(सीओपीडी; क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज). श्वसनमार्गातील वायुप्रवाह अवरोधित करून श्वासोच्छवासास त्रास निर्माण करणाऱ्या पुरोगामी फुप्फुसाच्या रोगाचा एक गट. या आजारामध्ये वातस्फिती (Emphysema; इम्फायसिमा) आणि दीर्घकालीन श्वसननलिकादाह (Chronic Bronchitis; क्रोनिक ब्राॅंकायटिस) या आजारांसारखी सर्वसामान्य लक्षणे आढळतात.
तंबाखूचे सेवन करणे, धूम्रपान करणे, दीर्घकाळ रसायनाच्या संपर्कात असणे इ. सीओपीडी होण्याची प्रमुख करणे आहेत. हा आजार विकसित होण्यास बराच कालावधी लागतो.
सीओपीडीवर ठराविक असा कोणताही उपचार नाही. परंतु काही उपचारांनी या आजारावरील लक्षणे कमी करण्यास, आजारावरची जटिलता कमी करण्यास आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. औषधोपचार (Medication), पूरक ऑक्सिजन उपचारपद्धती (Supplement oxygen therapy) आणि शस्त्रक्रिया (Surgery) या आजारावरील उपचारांची काही प्रकार आहेत.
सीओपीडीचे निदान कारण्यासारही प्रतिमाचित्रण चाचण्या (Imaging test), रक्त चाचण्या (Blood tests) आणि फुप्फुस कार्य चाचणी (Lung function test) इ. चाचण्या करण्यात येतात.
सीओपीडीचे योग्यवेळी उपचार न केल्यास हृदयाची समस्या (Heart Problem) व श्वसन संसर्ग यांसारख्या आजारांच्या संसर्गाची गती वाढते.
लक्षण : सीओपीडीमध्ये प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होतो. सुरवातीला लक्षणांचे स्वरूप तीव्र नसते. अधूनमधून खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे दिसतात. परंतु जसजशी तीव्रता वाढते, तसतशी लक्षणे स्थिर होत जातात आणि श्वास घेणे खूपच कठीण होते. छातीतील घरघर व घट्टपणा किंवा थुंकीचे प्रमाण वाढणे इ. लक्षणे दिसतात.
अ) सुरवातीची लक्षणे : १. व्यायामानंतर श्वास लागणे, २. सौम्य पण वारंवार खोकला, ३. सकाळी उठल्यावर वारंवार घास स्वच्छ करण्याची आवश्यकता वाटणे, ४. सामान्य आयुष्यात जीवनशैलीत बदल होणे; साधारणपणे पायऱ्यांचा वापर टाळणे, शारीरिक व्यायाम टाळणे यांसारखे सूक्ष्म बदल दिसू शकतात, ५. श्वास लागणे, छातीतील घरघर व घट्टपणा, कोरडा किंवा ओला खोकला, फुप्फुसातील श्लेष्म स्वच्छ करण्याची आवश्यकता वाटणे, वारंवार सर्दी, फ्ल्यू असणे, सहज श्वसनाचे संसर्ग होणे, शरीरात त्राण नसल्यासारखे वाटणे.
वरील लक्षणांची तीव्रता सुरुवातीला कमी असते, परंतु काही दिवसांनी लक्षणांची तीव्रता वाढून दुर्लक्षित करणे अवघड जाते. फुप्फुसांवर होणारा तीव्र परिणाम जाणवता येतो.
आ) नंतरची लक्षणे : १. थकवा, पायावर सूज येणे, वजन कमी होणे, २. निळसर अथवा करड्या रंगाची नखे अथवा ओठ (शरीरातील ऑक्सिजन मात्रा कमी असल्याचे निदर्शक), ३. श्वास घेण्यास त्रास किंवा व्यवस्थित बोलता न येणे, ४. गोंधळलेली अथवा विस्मरणाची स्थिती अनुभवाने, ५. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे.
वरील लक्षणे असतांनाही जर धूम्रपान केले अथवा दुय्यम धूम्रपानाचा त्रास झाला तर परिस्थिती गंभीर होत जाते.
कारणे : पूर्वी अथवा सध्या धूम्रपान करीत असणे हे सीओपीडीचे प्रमुख कारण आहे. दीर्घकाळ व अतिप्रमाणात तंबाखूचे सेवन करणे, सिगारचा वापर, नळीद्वारे धूम्रपान, दुय्यम धूम्रपान करणे यांद्वारे सुद्धा सीओपीडी होऊ शकतो. दमा (Asthma) असणाऱ्यांना सुद्धा सीओपीडी होण्याचा धोका अधिक असतो. कामाच्या अथवा कुठल्याही ठिकाणी रसायनाच्या अथवा धूराच्या वारंवार संपर्कात आल्यास, प्रदूषित वायूच्या दीर्घकालीन संपर्कात आल्यास किंवा वारंवार धुळीचे श्वसन केल्यास, घरामध्ये वायुवीजन व्यवस्था ठीक नसल्यास सीओपीडी होऊ शकतो.
