महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ३६,०२५ (२०११). वाईच्या सभोवती सह्याद्री पर्वताचे फाटे पसरलेले आढळतात. साताऱ्याच्या उत्तरेस सुमारे ३२ किमी. व पुण्याच्या दक्षिणेस सुमारे ८८ किमी.वर, कृष्णा नदीकाठी स.स.पासून ७१८ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. वाईचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे १७° ९५’ उ. व ७३° ८९’ पूर्व असे आहे. येथे शंभरावर मंदिरे असल्यामुळे ‘दक्षिण काशी’ म्हणून त्याची प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांत गणना करतात. वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ज्ञांत मतैक्य नाही; तथापि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून शहरास वाई हे नाव पडले असावे. स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षेत्र’ असा उल्लेख आढळतो. ‘विराटनगर’ या नावानेही हे परिचित आहे.

वाईचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही; परंतु येथील किवरा ओढ्याच्या (कीचक विहिरीच्या) परिसरात सापडलेली क्षुद्राश्म हत्यारे प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवितात. पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत सापडलेल्या सातवाहनकालीन अवशेषांवरून वाई हे इ. स. पू. २०० ते इ. स. २०३ या काळात सातवाहन राजांच्या अंमलाखाली असावे. वाईच्या ईशान्येस सहा किमी.वरील लोहारे गावाजवळ हीनयान बौद्धांच्या आठ गुहा आहेत. त्यानंतरच्या बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास अस्पष्ट आहे. वाईच्या परिसरातील पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन इत्यादी डोंगरी किल्ले शिलाहारांनी इ. स. ९०० ते इ. स. १३०० या काळात बांधले आहेत. त्यावरून या प्रदेशावर शिलाहारांचे आधिपत्य असावे, असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. १३९६ ते १४०८ या बारा वर्षांत दुष्काळामुळे वाईची वस्ती उठून गाव ओस पडले होते. तेव्हा बीदरचा बहमनी सुलतान पहिला अहमदशाह वली (कार. १४२२ – १४३६) याने मलिक-उत्-तुज्जार खलफ हसन यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने १४२९ मध्ये वाई परिसरातील किल्ले घेऊन येथे वस्ती करण्याचे काम दादा नरसो व एक तुर्की खोजा यांच्यावर सोपविले. बहमनींचे लष्करी ठाणे वाई येथे होते. महमूद गावानच्या १४६९ मधील कोकणातील स्वारीत वायदेशातील काही शिपाई होते, नंतर वाई विजापूरच्या आदिलशाहीकडे गेले. आदिलशाहीचा सरदार अफझलखान १६४९ – १६५९ यांदरम्यान येथे सुभेदार होता. त्याच्या वाड्याच्या काही भागांचे (तटबंदी, बुरूज इत्यादी) अवशिष्ट असून सतराव्या शतकातील दोन मशिदी अद्यापही येथे सुस्थितीत आढळतात. प्रतापगडाच्या युद्धात अफझलखानाचा वध झाल्यानंतर (१६५९) वाई हे काही काळ मराठ्यांच्या अंमलाखाली होते; तथापि मराठ्यांना वाईवर सलग ताबा ठेवता आला नाही. अफझलखानानंतर येथे सय्यद इलियास शर्झाखान याची सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. छ. शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा प्रदेश पूर्णतः जिंकून येसाजी मल्हार यास येथे सुभेदार नेमले. संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. या काळात शर्झाखानबरोबरच्या युद्धात (१६८७) सेनापती हंबीरराव मोहिते वाईजवळच केंजळ परिसरात मारले गेले. नंतर १६८९ मध्ये वाई मोगलांच्या ताब्यात गेले. संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मोगलांबरोबर लढा देऊन पुन्हा वाई काबीज करून तेथे मराठ्यांचे ठाणे केले. छ. शाहूंच्या वेळी (कार. १७०७ – १७४९) वाईवर सुरुवातीस मोगल व मराठे असा दुतर्फी अंमल होता.

साताऱ्यातील एक सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी बाळाजी बाजीरावास (नानासाहेब पेशवे) आपली मुलगी गोपिकाबाई दिली आणि रास्ते घराण्याचे पेशवे दरबारी वजन वाढले. परिणामतः पेशव्यांनी रास्त्यांना १५ लाखांचा सरंजाम दिला. त्यामुळे रास्ते हे उत्तर पेशवाईत (१७६१ – १८१८) वाईत स्थायिक झाले आणि जवळजवळ अनभिषिक्त राजे बनले. त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला. रास्ते व त्यांचे आश्रित यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले; उमामहेश्वर (पंचायतन), महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर इत्यादी सुरेख मंदिरे उभारली; वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना केली.

