भूकवचातील कमी उठाव असलेले मोठे आणि भूसांरचनिक दृष्ट्या स्थिर क्षेत्र म्हणजे खंडीय ढालक्षेत्र होय. ते कँब्रियनपूर्व काळातील स्फटिकी खडकांचे बनलेले आहे. या सर्व खडकांचे वय ५४ कोटी वर्षांहून अधिक असून यांपैकी काहींचे किरणोत्सर्गी कालनिर्णय पद्धतीने काढलेले वय २ ते ३ अब्ज वर्षे असल्याचे आढळलेले आहे. ऑस्ट्रियन भूशास्त्रज्ञ एदुआर्त झ्यूस यांच्या १९०१ मधील फेस ऑफ द अर्थ या इंग्रजी भाषांतरित पुस्तकात अशा प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांच्या वर्णनासाठी ‘शिल्ड’ या शब्दाचा वापर केलेला आढळतो.
ढालक्षेत्रे किंवा ढालप्रदेश सर्वसाधारणपणे खंडाचे मूळ गाभे (केंद्रे) मानले जातात. बाकीचा भाग नंतर त्याच्याभोवती तयार होत गेला. ढालक्षेत्राच्या केंद्रालगतचे खडकही अधिक जुने असतात. बहुतेक खंडीय ढालक्षेत्रांच्या सीमेभोवती कँब्रियनपूर्व नंतरच्या काळातील घड्या पडलेल्या खडकांचे पट्टे निरीक्षणानंतर आढळले आहेत. एका मतप्रणालीनुसार पृथ्वीच्या इतिहासाचा अर्थ खंडीय अभिवृद्धी या संकल्पनेच्या आधारे (संदर्भात) लावता येईल. म्हणजे पर्वतनिर्माणकारी घटनांमध्ये लागोपाठच्या अधिकाधिक तरुण (कमी) वयाच्या खडकांच्या पट्ट्यांत तीव्र स्वरूपाचे विरूपण होत गेले आणि हे पट्टे पूर्वीच्या ढालक्षेत्रांच्या सीमांवर जोडले जाऊन एकजीव झाले. अशा प्रकारे भूवैज्ञानिक काळात खंडांची अभिवृद्धी होत गेली असावी. ढालक्षेत्रांच्या सीमावर्ती प्रदेशांत तसेच भूसांरचनिक पट्ट्यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत पर्वतनिर्माणकारी हालचाली, प्रस्तरभंग किंवा इतर भूसांरचनिक प्रक्रियांचा जो प्रभाव आढळतो, तो या ढालक्षेत्रांवर अगदी नगण्य आढळतो.
खंडीय ढालक्षेत्र या नावावरूनच खंडीय ढालक्षेत्रे प्रत्येक खंडावर आढळतात, हे सूचित होते. कॅनडियन किंवा लॉरेन्शियन ढालक्षेत्र हे सर्वाधिक परिचित असे ढालक्षेत्र आहे. हे दक्षिणेस सुपीरिअर सरोवरापासून उत्तरेला आर्क्टिक बेटांपर्यंत आणि पश्चिम कॅनडापासून पूर्वेकडे पसरले असून त्यात ग्रीनलंडचा बहुतेक भाग येतो. दक्षिण अमेरिकेतील प्रमुख ढालक्षेत्राला ॲमेझॉनिय ढालक्षेत्र म्हणतात. याने या खंडाच्या पूर्वेकडील फुगीर भागाचा पुष्कळ भाग व्यापला आहे. ॲमेझॉनियन ढालक्षेत्राच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील अधिक लहान कँब्रियनपूर्व खडकांच्या क्षेत्रांना अनुक्रमे ‘गुयाना’ व ‘प्लाटीयन’ ढालक्षेत्रे म्हणतात. ब्राझीलचे पठार ढालक्षेत्र आहे.
बाल्टिक किंवा फेनोस्कॅन्डियन ढालक्षेत्राने फिनलंड व स्वीडन यांचा बहुतेक भाग तसेच पूर्व नॉर्वे व्यापला आहे. याच्या पश्चिम सीमेवर तरुण (नवीन) घड्या पडलेल्या खडकांचा पट्टा आहे. मध्य यूरोपात ढालक्षेत्रे लक्षात आलेली नाहीत; मात्र याच्या अधिक दक्षिणेला आफ्रिका खंडाच्या जवळजवळ निम्या भागात कँब्रियनपूर्व काळातील खडक पृष्ठभागी उघडे पडलेले आढळतात. या आफ्रिकन ढालक्षेत्राला कधीकधी इथिओपियन ढालक्षेत्र म्हणतात. पश्चिम सौदी अरेबिया व मादागास्करचा पूर्वेकडील अर्धा भाग व्यापण्याएवढे हे पूर्वेस पसरलेले आहे.
पूर्व सायबीरिया, भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिणेकडील दोन तृतीयांश भाग, ऑस्ट्रेलियाचा पश्चिमेकडील बहुतेक अर्धा भाग आणि अंटार्क्टिकाचा पूर्वेकडील खंड (भाग) हेही ढालक्षेत्रांचे भाग आहेत. या कँब्रियनपूर्व खडकांच्या क्षेत्रांना इंडियन (हिंदी) ढालक्षेत्र, ऑस्ट्रेलियन ढालक्षेत्र व अंटार्क्टिक ढालक्षेत्र अशी उचित नावे दिली आहेत.
आशियातील स्थिर मोठ्या खंडरूपी ठोकळ्याला ‘अंगारन’ ढालक्षेत्र म्हणतात. त्याच्या पूर्वेला लीना, तर पश्चिमेला येनिसे या नद्या आहेत; तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेस बैकल सरोवर आहे. चीन व उत्तर कोरिया यांमधील एका क्षेत्राला (भूभागाला) कधीकधी चीन-कोरियन ढालक्षेत्र म्हणतात. अंगारन ढालक्षेत्राच्या पश्चिम सीमेवर घड्या पडलेल्या खडकांचा पट्टा आहे. त्यात उरल पर्वत येतो व दक्षिणेला हिमालय पर्वत आहे. या चल क्षेत्रविभागांमुळे पश्चिमेला अंगारन ढालक्षेत्र बाल्टिक ढालक्षेत्रापासून अलग झाले आहे; तर दक्षिणेला इंडियन ढालक्षेत्र अलग झालेले आहे.
ढालक्षेत्रांच्या स्थिर ठोकळ्यावर भूकवचातील क्षितिजसमांतर प्रेरणांचा परिणाम झाला नाही व ढालक्षेत्रे प्राचीन पर्वतांची बनलेली आहेत, असे झ्यूस यांचे मत होते.
समीक्षक : वसंत चौधरी