व्यास, शंकरराव गणेश : (२३ जानेवारी १८९८ – १७ डिसेंबर १९५६). महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त संगीतकार, संगीत दिग्दर्शक व संगीतविषयक लेखक. त्यांचा जन्म गणेश आणि रमाबाई या दांपत्यापोटी कोल्हापूर येथे झाला. पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या कोल्हापूरात झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमास शंकरराव गेले होते (१००९). ते विष्णुबुवांच्या गाण्याने प्रभावित झाले आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचे शिष्यत्व पतकरले. शंकरराव मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे संगीताचे सर्वांगीण शिक्षण घेतले व वृन्दवादनाचे काही प्रयोगही केले (१९२२). तेथे शिकत असताना गायनाबरोबरच मँडोलिन व सतार या वाद्यवादनामध्येही त्यांनी प्राविण्य मिळविले. विद्यालय व्यवस्थापनामधील त्यांचा यशस्वी सहभाग पाहून पलुस्कर यांनी त्यांच्यावर लाहोर येथील गांधर्व महाविद्यालयाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी उत्तम तऱ्हेने पार पाडली.

शंकरराव १९२२ च्या उत्तरार्धात अहमदाबाद येथे स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी ‘गुजरात संगीत विद्यालयाची’ स्थापना केली. विष्णु दिगंबरांचे १९३१ साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यमंडळींकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’मध्ये व्ही. ए. कशाळकर, पं. नारायणराव खरे, वि. ना. पटवर्धन आदी शिष्यांबरोबरच शंकरराव व्यास यांचाही पुढाकार होता. १९३८ सालापासून सुमारे दहा वर्षे त्यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. १९३७ मध्ये त्यांनी व त्यांचे बंधू ख्यातकीर्त गायक नारायणराव व्यास यांनी व्यास संगीत विद्यालयाची स्थापना केली.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या संगीतकारांमध्ये शंकरराव व्यास यांची गणना होते. त्याकाळी वृन्दवादन आणि पार्श्वसंगीत हे विषय तसे नवीन होते. अहमदाबादमध्ये संगीतकार्य करीत असताना प्रख्यात चित्रकार कनू देसाई यांच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यावेळ कनू देसाई मुंबईच्या ‘प्रकाश पिक्चर्स’मध्ये कलादिग्दर्शक होते. त्यांनी शंकररावांना चित्रपटांना संगीत देण्याची संधी दिली. प्रकाशच्या पहिल्या सामाजिक चित्रपटास त्यांनी संगीत दिले. त्यांनंतर त्यांनी पाच मराठी, तीन गुजराथी व बत्तीस हिंदी चित्रपटांना संगीत दिले. यांच्या गायन, वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या ‘वैष्णव जन तो’ या भजनाची चाल शंकरराव यांचीच. संगीत कला विहार या १९४७ साली सुरू झालेल्या मासिकाचे आद्य संपादक शंकररावच होते. या मासिकाला त्यांनी उच्च दर्जा प्राप्त करून दिला. प्राथमिक संगीत (भाग १ व २), माध्यमिक संगीत (भाग १ व २), संगीत व्यासकृती भाग १ ते ४ ,ख्याल और तराणे भाग १ व २, सितारलहरी आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले.

शंकररावांना ख्यातकीर्त सरोदवादक रत्नाकर व्यास, सुभाष आणि पद्मा ही अपत्ये होत.

शंकररावांचे अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षण : सु. र. देशपांडे