वाईत लहान-मोठी अशी शंभराहून अधिक मंदिरे आहेत. त्यांतील कृष्णा पुलाजवळची महादेव, दत्तात्रेय, दक्षिणकाठचे सिद्धश्वेर इत्यादी काही मंदिरे एकोणिसाव्या शतकातील असून हरिहरेश्वर, अंबाबाई (महाकाली), रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा (मारुती), वाकेश्वर, गणपती (साबणे) ही पूर्व-पेशवाईतील मंदिरे आहेत. त्यांच्या चुनेगच्चीतील शिखरांचे बांधकाम मात्र पेशवाईत झाले असावे. या जुन्या मंदिरांतून काही पाषाणशिल्पे आढळतात. तद्वतच मंदिरांतील प्रतिष्ठापित मूर्तीतील काही मूर्ती, विशेषतः महालक्ष्मी, विष्णू, विठ्ठल-रखुमाई, महागणपती, महाकाली, त्रिमुखी दत्तात्रेय, गोशाळेतील संगमरवरी कृष्णमूर्ती, काशीविश्वेश्वर मंदिरातील घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नंदी व गर्भगृहाची कलाकुसरयुक्त द्वारशाखा ही लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. महालक्ष्मी, विष्णू, काशीविश्वेश्वर, महागणपती, उमामहेश्वर इत्यादी मंदिरे एका विशिष्ट मराठा वास्तुशैलीत (नव-यादव) बांधलेली आहेत. या मंदिरांचे विधान चतुरस्त्र असून त्यांत गर्भगृह, सभामंडप, क्वचित अंतरालय आढळते. शिखरांवरील कोनाड्यांत चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे.

गोशाळा, रास्तेवाडा, विद्यमान शासकीय मुद्रणालय (मुख्यतः विश्वकोश छपाईकरिता), नगरपालिकेची जुनी इमारत, मोतीबाग इत्यादी रास्त्यांनी बांधलेले वाडे चौसोपी, प्रशस्त आहेत. वाईच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या मोतीबागेतील वाडा आनंदराव रास्त्यांनी विश्रामधाम म्हणून बांधला. त्यातील पोहण्याची खास विहीर, बाग, कारंजी, पाणी ओढण्यासाठी वैशिष्ट्यूपूर्ण रहाटगाडगे इत्यादी अवशिष्ट आहेत. या वाड्यातील दिवाणखान्याच्या भिंती भित्तिचित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. पेशवाईतील वाडा हा एक स्वतंत्र वास्तु-विषय आहे; कारण कार्यानुरूप आकारनिर्मिती, भक्कम बांधकाम, सूक्ष्म कलाकुसर, छायाप्रकाशाचे कार्यानुरूप नियोजन इत्यादी वैशिष्ट्ये यात आढळतात.

मराठाकालीन अवशिष्ट भित्तिचित्रांत कदाचित वाईचा पहिला क्रमांक लागेल. या चित्रांचा काळ साधारणतः १७३० ते १८५४ असा वास्तूंच्या बांधणीवरून ठरविता येईल. भाव्यांच्या

मेणवली घाट

कोटेश्वर मंदिरातील भित्तिचित्रे ही अखेरची कलाकृती होय. मोतीबाग, पटवर्धन वाडा, जोशी (मेणवलीकर) वाडा, शासकीय मुद्रणालय इत्यादींतून भित्तिचित्रे अवशिष्ट असून जवळच मेणवली येथील नाना फडणीस वाडा व मेणेश्वर मंदिर यांत भित्तिचित्रे आहेत. या भित्तिचित्रांत वैष्णव धर्माचा प्रभाव अधिक दिसतो. रंगसंगती, विषयांतील वैविध्य आणि रेषांचे लालित्य यांमुळे ही भित्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. चुनेगच्चीतील मूर्तिकाम आणि भित्तिचित्रांतील प्रतिमा यांतून तत्कालीन मराठमोळी संस्कृती दृग्गोचर होते.

कृष्णेचा उत्सव हे वाईचे खास वैशिष्ट्य. हे उत्सव सात घाटांवर साजरे होतात. छ. शिवाजी महाराजांच्या वेळी या उत्सवास प्रारंभ झाला असावा, अशी समजूत आहे. या उत्सवांप्रमाणेच प्रत्येक वाडी व काही पेठा यांच्या वार्षिक यात्रा भरतात. मध्ययुगापासून वाई हे वेदविद्येचे व संस्कृत भाषेच्या अध्ययन-अभ्यासाचे प्रसिद्ध केंद्र समजले जात होते. विष्णुशास्त्री ग. जोशी व दत्तात्रेय जोशी (मेणवलीकर), बाळंभट रानडे, का. वा. ऊर्फ भाऊशास्त्री लेले, गोरक्षक चौंडे महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धनबुवा, बाळशास्त्री डेंगवेकर, केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) इत्यादी विद्वान मंडळींचे येथे वास्तव्य होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के आणि प्रसिद्ध शाहीर कृष्णाराव साबळे यांचे वाईजवळील परसरणी हे मूळ गाव होय. शहरात प्राज्ञपाठशाळा, चौंडे महाराजांनी स्थापिलेली श्री गोवर्धन संस्था (गोशाळा), लो. टिळक स्मारक ग्रंथालय, वाई व्यायामशाळा, ब्राह्मो समाज या प्रसिद्ध जुन्या-नव्या संस्था आहेत. येथे

