बेरी, जॉन बॅगनल : (१६ ऑक्टोबर १८६१ — १ जून १९२७). एक अभिजात आयरिश इतिहासकार. मॉनगन ह्या अल्स्टर (आयर्लंड) प्रांतातील सधन घराण्यात जन्म. जॉनचे वडील मंत्री होते. ट्रिनिटी महाविद्यालयात (डब्लीन) शिक्षण घेऊन तिथेच त्याने अधिछात्रवृत्ति मिळविली. (१८८५) आणि पुढे ट्रिनिटी महाविद्यालयातच तो आधुनिक इतिहासाचा प्राध्यापक झाला (१८९३—१९०२). त्याची रीजीअस प्राध्यापक (राजाने नेमलेला) म्हणून केंब्रिज विद्यापीठात नेमणूक झाली (१९०३). तेथे तो अखेरपर्यंत होता.
रोमन साम्राज्यासंबंधी लिहिणाऱ्या इतिहासकारांत बेरीचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास हे शास्त्र आहे, असे मानणाऱ्यांपैकी बेरी हा एक होता. इतिहास प्रक्रियेतील सातत्यावर भर देऊन आधुनिकपूर्व समाजात अपघातांचा चक्रनेमिक्रम कसा दिसून येतो, हे त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या इतिहासलेखनात ऐतिहासिक घटनांखेरीज प्रशासनव्यवस्था, प्रदेशविशिष्ट, कला-साहित्य यांसारख्या इतर व्यापक घटकांचा अंतर्भाव केलेला आढळतो.
त्याने विपुल ग्रंथलेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी हिस्टरी ऑफ द ईस्टर्न रोमन एम्पायर फ्रॉम द फॉल ऑफ आयरिन टू द ॲक्सेशन ऑफ बॅझिल फर्स्ट, ए. डी. ८०२—८६७ (१९१२) हा ग्रंथ त्याची अभिजात साहित्यकृती असून यांशिवाय त्याने हिस्टरी ऑफ ग्रीस टू द डेथ ऑफ अलेक्झांडर द ग्रेट (१९००), लाइफ ऑफ सेंट पॅट्रिक (१९०५), हिस्टरी ऑफ फ्रीडम ऑफ थॉट (१९१४), द आयडिया ऑफ प्रोग्रेस (१९२०) इ. आणखी काही पुस्तके लिहिली. डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर या गिबनच्या पुस्तकाचे व केंब्रिज एन्शंट हिस्टरी या मालेचे त्याने संपादन केले. बेरीने आपल्या ऐतिहासिक लेखनात केवळ राजकीय घटना आणि घडामोडी, युद्धवर्णने व राजघराण्यांच्या कारकिर्दी अशी संकुचित वा मर्यादित दृष्टी ठेवली नव्हती; तर मानवाच्या सर्वांगीण जीवनाचा अभ्यास हे तत्त्व अंगीकारून त्याने मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे आणि सामाजिक जीवनातील कला, साहित्य, प्रशासनव्यवस्था, सामाजिक संस्था, इ. अंगांचे प्रत्ययकारी दर्शन घडविले आहे.
तो रोम येथे मरण पावला.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.