श्रीपती पंडित : (अकरावे शतक). वीरशैव पंथा(लिंगायत पंथा) च्या तत्त्वज्ञानाची सुसूत्र मांडणी करणारे थोर पंडित. ‘पंडिताराध्य’ ह्या नावानेही प्रसिद्ध. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाटिका (बेझवाडा) येथे झाला. वेद, उपनिषदासोबतच इतिहास, पुराण व आगम या विषयांतही ते निपुण होते. आंध्र प्रदेशातल्या अनंतपाल ह्या राजाच्या पदरी हे आस्थान पंडित होते. पुढे ते संन्यासी झाले. वीरशैव तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा श्रीकरभाष्य हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला, त्याच्या मंगलाचरणात रेवण, मरुळ आणि एकोराम ह्या वीरशैव आचार्यांना त्यांनी आदरपूर्वक वंदन केलेले आहे. एकोरामाचार्यांचे ते शिष्य होते.

श्रीपती पंडितांचे श्रीकरभाष्य हे ब्रह्मसूत्रांवरचे भाष्य आहे. आपले तत्त्वज्ञान ब्रह्मसूत्रांशी सुसंगत आहे, असे दाखवून देण्याची आवश्यकता पूर्वीच्या पंडितांना वाटत असे. श्रीकरभाष्य लिहिताना श्रीपती पंडितांचीही हीच भावना होती. ब्रह्मसूत्रे वीरशैव तत्त्वज्ञानपर आहेत, हे श्रुतिवचनांच्या आधारे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाला विशेषाद्वैत, द्वैताद्वैत, सेश्वराद्वैत, शिवाद्वैत, सर्वश्रुतिसारमत व भेदाभेद ही पर्यायी नावे त्यांनी दिलेली आहेत. ह्या पर्यायी नावांची स्पष्टीकरणे अशी : ‘वि’ म्हणजे जीव आणि ‘शेष’ म्हणजे विश्वव्यापक शिव. ह्या वि-शेषांचे अद्वैत म्हणजे विशेषाद्वैत. जीव आणि शिव ह्यांच्यात द्वैत असले, तरीही शिवाचे सतत चिंतन आणि निदिध्यास ह्यांतून जीव स्वत:ला शिवत्व प्राप्त करून घेऊ शकतो. शिवतत्त्व हे अंतिम सत्य असून त्याच्याशी सायुज्यता साधण्यासाठी भक्ती हे साधन आहे. भक्त आणि शिव ह्यांचे द्वैत मानावे लागते; पण द्वैताची अद्वैतात परिणती होऊ शकते. स्वतंत्रपणे वाहणारी नदी अखेरीस सागराशी एकरूप होते म्हणून द्वैताद्वैत ही संज्ञा. सेश्वराद्वैत ह्या संज्ञेने ईश्वर हे आद्य तत्त्व असल्याचे सूचित केलेले आहे. तसेच ही संज्ञा ईश्वराशी जीवाचे अद्वैत दर्शविते. अग्नी आणि दाहकता किंवा शक्ती आणि शक्तिमान ह्यांच्यात जसे अद्वैत, तसेच जीव आणि शिव ह्यांच्यात अद्वैत असते. ह्या विश्वातील विविध वस्तू शिवाच्या इच्छेने निर्माण होतात; परंतु त्या शिवातच असतात. शिवापेक्षा त्यांना वेगळे अस्तित्व नसते, असे मांडणारे मत, ते शिवाद्वैत. श्रुतींमध्ये द्वैतपर आणि अद्वैती अशी परस्परांच्या विरुद्ध वाटणारी वचने आहेत; परंतु खरे तर त्यांच्यात विरोध नाही. झाडाच्या फांद्या, फुले, पाने, फळे अनेक असली, तरी त्यांचे बीज एकच असते. सर्व श्रुतींचे हे साररूप मत होय, म्हणून ह्या मताला सर्वश्रुतिसारमत हेही एक नाव आहे. शिव हा जसा विश्वाचे निमित्तकारण तसाच उपादानकारणही आहे. ईश्वराकडे जगाचे कारण होण्याची शक्ती असते; परंतु शक्ती आणि शक्तिमान वेगळे नसतात. ह्यातून ईश्वर आणि विश्व यांतील भेदाभेद सिद्ध होतो. तो प्रकट करणारे हे मत म्हणून त्याचे भेदाभेद हे नाव. जग आणि ईश्वर ह्यांच्यातील भेदाचे श्रीपती पंडितांनी प्रभावीपणे खंडन केलेले आहे.

