गुळवणी, मुरलीधर गोपाळ : (६ फेब्रुवारी १९२५ – १८ डिसेंबर २०००). महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक व शिक्षक. पन्हाळा परिसरातील इतिहासाचे पुरावे गोळा करून त्याचे विश्लेषण करणे हा त्यांचा निदिध्यास होता. आदिलशहाने किल्ले पन्हाळा येथे स्थापन केलेल्या दत्तमंदिराचे पुजारीपण व नंतर छ. शिवाजी महाराजांचे पुरोहितपण परंपरेने लाभलेल्या कोल्हेरभट गुळवणी ह्यांच्या ११व्या पिढीतले वारसदार. जन्म पन्हाळा येथे. वडील पेशाने पुजारी, ज्योतिषी व वैदिक. मु. गों. चे ज्योतिषशास्त्राचे, विविध सूक्तांचे व वेदांचे अध्ययन घरीच त्यांच्या चुलत्यांपाशी झाले. पन्हाळ्याच्या ए.व्ही. हायस्कूलमध्ये मराठी ७ वी पर्यंत, पन्हाळा हायस्कूलमध्ये १० वी पर्यंत शिक्षण. नंतर कोल्हापूरच्या न्यू हायस्कूलमधून ११ वी मॅट्रिक झाल्यावर लगेचच काही काळ मामलेदार कचेरीत उमेदवारी केल्यावर पन्हाळा हायस्कूलमध्ये गणित व संस्कृत शिक्षकाची नोकरी धरली. त्याच वेळी बाहेरून परीक्षा देऊन बी.ए.(इतिहास) व बी.टी. झाले. वडिलांचे निधन, वतने खालसा झालेली व कुळकायद्यात जमिनी गेलेल्या, त्यामुळे कुटुंबाची स्थिती हलाखीची होती. म्हणूनच इतिहासाची आत्यंतिक आवड असूनही त्यांनी अध्यापन हा उदरनिर्वाहाचा पेशा आणि इतिहास – संशोधन हे जीवितसाध्य ठरवून टाकले. त्यादृष्टीने पन्हाळ्यासारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणचे त्यांचे वास्तव्य हे पोषक ठरले.
त्यांनी ऐतिहासिक संदर्भ साधने आणि कागदपत्रांवर आधारित काही छोट्या ऐतिहासिक कथा व प्रबोधनपर कविता लिहिल्या आहेत. तसेच, संशोधनावर आधारित पुस्तकेही त्यांनी लिहिली. पंत आम्ही निघालो, जय केदार, सादोबा, पन्हाळा, पन्हाळगड ते विशाळगड, यादवेंद्र स्वामी, करवीरचा खजिना, ऐतिहासिक मौलिक संशोधने, हुकुमत पनाह,स्वातंत्र्याचा फटका, गुळवणी कुलवृत्तांत, आकाशाशी जडले नाते ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. पन्हाळ्याच्या परिसरातील समग्र ठिकाणांचा इतिहास त्यांना मुखोद्गत होताच, पण तो सांगताना श्रोत्यांच्या मन:चक्षूंपुढे तो प्रसंग जिवंत होईल अशी कथनशैली अवगत होती.
लहानपणापासूनच त्यांना जुन्या पोथ्या, नाणी, अवशेष गोळा करण्याचा छंद होता. मोठेपणी त्यात कागदपत्रे, दस्तऐवज, शस्त्रे, मूर्ती, शिलालेख, ताम्रपट, जुनी (१८०० सालापासूनची) लाटकर व पारनेरकर ह्यांची पंचांगे, वगैरे ऐतिहासिक साधनांची भर पडत गेली. त्यांचा आधार घेत, दऱ्याखोऱ्यातून भटकंती करून त्यांनी अज्ञात इतिहासाचा शोध घेतला आणि चुकीचा इतिहास खोडून त्यातून सत्याचे दर्शन घडविले. शिवा काशिद, जोत्याजी केसरकर, धनाजी जाधव, बाजीप्रभु व फुलाजीप्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीरांच्या अनुक्रमे नेबापूर, पुनाळ, पेठवडगाव आणि विशाळगड येथील समाध्या प्रयत्नपूर्वक शोधून त्यांनी त्या पुराव्यानिशी सिद्ध केल्या. तसेच छ. राजसबाई, कोल्हापूरचे पहिले छ. शिवाजी ह्यांच्या समाध्या, जखुबाई तेलीण प्राणार्पणस्थळ, पन्हाळ्याचे प्राचीन प्रवेशद्वार, बालेकिल्ला व अंबरखाना, छ. शिवरायांचे निवासस्थान, प्राचीन गुहा, फारसी शिलालेख, बारद्वार हे संभाजी महाराजांचे आडवाटेवरचे टेहळणीचे ठिकाण, ह्या पन्हाळ्यातील अज्ञात ठिकाणांचाही अचूक वेध त्यांनी घेतला. तसेच करवीरचे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नीचे पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेले स्मृतिमंदिर, हे काल्पनिक कथेची नायिका थोरातांच्या कमळेचे थडगे नाही हे सिद्ध केले आणि छ. संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरील डाग सप्रमाण पुसून टाकण्याचे मौलिक कार्य केले. रामदासकालीन मारुती व पोहाळे येथील लेणी त्यांनी शोधून काढली. पन्हाळ्यावरच्या प्रसिद्ध तीन दरवाजांची बारकाईने पाहणी करून पहिल्या व तिसऱ्या दरवाजाच्या कमानी मुस्लिमकालीन, पण दुसऱ्या दरवाजावरील नागाच्या फणीवरून तो भोजकालीन असावा असा दृढ निष्कर्ष त्यांनी काढला.
भालजी पेंढारकर, गो.नी.दांडेकर, द.वा.पोतदार व ग.ह.खरे हे इतिहासप्रेमी त्यांचे जिवलग मित्र, तर ब.मो.पुरंदरे, जयसिंगराव पवार, अमर अडके हे पुढच्या पिढीतील इतिहासाभ्यासक त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी पन्हाळ्याला येत असत. १९५५ मध्ये ते भारत इतिहास संशोधन मंडळाचे तहहयात सभासद झाले आणि त्यांच्या मोडीवाचनाला गती मिळाली. त्यांनी भालजी पेंढारकरांच्या सल्ल्यानुसार पन्हाळे येथे शिवसंस्कृती मंडळाची स्थापना २० मार्च १९६४ रोजी केली आणि संशोधनात सापडलेली सर्व ऐतिहासिक साधने तिथे वस्तुसंग्रहालय निर्माण करून त्यात ठेवली.
कर्मठ कुटुंबातले असले तरी ते जात, धर्म असा भेदभाव करीत नसत. पन्हाळ्यातील मोहरमसारख्या मुस्लीम सणातही सहभागी होत व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत, प्रसंगी त्यांना घरी राहायला ठेवून घेत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, स्वाभिमानी, पण कमालीचा प्रसिद्धीपराङमुख होता आणि वृत्ती समाधानी होती. पन्हाळ्यातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदराची भावना होती. फाय फौडेशन, इचलकरंजीचा पुरस्कार, पन्हाळाभूषण गौरव, विद्याशंकर भारती, शंकराचार्य मठ,कोल्हापूर यांचा इतिहासभूषण पुरस्कार इत्यादी काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
दम्याच्या विकाराने त्यांचे निधन झाले.
संदर्भ : गुळवणी, व. मु., मु. गों च्या आठवणी, कोल्हापूर, २००२.