विज्ञानामध्ये शोषण ही संज्ञा प्रामुख्याने वस्तुमानाचे शोषण आणि ऊर्जेचे शोषण (तरंगरूपी ऊर्जेचे) या दोन अर्थांनी वापरली जाते.
रासायनिक प्रक्रिया उद्योगामध्ये (उदा., खनिज तेल आणि इंधन शुद्धीकरण या प्रक्रियांमध्ये) वस्तुमानाचे शोषण म्हणजे प्रामुख्याने वायूचे शोषण होय. [वायुशोषण].
भौतिकीमध्ये शोषण हा प्रकार प्रामुख्याने तरंग ऊर्जेच्या संदर्भात अभ्यासला जातो. या प्रकारात एखाद्या माध्यमाद्वारे तरंग ऊर्जेचे शोषण केले जात असल्यामुळे त्यास ‘ऊर्जा शोषण (Energy Absorption)’ असेही म्हणतात. येथील विवेचनामध्ये ऊर्जा शोषणाचीच चर्चा केली आहे. विद्युतचुंबकिय तरंग, ध्वनितरंग अथवा अन्य कोणतेही तरंग यांची ऊर्जा त्यांच्या परमप्रसराच्या (Amplitude) वर्गाच्या समप्रमाणात असते. तरंग जसजसा एखाद्या माध्यमातून पुढेपुढे जातो तसतसा त्याचा परमप्रसर कमी कमी होत जातो. म्हणजेच उर्जा माध्यमाद्वारे शोषली जाते. एखादा तरंग एखाद्या माध्यमातून जात असताना त्याच्या ऊर्जेतील जर फारच थोडा भाग माध्यमात शोषला गेला, तर त्या तरंगासाठी ते माध्यम पारदर्शक आहे, असा निष्कर्ष निघतो. याउलट तरंगाची सर्व ऊर्जा जर एखाद्या माध्यमाद्वारे शोषली जात असेल, तर ते माध्यम त्या तरंगाला अपारदर्शक असते. काही माध्यमात ठराविक तरंगलांबीची प्रारणेच फक्त शोषली जातात. त्यामुळे त्या विशिष्ट तरंगाच्या बाबतीत ती माध्यमे अपारदर्शक असतात. उदा., निळ्या रंगाची काच ही निळ्या प्रकाशाबाबत पारदर्शक असते; परंतु ती हिरव्या अथवा लाल रंगाच्या प्रकाशासाठी अपारदर्शक असते. त्याचप्रमाणे कठीण रबर हे क्ष-किरण आणि अवरक्त किरणांच्या (Infra Red) बाबतीत पारदर्शक असते; परंतु दृश्य प्रकाशाच्या बाबतीत हे रबर अपारदर्शक असते.
या गोष्टीचा वापर करून एखाद्या मिश्रप्रारणामधून नको असणाऱ्या तरंगलांबींची प्रारणे बाजूला काढता येतात. या तत्त्वाचा वापर करून बनवलेली प्रकाशकीय गाळणी ही बहुधा विशिष्ट प्रकारच्या काचेपासून वर्तुळाकार चकतीच्या आकाराची बनविलेली असते व तिचा वापर विशिष्ट तरंगलांबीचे तरंग वेगळे करण्यासाठी करतात. या गाळणीचा वापर छायाचित्रणात मोठ्या प्रमाणात करतात.
कोणत्याही पदार्थाद्वारे (घन, वायू , द्रव अथवा आयनद्रायू) प्रारणांचे कमी-अधिक प्रमाणात शोषण होतच असते. हे शोषण प्रामुख्याने त्या प्रारणाची तरंगलांबी, त्या पदार्थाचे स्वरूप आणि पदार्थाची जाडी यांवर अवलंबून असते. लँबर्ट नियमानुसार (Lambert Law) प्रकाशकिरण जेव्हा एखाद्या माध्यमातून प्रवास करतो तेव्हा माध्यमाच्या जाडीनुसार प्रकाशाची तीव्रता कमी होत जाते. हा बदल प्रकाशाच्या तीव्रतेशी समानुपाती असतो. हा नियम पुढील सूत्राने मांडला जातो.
यामध्ये = प्रकाशाची सुरवातीची तीव्रता, = शोषण गुणांक व = माध्यमाची जाडी आहे.
प्रकाशाची सुरूवातीची तीव्रता १/१० एवढ्या प्रमाणात कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माध्यमाच्या जाडीच्या व्यस्तांकास त्या पदार्थाचा शोषण गुणांक (Absorption Coefficient) असे म्हणतात. याच्या साहाय्याने एखाद्या पदार्थातून (माध्यमातून) प्रकाश जात असताना त्या पदार्थाद्वारे प्रकाशाचे किती प्रमाणात शोषण होते, याची माहिती मिळते.
या शोषणाचे दोन प्रकार आहेत. ज्या पदार्थाद्वारे सर्व प्रकारच्या तरंगलांबींचे शोषण समान प्रमाणात केले जाते त्यास सामान्य शोषण असे म्हणतात. या प्रकारामध्ये पाहणाऱ्याला तो पदार्थ करड्या रंगाचा दिसतो. सहसा कोणताही पदार्थ सर्व तरंगलांबींच्या प्रकाशाचे एकसमान शोषण करीत नाही, तरीसुद्धा सामान्यपणे काजळी किंवा प्लॅटिनम धातूची अर्धपारदर्शक पातळ फिल्म (पटल) या पदार्थाचा सामान्य शोषण प्रकारात समावेश करतात.
प्रकाशाच्या विवेचक शोषण प्रकारात मात्र विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाचेच फक्त शोषण होते. दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या सर्व रंगीत पदार्थांचे रंग केवळ विवेचक शोषणामुळेच आलेले असतात.
शोषण वर्णपट : एखाद्या उद्गमातून अखंड वर्णपट असलेला प्रकाश बाहेर पडत असेल व तो शोषण करणाऱ्या एखाद्या माध्यमातून असेल, तर त्या माध्यमात ठराविक तरंगलांबीच्या प्रकाशाचेच शोषण होते. त्यामुळे त्यावर्णपटात अशा शोषल्या गेलेल्या तरंगलांबीच्या रेषा तुलनेने कमी प्रखर दिसतात. म्हणजेच त्या ‘आदिप्त’ असतात व त्या वर्णपटात काळ्या दिसतात. याला ‘शोषण वर्णपट’ म्हणतात. [ वर्णपटविज्ञान]
त्याचप्रमाणे, प्रोटॉन आणि आल्फा कण असे मूलकण एखाद्या माध्यमातून जाताना एका ठराविक (मर्यादित) अंतरापर्यंतच जाऊ शकतात. याचे कारण त्यांची उर्जा त्या माध्यमांमध्ये शोषली जाते. त्याद्वारे मुख्यतः माध्यमाचे आयानीकरण होते, आणि क्वचित अणुकेंद्रीय विक्रियांमध्ये एखाद्या आपाती कणाचे अणुकेंद्राद्वारे शोषण होते आणि त्यातून नवीन कण, फोटॉन अथव शोषण केलेले परंतु वेगळी ऊर्जा असणारे कण यांचे उत्सर्जन होते.
कळीचे शब्द : #वर्णपटविज्ञान
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/absorption-physics
- https://en.m.wikipedia.org/wiki/Absorption_(chemistry)
समीक्षक : माधव राजवाडे