha of Somanatha, Madras, 1945.
- आचरेकर, बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.
- घोष, निखिल; अनु.पारसनीस, मु. रा. राग-तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती, मुंबई, १९७२.
- टेंकशे, शंकर अनंत, नव-राग निर्मिती, मुंबई, १९७३.
- टेंकशे, शं. अ. राग वर्गीकरण, मुंबई, १९७४.
- प्रतापसिंह देव, सवाई संगीतसार, पुणे, १९१०.
- भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीत-पद्धती), भाग १, २, ३, ४, हाथरस, १९५६,१९५७.
- रातंजनकर, श्री. ना. संगीत परिभाषा, पुणे, १९७३.
- शार्ङ्गदेव; अनु. तारळेकर, ग. ह. संगीतरत्नाकर, मुंबई, १९७५.
#आसावरी थाटातील राग#कल्याण थाटातील राग#काफी थाटातील राग#खमाज थाटातील राग#तोडी थाटातील राग#नाट्यशास्त्र#पूर्वी थाटातील राग#बिलावल थाटातील राग#भाषांगराग#भैरव थाटातील राग#भैरवी थाटातील राग#मारवा थाटातील राग#रागमाला चित्रे#रागमालिका#रागांगवर्गीकरण पद्धती#लक्षणगीत#व्यंकटमखी#संगीत, कर्नाटक#संगीत, हिंदुस्थानी#सरगम#सुगम शास्त्रीय संगीत#स्वरसप्तक
समीक्षक : सुधीर पोटे