सीओपीडीचे लक्षणे विकसित होण्यास आनुवंशिकता सुद्धा कारणीभूत असते. परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. आनुवंशिकतेने झालेल्या सीओपीडीबाधित व्यक्तीमध्ये अल्फा-१-अँटीट्रिप्सीन (—anti trypsin) या विकाराची कमतरता असते. या विकाराचे कार्य फुप्फुसाची ऊती पुनर्स्थित करणे हे आहे. सीओपीडी हा संसर्गाने होणार आजार नाही.
निदान : सीओपीडीसाठी ठराविक अशी चाचणी नाही. लक्षणांवरून, भौतिक निरीक्षणावरून आणि निदानात्मक चाचण्यांवरून सीओपीडीचे निदान करता येते. लक्षणांची संपूर्ण माहिती वैद्यकाला देणे आवश्यक असते, जेणेकरून वैद्यक ठराविक अश्या चाचण्या करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. भौतिक चाचणीमध्ये वैद्यक स्टेस्थेस्कोपद्वारे (Stethoscope) फुप्फुसावाटे होणाऱ्या श्वासोच्छवासाचे निरीक्षण करतात आणि त्यानंतर पुढील चाचण्या करण्या हा सल्ला देतात.
अ) श्वासमापन (Spirometry) – या पद्धतीमध्ये कोणतेही वैद्यकीय उपकरण न वापरता, बाधित व्यक्तीस दीर्घ श्वास घेण्याचे सांगून, श्वासमापकाला जोडलेल्या ट्यूबद्वारे जोरात तोंडातील हवा (फुंकर) सोडण्यास सांगतात.
आ) प्रतिमाचित्रण चाचण्या (Imaging tests) – या पद्धतीमध्ये छातीचे क्ष-किरण चित्रण (X-Ray) अथवा संगणकीय छेदोलेखन क्रमवीक्षण (CT- Scan; सिटी-स्कॅन) करण्यात येते. या चित्रणाद्वारे फुप्फुसांच्या रक्तवाहिन्यांची आणि हृदयाची माहिती मिळते.
इ) धमनी-रक्त-वायू चाचणी (Arterial blood gas test) – यामध्ये धमनीमधून रक्ताचा नमुना घेऊन त्यातील ऑक्सिजन, कार्बन-डाय ऑक्साइड आणि इतर महत्त्वाच्या पदार्थाची चाचणी करण्यात येते.
उपरोक्त चाचण्यांद्वारे सीओपीडी शिवाय दमा, रोधित फुप्फुसांचे विकार व हृदयाची समस्या इ. आजारांबाबत निदान करता येते.
उपचार : उपचाराने सीओपीडीचे लक्षणे कमी करता येते, तसेच आजारामधील गुंतागुंत कमी होऊ शकते. फुप्फुसतज्ज्ञांच्या (Lung specialist; Pulmonalogist; पल्मॅनोलाॅजिस्ट) अथवा भौतिकोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाने सीओपीडीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
अ) औषधोपचार (Medication) – श्वसनलिका-विस्तारक (Bronchiodilator; ब्राँकाओडायलेट) श्वसननलिकतेतील वायुमार्गातील स्नायूंना आराम करण्यास व वायुमार्ग रुंदीकरण करण्यास मदत करतात. जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होत नाही. ते सहसा श्वसित्र (एनहेलर; Inhaler) अथवा नेब्युलायझर (Nebulizer) यांद्वारे घेतले जाते. वायुमार्गातील जळजळ कमी करण्यासाठी ग्लुकोकॉर्टिकोस्टिरॉइड (Glucocorticosteroids) याचा समावेश केला जातो. गंभीर स्वरूपाच्या सीओपीडीमध्ये फॉस्फोडायस्टिरेज-४ या गोळ्यांचा स्वरूपात तर छातीतील घट्टपणा व श्वास लागणे, जळजळ कमी करणे यावर थिओफॅलिन फार जून औषध असल्यामुळे त्याचे इतरही परिणाम शरीरावर होण्याची संभावना जास्त असते.
आ) ऑक्सिजन उपचार पद्धती (Supplement oxygen therapy) – सीओपीडीमध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने श्वास घेण्यास मदत करण्यासाठी मुखवटा (मास्क; Mask) अथवा नेझल कॅनुला (Nasal cannula) याचा वापर करण्याचा सल्ला देण्यास येतो.

इ) शस्त्रक्रिया (Surgery) – गंभीर स्वरूपाच्या सीओपीडीसाठी अंतिम उपचार म्हणून उदा., गंभीर वायुस्फिती करिता शस्त्रक्रियेची निवड करण्यात येते. बुलेक्टाॅमी (Bullectomy) सीओपीडीच्या शस्त्रक्रियेचा एक प्रकार असून या शस्त्रक्रियेमध्ये फुप्फुसातून विस्तारीत व असामान्य वायूची जागा (Bullae) काढून टाकण्यात येते. दुसरी आणखी एक शस्त्रक्रिया जीला फुप्फुसाची आकारमान कमी करणारी शस्त्रक्रिया म्हणतात. यात नुकसान झालेल्या फुप्फुसांच्या उतींना काढून टाकण्यात येते.
