नदी किंवा जलप्रवाहासारख्या वाहत्या पाण्याने भूपृष्ठ खोदले वा कापले जाऊन तयार झालेल्या अरुंद निदरीला किंवा घळईला कॅन्यन म्हणतात. कॅन्यनच्या बाजू तीव्र उताराच्या म्हणजे उभ्या कड्यासारख्या असतात. अशा भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या बाजू असणारी नदीची खोल निदरी बहुधा रुक्ष, पठारी प्रदेशांत आढळते. रुक्षपणामुळे नदीच्या उपनद्या नसतात. झीज घडविणार्‍या इतर कारकांच्या तुलनेत नदीने होणारे झीजकार्य अधिक जलदपणे वा वेगाने होते. खडकाळ प्रदेशातून नदी आपले पात्र खोल खोल कोरीत नेते; तेव्हा पात्राच्या बाजूचे खडक कठीण असतील, तर ते उभे कापले जातात. पात्राच्या तळाची झीज होत राहून ते अधिकाधिक खोल होत जाते व त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती तशाच राहतात. यामुळे उभी अरूंद दरी म्हणजे कॅन्यन तयार होते. अमेरिकेतील ग्रँड कॅन्यन, यलोस्टोन, स्नेक, कोलंबिया या प्रसिद्ध कॅन्यन आहेत. कोलोरॅडो नदी पात्रातील ग्रँड कॅन्यन जगप्रसिद्ध आहे. काही कॅन्यनमध्ये प्राचीन काळी जेथे मानवाने वस्ती केली होती, अशा गुहा व त्यांतील भित्तिचित्रे आढळली असून त्यांचा शास्त्रज्ञ अभ्यास करतात.

महाबळेश्वरच्या ईशान्य भागात कृष्णा नदीच्या उगम प्रवाहांनी डेक्कन ट्रॅप बेसाल्टी लाव्ह्याच्या आडव्या थरांमध्ये खोदलेल्या सुमारे ७०० मी. खोलीच्या कॅन्यन प्रेक्षणीय आहेत. हिमालयात सिंधू नदीने आणि हिंदुकुश पर्वतात ऑक्सस नदीने खोल कॅन्यन कोरल्या आहेत. समुद्राच्या

सिंधू नदीची कॅन्यन

तळावरही कॅन्यन आढळतात. गंगा, हडसन, काँगो यांसारख्या मोठ्या नद्यांच्या मुखापासून आतल्या भागात समुद्रतळावर मोठमोठ्या कॅन्यन आढळतात.

पर्वतीय भागांतही हिमनद्यांद्वारे कॅन्यन निर्माण होतात. अशा कॅन्यनचा आकार बहुधा इंग्रजी ‘यू’ (U) अक्षरासारखा असतो; मात्र जलप्रवाहांद्वारे बनलेल्या कॅन्यनचा नमुनेदार आकार उभट इंग्रजी ‘व्ही’ (V) अक्षरासारखा असतो. फ्योर्ड नावाने ओळखले जाणारे अरुंद उपसागर किनारी प्रदेशांत तयार होतात. तेथे हिमनद्यांनी तयार झालेल्या कॅन्यनमध्ये समुद्राची पातळी वाढल्याने पूर येतात. प्रस्तरभंगाने म्हणजे दोन प्रस्तरभंगांदरम्यानच्या भूकवचात वर-खाली स्थानांतर झाल्यानेही कॅन्यन निर्माण होऊ शकतात. समुद्राच्या तळावरील अनेक मोठ्या कॅन्यन प्रस्तरभंगाने निर्माण झाल्या आहेत.

समीक्षक : अ. ना. ठाकूर