वल्लभाचार्य : (१४७९—१५३१). वल्लभ पंथ, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय, पुष्टिमार्ग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या एका भक्तीमार्गी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक. ते तेलुगू ब्राह्मण होते. त्यांचे घराणे आंध्र प्रदेशातील कांकरव नावाच्या गावचे. कंकर खम्‌ल्ह, कांकरवाड ही ह्याच गावाची पर्यायी नावे. वल्लभाचार्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणभट्ट आणि आईचे इल्लमगरू. यलमागार, इल्लम्मागारू असाही तिच्या नावांचा निर्देश काही ठिकाणी आढळतो. गणपतीभट्ट हे त्यांचे आजोबा आणि गंगाधरभट्ट हे पणजोबा. वल्लभाचार्यांचे घराणे सोमयाजी असून त्यांच्या घराण्यातील पुरुषांनी शंभर सोमयज्ञ केले होते, असे म्हणतात. इ.स. १४७९ हे वल्लभाचार्यांच्या जन्माचे वर्ष मानले जात असले, तरी आख्यायिका असे सांगते की, लक्ष्मणभट्ट आपल्या कुटुंबियांसह वाराणसी (काशी) येथे असताना त्या शहरावर इस्लामी आक्रमण होणार, अशा वार्ता कानांवर येऊ लागल्या; त्यामुळे घाबरून लक्ष्मणभट्ट काशी सोडून अन्यत्र निघाले. वाट मध्य प्रदेशातील रायपूर जिल्ह्याच्या एका रानातून जात होती. ह्या रानाचे नाव ‘पंपारण्य’ व ‘चंपारण्य’ असे दोन प्रकारे दिले जाते. या रानातच इल्लमगरू प्रसूत होऊन तिच्या पोटी वल्लभाचार्यांचा जन्म १४८१ साली झाला.

वल्लभाचार्य आठ वर्षांचे होताच त्यांच्या वाडिलांनी त्यांचे उपनयन करून विष्णुचित्तनामक गुरुंकडे त्यांना अध्ययनार्थ पाठविले. वेदांचे अध्ययन त्यांनी अनेक गुरूंकडे केले. त्रिरम्मलय, अंधनारायण दीक्षित आणि माधवयतींद्र ह्यांचा ह्यांत समावेश होतो. हे सर्व माध्वमताचे होते; तथापि वल्लभाचार्यांना मात्र माध्वमत मान्य नव्हते. त्यांचा पंथ अद्वैती आहे. भागवत, ब्रह्मसूत्रे आणि गीता ह्यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. षड्दर्शने, पुराणे इत्यादींचेही त्यांनी अध्ययन केल्याचे उल्लेख आढळतात. १४८९ साली आपले अध्ययन पूर्ण करून ते घरी परतले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी निघाले असता तिरुपती येथे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यात्राकालात त्यांनी काशी व जगन्नाथपुरी येथील अनेक विद्वानांशी वादविवाद केला आणि ते वल्लभाचार्य म्हणून मान्यता पावले.

इ.स. १५०२ मध्ये वल्लभाचार्यांनी विवाह केला होता. महालक्ष्मी हे त्यांच्या पत्‍नीचे नाव. गोपीनाथ आणि गोस्वामी विठ्ठलनाथ असे दोन पुत्र त्यांना होते. त्यांच्या लक्ष्मी ह्या मुलीचा विवाह चैतन्य महाप्रभूंशी झाला होता, असाही एक उल्लेख आढळतो.

देवदमन वा श्रीनाथजी ह्या रूपाने गोवर्धन पर्वतावर प्रकट होऊन श्रीकृष्णाने वल्लभाचार्यांना दृष्टान्त दिला आणि कृष्णमंदिर बांधून नवा भक्तिसंप्रदाय सुरू करण्यास सांगितले, अशी पुष्टिमार्गाच्या अनुयायांची श्रद्धा आहे.

वल्लभाचार्यांचे तत्त्वज्ञान ‘शुद्धाद्वैत’ या नावाने ओळखले जाते. वल्लभाचार्यांचा संप्रदाय नवा असला, तरी त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञान त्यांनी विष्णुस्वामींच्या रुद्र संप्रदायातून घेतले. अग्नीपासून स्फुल्लिंग निघावेत, तसे ईश्वरापासून जीव निघतात. जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून ईश्वर व जीव ह्या दोघांत अद्वैत असते; ब्रह्म हे मायासंबंधरहित शुद्ध आहे, ही ह्या तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आहेत.

