पाण्याच्या अतिरेकामुळे बहुसंख्य वनस्पतींचे जगणे अशक्य होत असले, तरी काही वनस्पती-प्रजाती मात्र प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने वाढतात. अशा वनस्पतींना वनस्पतिवैज्ञानिकांनी पाणथळ जमिनीतील ‘वनस्पती प्रजाती’ असे नाव दिले आहे. समुद्रकिनार्यावर, नदीकाठी अथवा तलावाच्या सान्निध्यात अशा वनस्पती दृष्टीस पडतात. या वनस्पतींमध्ये पाण्याचा अतिरेक सहन करण्याची क्षमता कशी विकसित झाली याचे संशोधन जगभराच्या अनेक प्रयोगशाळांतून झाले आहे.
ऑक्सिजनचा अभाव हेच सर्व अनर्थाचे मूळ असल्यामुळे पाणथळ जमिनीत वाढणार्या मुळांना जमिनीपासून वर असलेल्या आणि सूर्यप्रकाशात वाढणार्या पाने व खोड यांच्याद्वारे होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा वेगाने झाला, तर त्यांना विनॅाक्सिश्वसन (अवायु-श्वसन) करण्याची जरुरी पडणार नाही. मात्र असा पुरवठा करण्यासाठी वनस्पतींच्या शरीरात काही बदल होणे आवश्यक आहे. काही पेशींचा विलय होऊन अथवा त्या एकमेकांपासून वेगळ्या होऊन, हवा खेळती राहील अशी मोकळी क्षेत्रे निर्माण झाली, तर मुळांना हवा तेवढा ऑक्सिजन जमिनीवर असलेल्या पानांवाटे घेता येईल आणि नेमके हेच अंतर्गत शारीरिक बदल पाणथळ वनस्पतींत होत असतात, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.
समुद्रकिनार्यावर, खाडीच्या काठी खारफुटी वनस्पतींची श्वसनमुळे (Pneumatophore) उलटी वाढून जमिनीवर येतात व ती सच्छिद्र बनतात. अशा मुळांतूनही ऑक्सिजनचा पुरवठा जमिनीखालील मुळांना होतो. याखेरीज पाणथळ वनस्पतींच्या मुळांमधील चयापचयाच्या क्रियेतही काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. या वनस्पतींच्या मुळांमध्ये विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेत ‘एथिल अल्कोहॉल’ अथवा ‘लॅक्टिक आम्ल’ या उपद्रवकारी संयुगाऐवजी ‘मॅलिक आम्ल’, ‘ॲनिलीन’, ‘सक्सिनिक आम्ल’ व ‘मेदाम्ले’ (Fatty Acid) आदिंची निर्मिती होते व यामुळे पेशींचे रक्षण होऊन त्यांना अपाय होत नाही.
अपायकारक लॅक्टिक आम्ल मुळांद्वारे झाडाबाहेर जमिनीत सोडण्यास अथवा एथिल अल्कोहॉल पानांद्वारे हवेत सोडण्यास काही वनस्पती सक्षम असतात. यांशिवाय काही पाणथळ वनस्पतींच्या पानांपासून मुळांना शर्करेचा अधिक प्रमाणात पुरवठा होतो. त्यामुळे विनॉक्सिश्वसन सुरू ठेवूनही ही मुळे वाढीसाठी आवश्यक तितकी ऊर्जानिर्मिती करू शकतात.
संदर्भ :
- Lovelock, C.E, Ruess, R.W & Feller, I.C,“Fine root respiration in the mangrove Rhizophora mangle over variation in forest stature and nutrient availability”.Tree Physiology ,12:1601-06,2006.
- Mangrove Roots: https://www.youtube.com/watch?v=odxTUzJZnA.
समीक्षक : नागेश टेकाळे