श्रीपती पंडितांच्या मते जीव अनादी असला, तरी तो मल, कर्म आणि माया या पाशांनी बद्ध आहे. त्यामुळे त्याच्यात शरीराबद्दलचा अभिमान निर्माण होतो. आत्मा आणि शरीर ह्यांच्यातला भेद त्याला कळेनासा होतो. त्यामुळे निरनिराळ्या योनींत जन्म घेऊन त्याला सुखदु:खे भोगावी लागतात. जीव आणि शिव ह्यांच्यात चिच्छक्ती हा समान धर्म आहे; पण काही धर्म वेगळे वा परस्परविरुद्धही आहेत. उदा., जीव हा अणू आहे, तर शिव हा विभु किंवा सर्वव्यापी आहे. जीव अल्पज्ञानी, तर शिव सर्वज्ञ; जीवाला सुखदु:खे भोगावी लागतात, शिव हा नेहमी तृप्तच असतो; तथापि अग्नी आणि त्याचे स्फुल्लिंग ह्यांच्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म पूर्णपणे भिन्न नाहीत, तसेच एकरूपही नाहीत.

श्रीपती पंडितांनी मोक्षाबद्दल लिहिताना म्हटले आहे की, जीव व परशिव हे आरंभी स्वभावत:च भेदयुक्त असतात; पण अद्वितीय अशा परशिवब्रह्माचे ज्ञान झाल्यानंतर परमपुरुषार्थ (मोक्ष) असलेल्या परशिवाची प्राप्ती होते. हे शिवैक्य भक्तीमुळे, तसेच ज्ञानमार्गानेही प्राप्त होते. जीवाला मुक्ती ही जिवंतपणी मिळू शकते (जीवनमुक्ती) आणि मृत्यूनंतरही मिळू शकते. श्रीपती पंडितांच्या विवेचनानुसार जीवनमुक्तांच्या अंत:करणात असलेल्या अखंड ब्रह्मानुभवामुळे ते प्रपंचापासून दूर झालेलेच असतात; परंतु जिवंतपणी त्यांचा अंत:करणाशी संबंध असल्यामुळे जो काही थोडासा संपर्क राहिलेला असतो, तोही नाहीसा होतो आणि शिवकृपेने शिवैक्य होते. जीव पुनर्जन्मापासून मुक्त होतो.

श्रीपती पंडितांच्या मते प्रपंच हा मिथ्या नाही. तो स्वप्न नाही. जागेपणी स्वप्न संपेल; पण जागेपणीचे पदार्थ प्रत्यक्षच असतात. गाढ झोपेत असलेल्या माणसाला बाहेरच्या जगाचे भान नसते. त्याचप्रमाणे जीवनमुक्त माणसाला प्रपंचाचे भान नसते; पण त्यामुळे प्रपंचाला मिथ्या ठरविता येणार नाही.

श्रीपती पंडितांनी प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही तीन प्रमाणे मानून सिद्ध केलेले जगत्कारण चेतन, शिवस्वरूप आहे. त्या शिवाच्या सद्‌गुणरूपाप्रमाणेच त्याचे निर्गुणरूपही खरे आहे.

लिंगधारण आणि भस्मधारण हे वीरशैव पंथातले धार्मिक आचार आहेत. श्रीपती पंडितांनी त्यांना श्रुतींचा आधार दिला.

संदर्भ :

  • Dasgupta, Surendranath, A History of Indian Philosophy, Vols. 5, Delhi, 1991.
  • Prasoon, Shrikant, Indian Saints and Sages, New Delhi, 2009.
  • तगारे, ग. वा. शैवदर्शन, पुणे, १९८७.
  • सी. हयवदनराव, संपा. श्रीकरभाष्य, बंगलोर, १९३६.
  • https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/67762/10/10_chapter%201.pdf