नदी, ओढा वा अन्य जलप्रवाहाच्या पायातील खडकाळ तळावर दगडगोट्यांची घर्षणक्रिया होऊन कुंभाच्या वा रांजणाच्या आकाराचा दंडगोलाकार वा गोलसर खळगा वा छिद्र निर्माण  

होते, त्याला कुंभगर्त वा रांजण खळगा म्हणतात. याला घुसळ गर्त, निष्णा चक्की, किटली इत्यादी पर्यायी नावेही आहेत.

नदीप्रवाहाच्या विशेषत: वरच्या टप्प्यात, पाण्याबरोबर वाहत आलेले दगडगोटे पात्रातील खडकांवर घासले जातात. पाण्यातील लहानमोठ्या भोवर्‍यांमुळे या दगडगोट्यांनाही वाटोळी गती प्राप्त होते. यामुळे त्यांची खालील खडकांवर गिरमिटासारखी (छिद्रकासारखी) क्रिया होते. अशा प्रकारे पाणी व दगडगोटे यांच्या घर्षणाद्वारे खडकावर वाटोळा खळगा तयार होऊ लागतो. प्रवाहाद्वारे वाहून जाऊ न शकणारे दगडगोटे या खळग्यात अडकतात. पाणी व दगडगोट्यांच्या वाटोळ्या गतीमुळे खळगा अधिकाधिक खोल खोदला जातो. छिद्र पाडणारे हे दगडगोटे लहान व गुळगुळीत होऊन तेथून निघून जातात. त्यांच्या जागी नवीन दगडगोटे येतात व ही क्रिया पुढे चालू राहते. खळगा मोठा झाला की, त्यात अधिक दगडगोटे अडकून पडतात व अखेरीस कुंभगर्त खूप खोल होऊ शकतो. असे कुंभगर्त धबधब्याजवळ अधिक प्रमाणात तयार होतात. उदा., घटप्रभा नदीवरील

कुंभगर्त, गोकाक धबधबा

गोकाकच्या धबधब्यालगतच्या पृष्ठभागावर अनेक कुंभगर्त आहेत. जादा घर्षणामुळे कुंभगर्ताच्या तोंडापेक्षा आतील भाग अधिक मोठा होतो. परिणामी कधीकधी शेजारचे दोन खळगे आतून जोडले जाऊ शकतात. लहान संक्षुब्द्ध जलप्रवाहाच्या खालील दिशेतील खडक कापण्याच्या प्रक्रियेचा कुंभगर्त खोदण्याची क्रिया हा महत्त्वाचा भाग आहे. पात्राच्या तळावरील कुंभगर्तांची संख्या वाढत जाते. असे कुंभगर्त पुरेसे एकमेकांजवळ आले की, त्यांच्या अधिक खोल भागांत ते एकमेकांना छेदून जोडले जातात. परस्परांच्या छेदाच्या ठिकाणी वर असणारी पुलासारखी रचना नंतर पुराने नष्ट होते आणि प्रवाहाच्या खाली गेलेल्या तळावर नवीन कुंभगर्त निर्माण होऊ लागतात. उन्हाळ्यात महाराष्ट्रात कोरड्या झालेल्या अनेक नद्यांमधील पात्रांत कुंभगर्त व त्यांतील गुळगुळीत

कृष्णा नदीतील कुंभगर्त (वाई).

झालेले दगडगोटे पाहण्यास मिळतात. उदा., शिरुर (जि. अहमदनगर) लगत घोड नदीच्या पात्रात अनेक कुभंगर्त (रांजणखळगे) पाहण्यास मिळतात. सोबतच्या छायाचित्रात वाई, जि. सातारा येथील कृष्णा नदीच्या पात्रातील कुंभगर्त व ते जोडले जाण्याची प्राथमिक स्थिती पाहायला मिळते. १९७१ सालच्या दुष्काळात वाई येथील कृष्णा नदीतील रामडोह नावाने ओळखण्यात येणारा ३ मी. खोलीचा कुभंगर्त उघडा पडला होता व त्यात झिजून गुळगुळीत झालेला पृष्ठभाग व त्यामधील दगडगोटे पाहायला मिळाले होते.

पूर्वीच्या काळात खेड्यापाड्यांतील रंगारी मंडळी अशा लहान खळग्यांचा उपयोग रंग तयार करायचे भांडे (पात्र) म्हणून करीत असत.

हिमानी क्रियेतही कुंभगर्त तयार होऊ शकतात. बर्फामधून दगडगोटे तळापर्यंत खाली जाऊन खालील खडकांवर घासले जातात. यातून कुंभगर्तासारखे खळगे तयार होऊ शकतात.

समीक्षक : वसंत चौधरी