मेजी : (३ नोव्हेंबर १८५२ — ३० जुलै १९१२). जपानी सम्राट (कार. १८६७–१९१२) व आधुनिक जपानचा एक शिल्पकार. त्याचे मूळ नाव मुत्सुहितो. तो मेजी टेन्नो (टेन्नो म्हणजे सम्राट) या नावानेही प्रसिद्ध आहे. राजा कोमेई व राणी योशिको यांचा तो मुलगा. त्याने राजघराण्याच्या परंपरेनुसार सुलेखनकला, काव्य, राज्यशास्त्र इ. विषयांत शिक्षण घेतले. त्याला द्वंद्वयुद्ध, अश्वारोहण तसेच इतर क्षात्रकलांविषयी विशेष आकर्षण होते. तो वयाच्या चौदाव्या (काहींच्या मते पंधराव्या वा सोळाव्या) वर्षी गादीवर बसला. शोगुन साम्राज्याचा अंत झाल्यानंतर तोकुगावा शोगुनेट या लष्करी घराण्याकडे असलेली सर्व सत्ता या अल्पवयीन सम्राटाकडे आली. यालाच आधुनिक इतिहासकार ‘मेजी पुनःस्थापन’ (मेजी रिस्टोरेशन) अशी संज्ञा देतात; कारण या घटनेमुळे जपानची परंपरागत संरजामशाही व द्विस्तरीय राज्यपद्धती संपुष्टात येऊन आधुनिक जपान या राष्ट्राचा उदय झाला.
सज्ञान होण्यापूर्वीच त्याचा इचिजो हरूको (शोकेन कोताइगो) या टाडायासू नावाच्या सरदाराच्या मुलाबरोबर विवाह झाला. प्रत्यक्षात मेजी सम्राटाच्या हातात फार थोडी सत्ता होती; परंतु जपानच्या एकात्मतेचे तेच प्रमुख द्योतक होते. या सुमारास राजधानी क्योटोहून टोकिओला हलविली. तसेच प्रशासकीय व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी नवीन संविधान स्वीकारण्यात आले (१८८९). संविधानानुसार डायेट नावाची द्विसदनी संसद अस्तित्वात आली. वरिष्ठगृहात काही निवडक सरदार घराण्यातील व्यक्ती घेण्यात आल्या आणि कनिष्ठगृहात शासनाला सल्ला देण्यासाठी निर्वाचित प्रतिनिधी निवडण्यात आले. मंत्रीमंडळ हे प्रत्यक्ष संसदेला जबाबदार नव्हते; परंतु एकूण शासनाचे ते एक महत्त्वाचे अंग होते आणि ते फक्त राजालाच जबाबदार असे. राजा सार्वभौम असून त्याविषयी जपानी जनतेस विलक्षण आदर व श्रद्धा वाटे. राजा वडिलधाऱ्या ज्येष्ठ मुत्सद्द्यांच्या (जेन्रो) सल्ल्यानुसार महत्त्वाचे निर्णय घेत असे. या मोजक्या मुत्सद्द्यांत हिरोबूमी इटो, आरिटोमो यामागाटा, कौरू इनोए इ. काही तत्कालीन नामवंत, विचारवंत व कार्यक्षम व्यक्ती होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जपानचे एका आधुनिक, औद्योगिक देशात रूपांतर झाले. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या काळात उद्योगधंद्यांत क्रांतिकारक बदल करण्यात आले. तसेच परराष्ट्रांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आणि लष्कराची आधुनिक तंत्रज्ञानानुसार पुनर्रचना करण्यात आली.
लष्करी दृष्ट्या जपान हे आशिया खंडातील एक बलवान राष्ट्र बनले. त्याचा प्रत्यय चीन-जपान युद्धात (१८९४–९५) आणि रशिया-जपान युद्धात (१९०४–०५) आला. या दोन्ही युद्धांत जपानने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा दारुण पराभव केला. या युद्धात मेजीने लष्कराचे सरसेनापतिपद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळले. या अतिपरिश्रमातूनच पुढे त्यास आजार जडला व त्यातच तो मरण पावला. त्याच्या मृत्युसमयी जपानला जागतिक महासत्तेचे स्थान प्राप्त झाले होते आणि जपानचे सर्व क्षेत्रांत प्रबोधन होऊन पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव वाढला होता.
संदर्भ :
- Akamatsu, Paul, Trans. Meiji, London, 1972.
- Beasley. W. G. The Meiji Restoration, Stanford, 1972.
- Sladen, D. B. W. Queer Things about Japan, New York, 1968.
- Watanbae, Ikujiro, Meiji Tenno, 2 Vols, 1958.