भारतात लोकवनस्पतिविज्ञानाची परंपरा प्राचीन काळापासून रुजली आहे. वनौषधींची माहिती आयुर्वेद ग्रंथात संकलित केली जाऊन तिचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. ही माहिती संस्कृत भाषेत किंवा स्थानिक भाषेत उपलब्ध आहे. लोकवनस्पतिविज्ञानाची माहिती लिखित स्वरूपात मिळण्याआधी मौखिक पद्धतीने दिली जात असे. परिणामी आता बरीचशी महिती अनुपलब्ध अथवा नाहीशी झाल्याचे समजते.

अलाहाबाद येथील वनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासिका श्रीमती जानकी अम्मल (१८९७-१९८४) यांनी आदिवासी विभागांत फिरून त्याचे पारंपरिक ज्ञान एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्या लोकवनस्पतिविज्ञान विषयाच्या जनक समजल्या जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अलाहाबाद येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मध्यवर्ती वनस्पती प्रयोगशाळेत १९६० मध्ये लोकवनस्पती विषयाचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला गेला.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक सुधांशुकुमार जैन यांनी उतर प्रदेश व मध्य प्रदेश या ठिकाणी संचालक पदावर असताना लोकवनस्पतिविज्ञानाची माहिती मोठ्या प्रमाणावर संकलित केली. त्यांनी Society for Ethnobotany (SEB) नावाची सोसायटी स्थापन करून मुखपत्र चालविले. त्यांत सोसायटी वार्ता आणि शोधपर निबंधाचा गोषवारा प्रसिद्ध होऊ लागला. सोसायटीच्या माध्यमातून लोकवनस्पतिविज्ञान विषयाचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले.

लोकवनस्पतिविज्ञान विषयांमध्ये त्यानंतर अनेक वनस्पती जाणकारांनी आदिवासी वापरत असलेली माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांचे राहणीमान, वनस्पतींवर असलेली त्यांची उपजीविका यांचा समावेश करण्यात आला. वादन व नाच यातून आदिवासी आपल्या कला सादर करीत असतो. त्यांच्या अनेक वाद्यांत वनस्पतींचे भाग वापरात आहेत. तारपा व ढोल यासाठी दुधीभोपळा, शिवण लाकूड यांचा ते उपयोग करतात. त्यांचे निसर्गाशी नाते जोडले गेले असल्याने तेच निसर्गाचे संरक्षण करतात. वाघ, काळकाई, ताडोबा, वान्जाई, खंडोबा, बापुजिबुया या वनांतील देवदेवतांच्या उत्सवादरम्यान आदिवासी खास पदार्थ तयार करून देवास वाहतात. या देवता ज्या वनांत असतात, त्या वनांना देवराई असे म्हणतात.

भारतातील वन्य प्रदेशात सु. ५५० जमातींचे आदिवासी राहतात. ते जंगलातील झाडे ओळखून त्याचा उपयोग कशासाठी करावयाचा हे ठरवितात. शेती, रानभाज्या, आजार, धान्य साठविण्यासाठी कणगी, जंतुनाशके, घरासाठी लाकडे, जनावरांना चारा अशा विविध प्रकारे वनातील उत्पादनांचा उपयोग केला जातो. याची नोंद लोकवनस्पतिविज्ञान विषयात करण्यात येते. उपयुक्ततेच्या प्रकाराप्रमाणे या विज्ञानाच्या अनेक उपशाखा मान्य झालेल्या असून त्यासाठी सखोल माहिती नोंदविली जात आहे. उदा., मानवजाति-पशुविकारविज्ञान (Ethno – Veterinary), मानवजाति-कृषिविज्ञान (Ethno – Agriculture), मानवजाति – जीवविज्ञान (Ethno – Biology),  मानवजाति – वैद्यक – वनस्पतिविज्ञान (Ethno – Medico – Botany), मानवजाति – औषधिविज्ञान (Ethno – Pharmacology), मानवजाति – स्त्रीरोगविज्ञान (Ethno-Gynaecology), मानवजाति – संगीतविज्ञान (Ethno – Musicology) इत्यादी.

लोकवनस्पतिविज्ञान विषयाची व्यापकता आणि भविष्य लक्षात घेता भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालायाने मानवजाति – जीवविज्ञान हा प्रकल्प राबविला, त्यात देशातील  २० संस्थांनी काम केले. १५ वर्षांच्या कालावधीत देशाच्या कानाकोपरा व आदिवासी समूहातून या विषयाची माहिती गोळा केली गेली. यातून १० हजारपेक्षा अधिक वनस्पतींची उपयोगी महिती संकलित करण्यात आली असून त्यांत  ८ हजार औषधी वनस्पती आणि चारशे ते पाचशे खाद्योपयोगी वनस्पती नोंदल्या गेल्या.

विज्ञानाशी संबंधित राष्ट्रीय संस्थांनी अनेक प्रकल्प पुरस्कृत करून याविषयाची व्यापकता वाढवली. जगातील १२२ प्रकारच्या आधुनिक औषधांची निर्मिती वनस्पतींपासून झाली असून त्यापैकी आदिवासींकडून उपलब्ध झालेल्या ज्ञानातून ७० टक्के औषधे तयार झाली आहेत.

संदर्भ :

  • Jain, S.K. (Ed) A manual of Ethnobotany, Scientific Publisher, Jodhpur, India,1987.
  • Vartak, V.D. &  Gadgil, M. Studies in Ethnobotany : A new vista in botanical sciences, Biovigyanam, 6: 151-156, 1980.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : डॉ. बाळ फोंडके