फुप्फुसाचे प्रत्यारोपण (Lung transplant) हा सुद्धा शस्त्रक्रियेचा पर्याय आहे.

ई) भौतिक उपचार : विविध प्रकारच्या श्वसनाच्या व्यायामाने छातीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे श्वास लागणे, थकवा आणि वारंवार होणार संसर्ग याचा धोका कमी होतो. स्थितिज नि:सरण (Postural drainage; पोश्चरल ड्रेनेज) या पद्धतीत रुग्णाला विशिष्ट स्थितीत झोपवून किंवा बसवून त्याच्या छातीतील कफ बाहेर काढतात.
उ) प्रतिपिंडे (Antibodies) व विषाणुरोधी (Antiviral) : सीओपीडीमध्ये श्वसन मार्गात संसर्ग झाल्यास याचा वापर करतात.
आहार : सीओपीडीसाठी विशेष आहार नाही. परंतु पोषक आहार आरोग्यास महत्त्वाची असतात. यात फळभाज्या, फळे, डाळी, प्रथिने, दुधयुक्त पदार्थ इ. समावेश करावा. द्रवयुक्त (कॅफिनयुक्त पदार्थ/द्रव वगळून) भरपूर प्रमाणात घ्यावे. यामुळे श्लेष्म घट्ट राहत नाही व तो सहजता बाहेर फेकण्यास मदत होते. मिठाचे प्रमाण कमी करणे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहून श्वसनातील त्राण कमी होतो. सीओपीडीमध्ये श्वास घेण्यास भरपूर ऊर्जा लागते म्हणजेच त्यासाठी कॅलरीज लागतात, त्यामुळे वजन संतुलित राखणे गरजेचे असते.
सीओपीडी निदानाचे विविध टप्पे : ग्लोबल स्ट्रॅटेजी फॉर द डायग्नाॅसिस, मॅनेजमेंट ॲंड प्रिव्हेंशन ऑफ सीओपीडी (२०१८ रिपोर्ट) मार्गदर्शन तत्त्वानुसार सीओपीडीच्या रुग्णांचे मूल्यांकन, निदान आणि उपचार, त्यानी पुरविलेल्या पुराव्याच्या आधारे एकपक्षी पुनरावलोकन करणे आवश्यक असते. या मध्ये श्वासमापन-श्रेणी पद्धतीने सीओपीडीच्या रुग्णांचे मापन करण्यात येते. श्रेणी मापनाच्या विविध पद्धती आहेत, गोल्ड वर्गीकरण (Gold classification) त्यातील एक पद्धत. गोल्ड वर्गीकरण पद्धतीमुळे सीओपीडी किती गंभीर स्वरूपात आहे हे समजण्यास मदत होते आणि कोणत्या उपचाराच्या पद्धती हाताळल्या पाहिजेत याबाबत माहिती मिळते. श्वासमापन चाचणीच्या आधारे गोल्ड श्रेणीचे चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते.
श्रेणी-१ (Grade -1) – सौम्य (Mild)
श्रेणी-२ (Grade -2) – साधारण (Moderate)
श्रेणी-३ (Grade -3) – गंभीर (Severe)
श्रेणी-४ (Grade -4) अती गंभीर (Very severe)
श्वासमापनाद्वारे घेतलेल्या (Forced Expiratory Volume; सक्त नि:श्वास आकारमान-१) परिणामावरील संपूर्ण पद्धत गोल्ड वर्गीकरणावर अवलंबून आहे. सक्त नि:श्वास आकारमान म्हणजे श्वासमापनाकरिता रुग्णाच्या फुप्फुसाद्वारे पहिल्या किंवा दुसऱ्या नि:श्वासातून जोरदार बाहेर फेकलेल्या वायूचा स्रोत.
चे प्रमाण कमी असल्यास सीओपीडीची गंभीरता जास्त असते.
कर्करोग आणि सीओपीडी : फुप्फुसांचा कर्करोग आणि सीओपीडी हे आजार एकमेकांशी खूप संलग्न आहेत. धूम्रपान हे मुख्य कारण दोन्ही आजाराला कारणीभूत आहे. सीओपीडी बाधित असणे म्हणजे कर्करोग असणे असे होत नाही. परंतु सीओपीडीमुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
पहा : फुप्फुस; फुफुसाचे विकार; वायूस्फिती; श्वासननलिकादाह (श्वसननलिकाशोथ); धूम्रपान.
कळीचे शब्द : #फुप्फुस #वायुस्फिती #कर्करोग #श्वासमापन #Bronchodilator #spirometry #धूम्रपान.
संदर्भ :
- Kamath, sandhya, Textbook : API Textbook of Medicine 11th edition, 2019.
- Weber, Barbara; Pryor, Jennifer; Prasad Ammani, Cardiopulmonary Physiotheropy, 1st edision, 1993.
- https://www.britannica.com/science/chronic-obstructive-pulmonary-disease
- https://www.healthline.com/health/copd
- मराठी विश्वकोश खंड : फुप्फुस
समीक्षक : यशवंत तोरो