बोअर युद्ध : (इ. स. १८९९ ते १९०२). द. आफिकेतील ब्रिटिश आणि डच वसाहतवाल्यांच्या स्पर्धेतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बोअर युद्ध उद्‌भवले. सतराव्या शतकात ज्या डच लोकांनी द. आफिकेतील केप प्रदेशात वसाहती स्थापन केल्या, त्या डचांच्या वंशजांनाच पुढे बोअर हे नाव प्राप्त झाले.

युद्धप्रसंगातील बोअर सैन्याची एक तुकडी.

सुप्रसिद्ध केप टाउन हे शहर व केप वसाहत ही दोन्ही डचांची निर्मिती. पुढे यूरोपात ब्रिटिशांशी नेपोलियन बोनापार्टचा जेव्हा उग्र संघर्ष सुरू झाला, तेव्हा इ. स. १८०६ मध्ये डचांची केप वसाहत ब्रिटिशांनी जिंकून घेतली. त्यामुळे बोअर लोकांचा ब्रिटिशांना विरोध होता. त्यातच पुढे बोअर जमीनदारांच्या हितसंबंधांना धक्का देणारी एक घटना घडली. ती म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्यातील गुलामगिरी रद्द केली. या सर्व पार्श्वभूमीवर १८३५ ते १८३७ या दरम्यान सु. सात ते दहा हजार बोअर वसाहतवाल्यांनी उत्तरेकडे स्थलांतर करून ऑरेंज व व्हाल नद्यांच्या खोऱ्यात आणि पूर्वेकडील प्रदेशात वेगळ्या वसाहती स्थापन केल्या. या प्रयत्नांमधूनच पुढे ट्रान्सव्हाल आणि ऑरेंज फ्री स्टेट या स्वतंत्र बोअर प्रजासत्ताकांचा उदय झाला.

प्रारंभी ब्रिटिशांचे बोअर वसाहतींविषयी जरी निश्चित धोरण नसले, तरी क्रमाक्रमाने या वसाहती आपल्यात सामील करण्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले. इ. स. १८४३ मध्ये डच (बोअर) विरोधास न जुमानता ब्रिटिशांनी आपल्या दरबान बंदराच्या नजीकच्या प्रदेशात असलेली बोअर वसाहत ताब्यात घेतली. हीच ती नाताळ वसाहत. मात्र १८५३ च्या एका तहानुसार उर्वरित बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य ब्रिटिशांनी मान्य केले. पुढे बोअर प्रदेशात किंबर्लीच्या परिसरात सोने व हिऱ्याच्या खाणींचा शोध लागला आणि नव्या संघर्षाला प्रारंभ झाला. इ. स. १८७७ मध्ये बोअरांची ट्रान्सव्हाल वसाहत उर्फ दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक केप कॉलनीला ब्रिटिशांनी जोडून टाकले. पुढे इंग्लंडमध्ये पंतप्रधान ग्लॅडस्टनच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाचे सरकार आले, तरी बोअर वसाहतींचा प्रश्न सुटला नाही. तेव्हा ट्रान्सव्हालमधील बोअर लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले. यातूनच संघर्ष उद्‌भवला. फेब्रुवारी १८८१ मध्ये बोअरांनी मजूबा येथे ब्रिटिशांचा पराभव केला. तेव्हा ग्लॅडस्टनने युद्ध आवरते घेतले. शेवटी १८८४ च्या तहानुसार ब्रिटिशांनी ट्रान्सव्हालमधील बोअरांच्या स्वातंत्र्याला मर्यादित मान्यता दिली. त्यानुसार ब्रिटिशांच्या पूर्व परवानगीशिवाय बोअरांना परराष्ट्राशी तह करता येणार नव्हते.

इथून पुढे ट्रान्सव्हाबरोबरचे ब्रिटिशांचे संबंध उत्तरोत्तर बिघडतच गेले; कारण या काळात ट्रान्सव्हालने जर्मनीशी जवळीक निर्माण केली होती. शिवाय दक्षिण आफ्रिकेत एव्हाना जर्मन वसाहती स्थापन झाल्या होत्या. बोअर-ब्रिटिश संघर्षात जर्मनीने बोअर लोकांना सक्रिय पाठिंबा दिला. ट्रान्सव्हालचा बोअर अध्यक्ष पोउल क्र्यूगरचे सरकार उलथवण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. बोअरांच्या या यशाचे अभिनंदन करणारी एक तार जर्मनीचा सम्राट कैसर दुसरा विल्यम याने पोउल क्र्यूगर यास जानेवारी १८९६ मध्ये पाठविली. आपल्याला मिळालेले यश आणि जर्मनीच्या पाठिंब्याची अपेक्षा यांच्या जोरावर पोउल क्रयूगरच्या शासनाने सष्टेंबर १८९९ मध्ये नाताळ व केप कॉलनी यांच्यावर हल्ला केला. त्यातून बोअर युद्ध सुरू झाले. या युद्धात अखेरीस बोअर लोकांचा पराभव झाला व ३१ मे १९०२ रोजी फेरीनिकिंगच्या शांतता तहानुसार हा संघर्ष संपुष्टात आला. या तहानुसार दोन्ही बोअर प्रजासत्ताकांचे ब्रिटिश प्रदेशात विलिनीकरण करण्यात आले. डच भाषा, अंतर्गत स्वायत्तता यांबाबतीत बोअर लोकांना काही आश्वासने देण्यात आली. पुढे १९१० मध्ये द. आफ्रिकेतील सर्व ब्रिटिश वसाहती मिळून युनिअन ऑफ साउथ आफ्रिका या राज्याची निर्मिती करण्यात आली.

संदर्भ :

  • Gooch, G. P. History of Modern Europe : 1878-1919, New Delhi, 1971.
  • Gottschalk, Louis; Lach, Donald, The Transformation of Modern Europe, Vol II, Bombay, 1962.
  • Taylor, A. J. P. The Struggle for Mastery in Europe, London, 1973.