जगातील सर्वांत मोठी व प्रेक्षणीय कॅन्यन (घळई वा निदरी). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील ॲरिझोना राज्याच्या वायव्य भागात असलेल्या ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क या राष्ट्रीय उद्यानात (स्था. १९१९) जवळजवळ संपूर्ण ग्रँड कॅन्यनचा समावेश होतो. कोलोरॅडो नदीच्या लाखो वर्षांतील झीज होण्याच्या क्रियेने (क्षरण कार्याने) कोलोरॅडो पठार खोदले वा कापले जाऊन कोलोरॅडो नदीच्या पात्रात ही कॅन्यन तयार झाली आहे. हिच्या उत्तर टोकाशी टॉवर फॉल्स हा धबधबा असून त्याची उंची सुमारे ४० मी. आहे. ग्रँड कॅन्यनची लांबी ४४६ किमी. असून सरासरी खोली १.६ किमी. आहे. काही भागांत ती १.५४ ते २.४४ किमी. खोल आहे. माथ्यालगत तिची रुंदी ०.२ ते २९ किमी. दरम्यान आहे. ग्रँड कॅन्यनमधील वैशिष्ट्यपूर्ण खडकांची संरचना व भूदृश्य यांमधील परस्परसंबंध ठळकपणे दिसून येतात. या भागातील दीर्घकालीन सरासरी हवामानाचाही येथील भूदृश्यांवर परिणाम झालेला दिसून येतो. चुनखडक, वालुकाश्म, शेल व इतर खडकांचे बनलेले कोलोरॅडो पठार जवळजवळ सपाट आहे. यांतील काही खडक कमी प्रमाणात झिजतात, तर काही खडकांची झीज जास्त प्रमाणात होते. त्यामुळे येथे पायर्‍यापायर्‍यांसारखे गुंतागुंतीचे वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य निर्माण झाले आहे. येथे अशा प्रकारची झीज होण्याची विविध कारणे असून त्यांपैकी शुष्क वा अर्धशुष्क हवामान हे एक कारण आहे. या हवामानानुसार तेथील वनस्पतींचे स्वरूप निश्चित झालेले असून नदीमुळे होणार्‍या झिजेचे परिणामही स्पष्टपणे दिसून येतात. ही झीज होत असतानाच येथील पठार वेळोवेळी वर उचलले गेले. त्यामुळे या पठाराच्या भूवैज्ञानिक इतिहासातील गुंतागुंत वाढत गेली. अशा प्रकारे भूवैज्ञानिक प्रक्रिया, खडकांचे प्रकार व संरचना, तसेच अगदी अलीकडच्या काळातील या भूप्रदेशाचा भूवैज्ञानिक इतिहास या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ग्रँड कॅन्यन या भूदृश्याची उत्क्रांती होत आहे.

टॉवर फॉल्स धबधबा

ग्रँड कॅन्यनमध्ये खडकांचे विविध रंगाचे व छटांचे थर आहेत. हे रंग व छटा यांचे उठाव दिवसभरात बदलताना दिसतात. सूर्यास्ताच्या वेळी या कॅन्यनच्या भिंतीतील तांबडी व तपकिरी छटा असणारे खडकांचे थर विशेषत: चमकदार व तेजस्वी दिसत असल्याने ते नजरेत भरतात. तसेच अशा रंगीत खडकांचे हजारो सुळके व ब्यूट (स्कंधगिरी) येथे आढळतात. त्यांमुळे येथील देखावा अपूर्व व थक्क करणारा आहे. ग्रँड कॅन्यनमधील उभ्या तटाच्या पिवळ्या रंगाच्या खडकांवरूनच येथील उद्यानाला यलोस्टोन हे अनुरूप नाव दिले आहे.

हवामान : ग्रँड कॅन्यनमधील दीर्घकालीन सरासरी हवामान पुढीलप्रमाणे असते. या कॅन्यनच्या तळाशी असलेले तापमान हे तिच्या माथ्याजवळ असलेल्या तापमानापेक्षा १४० से. इतके अधिक असू शकते. कॅन्यनच्या सर्वांत उंच कडेवर पर्जन्यमान ६६ सेंमी. असते. उंची व हवामान यांच्यातील फेरबदलांनुसार या कॅन्यनचे अनेक क्षेत्रविभाग होतात आणि त्यांच्यानुसार तेथील वन्य जीवजातींमध्ये खूप वैविध्य आढळते.