विश्वकोश कार्यालय

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विद्यमाने मराठी विश्वकोशरचनेचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली १९६२ पासून सुरू झालेले काम आजही चालू आहे. एकोणिसाव्या शतकात मोदवृत्त, मधुवृत्तवृत्तसार इत्यादी वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होत होती. मकरंद हे मासिक काही वर्षे चालू होते. नवभारत हे मासिक येथून प्रसिद्ध होते. दरवर्षी मे महिन्यात येथे वसंत व्याख्यानमाला होत असते. वाईची नगरपालिका (स्था. १८५६) आरोग्य, पाणीपुरवठा, साफसफाई इत्यादी नागरी सुविधा पुरविते. शहरात शासकीय रुग्णालय व ग्रामीण आरोग्य केंद्र असून अनेक खाजगी दवाखाने व रुग्णालये आहेत. त्यांपैकी ‘मिशन हॉस्पिटल’ हे सर्वांत जुने असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची अनेक प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, गतिमंद मुलांसाठीची वाई अक्षर इन्स्टिट्यूट, किसन वीर महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचे हळद, गूळ व धान्य यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. दर सोमवारी बाजार भरतो. शहरात अनेक बँका असून तालुका पातळीवरील सर्व कार्यालये आहेत. याच्या परिसरात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे चालविण्यात येणारे रेशीम उत्पादन केंद्र, सहकारी सूतगिरणी आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)ची वसाहत हे प्रकल्प आहेत. वाईतील मंदिरे, विशेषत: महागणपती मंदिर, फुलेनगरचे बगाड व वाईच्या परिसरातील डोंगरावरील सोनजाई देवी, मेणवली (नाना फडणीसांचा वाडा, कृष्णेवरील घाट, मेणेश्वराचे मंदिर, पोर्तुगीज बनावटीची भव्य घंटा इत्यादी), भोगाव येथील वामन पंडितांची प्रतिक समाधी, धोम, (धरण व नरसिंह मंदिर), बलकवडी धरण, बावधन (भैरवनाथाचे मंदिर, पांडवलेणी व बगाड यात्रा), मांढरदेवी (काळूबाई मंदिर व पौष पौर्णिमेची प्रसिद्ध यात्रा), भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, अंबाडखिंड (वाई-भोर रस्त्यावरील), किकली (भैरवनाथ-यादवकालीन प्राचीन कलाकुसरयुक्त शंकराचे मंदिर) ही प्रसिद्ध स्थाने पर्यटकांची खास आकर्षणे होत. वाई येथून महाड-पंढरपूर हा राज्य महामार्ग जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पूर्वीचा क्र. ४) वरील सुरूर या गाव फाट्यापासून पश्चिमेस ११ किमी.वर वाई आहे. वाईच्या पश्चिमेस १३ किमी.वर पाचगणी, तर ३२ किमी.वर महाबळेश्वर ही थंड हवेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. या ठिकाणांकडे जाणाऱ्या पर्यटकांना वाईमधूनच जावे लागते. त्यामुळे अलीकडच्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने वाई हे महत्त्वपूर्ण बनले आहे. पूर्वीपासूनच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने वाई व वाईचा परिसर नेहमीच महत्त्वपूर्ण ठरला आहे. आजपर्यंत येथे सुमारे ३०० हिंदी व मराठी चित्रपट (उदा., बनारसी बाबू, सरगम, गंगाजल, बोलबच्चन, जिल्हा गाझियाबाद, चेन्नई एक्सप्रेस, दबंग, लाऊ का लाथ इत्यादी), अनेक हिंदी व मराठी मालिका आणि अनेक जाहिरातींचे चित्रीकरण झाले आहे.

संदर्भ :

  • खरे, ग. ह. बोराटे, व. म. संपा. अशी आमुची वाई, वाई, १९७९.
  • गुजर, जयवंत, संपा. लोकहित, वाई, १९९२.
  • भट, रवींद्र; बोराटे, वसंतराव; नेने, मधू : शब्दांकन, आम्ही वाईकर, पुणे, १९९१.
  • Apte, B. K. Maratha Wall Paintings, Bombay, 1988.
  • Chavan, Kamal K. Maratha Murals, Delhi, 1983.
  • Mate, M. S. Maratha Architecture, Poona, 1959.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.