पुष्टिमार्गातील भक्तीचे स्वरूप पाहता त्याचे अनुयायी श्रीकृष्णाला सर्वोच्च ब्रह्म मानतात. श्रीकृष्ण हा कर्ताही आहे; भोक्ताही आहे. स्वतःच्या इच्छेने तो जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय.

वल्लभाचार्यांनी अनेकदा तीर्थयात्रा केल्या. त्या करीत असताना त्यांनी आपल्या नव्या पंथाचाही प्रचार केला. त्यांना अनेक शिष्य लाभले. दामोदर, शंभू, स्वभू, स्वयंभू, कृष्णदास अधिकारी, कुंभन दास, परमानंद दास, सद्‌दू पांडे, रामदास चौहान, कृष्णदास ह्यांचा त्यांत समावेश केला जातो. अंधकवी आणि कृष्णभक्त सूरदास ह्यांनीही त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते, असे म्हटले जाते. वल्लभाचार्य हे पंढरपूरलाही येऊन गेले होते. वल्लभाचार्यांच्या दक्षिण यात्रेत विजयानगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात अनेक विद्वानांशी त्यांनी वादविवाद केला व त्यात त्यांना विजय मिळाला. त्यांच्यावर संतुष्ट झालेल्या कृष्णदेवरायाने त्यांच्यावर कनकाभिषेक करून त्यांचा सन्मान केला. श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार गोवर्धन येथे श्रीनाथमंदिर बांधण्याची त्यांची उत्कट इच्छा १५०२ मध्ये प्रत्यक्षात येऊ लागली. अंबाला येथील पूरणमल खत्री ह्यांनी वल्लभाचार्यांच्या प्रेरणेने हे मंदिर बांधावयास प्रारंभ केला व ते यथावकाश पूर्ण झाले. त्यानंतर ते अडैल येथे आले आणि प्रपंच-परमार्थात काळ घालवू लागले. वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांनी प्रयागला जाऊन संन्यास घेतला. काशीच्या हनुमानघाटावरून गंगेत उडी घेऊन त्यांनी आत्मसमर्पण केले, असे म्हणतात.

वल्लभाचार्यांनी ८४ ग्रंथ रचिले, असे म्हणतात; तथापि त्यांच्या नावावर ३१ ग्रंथच असल्याचे दिसते. त्यांत विशेष महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे भागवतपुराणावरील सुबोधिनी ही टीका, तत्त्वार्थदीप अथवा तत्त्वदीपनिबंध, ब्रह्मसूत्र-अणुभाष्य, जैमिनीभाष्य आणि षोडशग्रंथ हे होत. षोडशग्रंथ हा १६ ग्रंथांचा एक समूह आहे. त्यात यमुनाष्टक, बालबोध, सिद्धांतमुक्तावली, पुष्टिप्रवाहमर्यादाभेद, सिद्धांतरहस्य, नवरत्न, अंतःकरणप्रबोध, विवेकधैर्याश्रय, कृष्णाश्रय, चतुःश्लोकी, भक्तिवर्धिनी, जलभेद, पंचपद्य, संन्यासनिर्णय, निरोधलक्षण आणि सेवाफल ह्यांचा समावेश होतो. ह्यांशिवाय त्यांनी मधुराष्टक, श्रीकृष्णाष्टक, गोपीजन-वल्लभाष्टक, अशी काही अष्टकेही लिहिली आहेत.

संदर्भ :

  • Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems, Strassburg, 1913.
  • Bhatt, G. H.; Bhattacharya, H. Ed. The School of Vallabha, Calcutta, 1953.
  • Marfatia, Mrudula I. The Philosophy of Vallabhacarya, Delhi, 1967.
  • Parekh, Bhai Manilal C. Shri Vallabhacarya : Life, Teachings and Movement, Rajkot, 1943.
  • https://www.harekrsna.com/philosophy/gss/sadhu/sampradayas/siva/vallabha.htm
  • https://www.stephen-knapp.com/vallabhacarya.htm