वन्यजीव : ग्रँड कॅन्यनमध्ये बीव्हर, मोठ्या शिंगांच्या मेंढ्या, सरडे, एल्क, डोंगरी सिंह, खेचर मृग (म्यूल डीअर) प्रोंगहॉर्नस, साप इत्यादी प्राण्यांच्या सुमारे ६०, तर पक्ष्यांच्या सुमारे १०० जाती आढळतात; तसेच येथे २५ प्रकारचे उभयचर व सरीसृप प्राणी आणि कित्येक प्रकारचे मासेही आहेत. पांढर्‍या शेपटीची कैबाब खार आणि गुलाबी रंगाचा ग्रँड कॅन्यन खडखड्या साप (रॅट्ल स्नेक्स) हे प्राणी फक्त या क्षेत्रात आढळतात.

वनश्री : ग्रँड कॅन्यनच्या कडेशी पाँडेरोसा पाईन वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत व ते झपाट्याने वाढतात. ॲस्पेन, फर व स्प्रूस हे वृक्ष उत्तरेकडील सर्वांत उंचावरील भागात आढळतात; तर दक्षिणेकडील बाजूस अधिक खालच्या भागात जूनिपर व पिनॉन पाइन वृक्ष आढळतात. ग्रँड कॅन्यनच्या सर्व क्षेत्रांत, विशेषत: खालील क्षेत्रांत, फड्या निवडुंगाची वाढ होते.

इतिहास : ग्रँड कॅन्यनच्या सर्वांत खोल भागातील काही खडक सुमारे २ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. कोलोरॅडो नदीमुळे ग्रँड कॅन्यन, निर्माण होण्याची सुरुवात सुमारे ६० लाख वर्षांपूर्वी झाली. हजारो वर्षांमध्ये येथील खडकांचे थर नदीच्या पाण्याद्वारे झिजत जाऊन ही कॅन्यन निर्माण होत गेली. कॅन्यनच्या भिंतींमध्ये आढळलेल्या जीवाश्मांवरून (शिळारूप झालेल्या जीवांच्या अवशेषांवरून) या क्षेत्रामध्ये वनस्पती व प्राणी लाखो वर्षांपासून राहत असल्याचे दिसून येते. गेल्या सुमारे चार हजार वर्षांमध्ये येथे अमेरिकन इंडियन (रेड इंडियन) लोकांच्या विविध जमाती राहत असाव्यात. सुमारे २०११ या काळात या भागात हवासुपाई या इंडियन जमातीचे जवळजवळ ४५० सदस्य असावेत. ते हवासू कॅन्यन नावाच्या पार्श्व (बाजूच्या) कॅन्यनमधील राखीव क्षेत्रात राहत होते. गर्सिआ लोपेझ थे कार्देनास यांच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश समन्वेषकांच्या एका तुकडीने १५४० मध्ये पहिल्यांदा ही कॅन्यन पाहिली. ती पाहणारे हे पहिले यूरोपियन होत. ही तुकडी म्हणजे फ्रान्सिस्को व्हास्केस दे कोरोनादो यांच्या या भागातील मोहिमेचा एक भाग होती. पुढे १८६८-६९ व १८७०-७१ मध्ये अमेरिकन भूवैज्ञानिक मेजर जॉन वेस्ली पॉवेल यांनी कोलोरॅडो नदीच्या अभ्यासासाठी छोट्या नावेतून द्रुतवाहांवरून व ग्रँड कॅन्यनमधून मोठा धोका पतकरून प्रवास केला. त्यांनीच या कॅन्यनला ग्रँड कॅन्यन हे नाव दिले. दरवर्षी देश-विदेशांतून लक्षावधी पर्यटक ग्रँड कॅन्यनला व ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कला भेट देतात.

समीक्षक : वसंत चौधरी