हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारी मुंबई येथील ख्यातनाम संगीत संस्था. या विद्यालयाची स्थापना विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. शंकरराव गणेश व्यास (१८९८–१९५६) व त्यांचे बंधू पं. नारायणराव गणेश व्यास (१९०२–१९८४) यांनी जून १९३७ साली केली. सुरुवातीला संगीताचे वर्ग नारायणराव व्यास यांच्या हिंदू कॉलनीतील ‘व्यास भुवन’ या राहत्या घरी घेतले जात. पुढे जागा अपुरी पडू लागल्यामुळे दादर (पश्चिम) भागात संगीत विद्यालय सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन ग्वाल्हेर परंपरेचे विख्यात गायक पंडित मिराशीबुवा यांच्या हस्ते दसऱ्याला झाले.

पंडित विष्णु दिगंबर यांचे मुख्य ध्येय सर्वसामान्य जनतेमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार व आवड निर्माण करावी हे होते. तेच गुरुवर्यांचे कार्य व्यास बंधूंनी पुढे चालू ठेवले. प्रारंभिक वर्गापासून संगीत विशारद (पदवी समान) परीक्षेपर्यंतचे वर्ग आजही या विद्यालयात सुसूत्रपणे सुरू आहेत. गायनाबरोबरच तबला, हार्मोनियम, सतार, व्हायोलिन इत्यादी वाद्ये यांचेही शिक्षण या विद्यालयात दिले जाते. याचा अभ्यासक्रम अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या मान्यतेनुसार असून मंडळाच्या मिरज येथील रजिस्ट्रार कार्यालयाद्वारे या परीक्षा घेण्यात येतात. आजमितीस सु. ५००-६०० विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत (२०१७).

व्यास संगीत विद्यालय ही केवळ गायन-वादनाचे संगीत शिक्षण देणारी संस्था नसून संगीतविषयक चळवळीचे एक केंद्र आहे. त्यादृष्टीने या विद्यालयामार्फत विविध प्रसंगी संगीतविषयक अनेक चर्चासत्रे, व्याख्याने, प्रात्यक्षिके, मासिक संगीतसभा इत्यादी उपक्रम राबविले जातात. दरवर्षी या विद्यालयातर्फे ‘गुरुपौर्णिमा’ व ‘पलुस्कर पुण्यतिथी’ निमित्त विविध संगीत कार्यक्रम होत असतात.

आशा भोसले, प्रसाद सावकार, शंकर अभ्यंकर, विद्याधर व्यास, शरद जांभेकर, चंद्रकांत लिमये इत्यादी नामवंत कलाकारांनी आपली संगीतसाधना व्यास संगीत विद्यालयामध्ये केली.

विद्यालयाचे संस्थापक शंकरराव व्यास व नारायणराव व्यास यांच्या पश्चात त्यांचे उद्दिष्ट अखंड पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न पं. शंकरराव यांचे पुत्र सुभाषचंद्र व्यास व पं. नारायणराव यांचे पुत्र पं. विद्याधर व्यास हे व्यास बंधू करीत आहेत.

संदर्भ :

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा