माझारँ, झ्यूल : (१४ जुलै १६०२ — ९ मार्च १६६१). फ्रान्सचा प्रधानमंत्री आणि कार्डिनल आर्मा झां द्यूप्लेसी रीशल्य ह्याचा वारसा चालविणारा व यूरोपीय सत्ताकारणात फ्रान्सचे प्रभुत्व प्रस्थापित करणारा सतराव्या शतकातील मुत्सद्दी.

माझारँचा जन्म रोमजवळ पेश्चिना येथे झाला. दक्षिण इटलीमधील सुप्रसिद्ध कोलोना ह्या उमराव घराण्याशी त्याचा मात्यापित्यांकडून संबंध होता. प्रारंभीचे शिक्षण रोम येथे जेझूइट शिक्षणसंस्थेत व कायद्याचे उच्च शिक्षण स्पेनमध्ये घेतल्यावर पोपच्या सेवेत त्याने प्रवेश मिळविला. रोमन कॅथलिक शिक्षणाचा प्रभाव त्याच्या वर्तनावर आणि शांततेच्या प्रयत्नांवर दिसून येतो.

पोपचा प्रतिनिधी म्हणून फ्रान्समध्ये असताना स्पेन आणि फ्रान्समध्ये मॅन्तूआच्या वारसा प्रश्नावरून तंटा निर्माण झाला. त्यात फ्रान्सला अनुकूल असा चेरास्कोचा तह (१६३१) माझारँने घडवून आणला. साहजिकच त्याचे फ्रान्सच्या दरबारात महत्त्व वाढू लागले. कार्डिनल रीशल्यची त्याच्यावर मर्जी बसली.

यूरोपमधील रोमन कॅथलिक राजसत्तांमधील स्पर्धा थांबविणे आणि धर्माला अभिप्रेत असलेली शांतात स्थापन करणे, हे माझारँच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. तीस वर्षांचे युद्ध संपविणाऱ्या वेस्ट फेलियाच्या तहात (१६४८) माझारँचा वाटा मोठा होता. जर्मनीबरोबर संरक्षक करार करून त्याने फ्रान्सची पूर्व सरहद्द सुरक्षित केली. डंकर्कच्या बदल्यात इंग्लंडशी त्याने मैत्रीचा करार केला व एकाकी स्पेनला पिरीनीजच्या शांतता करारावर सही करण्यास त्याने भाग पाडले (नोव्हेंबर १६५९). ओलिव्ह व कोपनहेगनच्या तहान्वये (१६६०) शेवटी यूरोपमध्ये शांतता प्रस्थापित झाली.

फ्रान्सचा राजा चौदावा लूई ह्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून माझारँने सरदार, धर्मगुरू आणि सधन व्यापारी वर्गाचा विरोध मोडून काढला. त्यावेळच्या प्रसिद्ध फोंड बंडाचा बीमोड म्हणजे राजसत्ता निर्वेध झाल्याचे लक्षण होते. याच वेळी लोकांमधील असंतोषही वाटाघाटींच्या मार्गाने दूर करण्यासाठी त्याचा कल होता.

देखण्या व्यक्तिमत्त्वाचा माझारँ कला संगीताचा भोक्ता होता. कला संगीताच्या विकासासाठी माझारँने सढळ हाताने कलाकारांना साहाय्य केले. चित्रकला आणि शिल्पकला ह्यांच्या विकासासाठी त्याने राष्ट्रीय अकादमी स्थापन केली. त्याची ग्रंथसंपदा व कलाकृती यांचा संग्रह अकादमीने जतन केलेला आहे.

व्हिन्सेनेस येथे तो मरण पावला.

संदर्भ :

  • Bailly, Augusto, Mazarin, Paris, 1935.
  • Hassal, Aritus, Mazarin, London, 1933.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.