मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्‌सल : (१५ मे १७७३ — ११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ऱ्हेनिश सरदार घराण्यात कॉब्लेन्ट्स (ट्रायर) गावी झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत त्याला शिक्षणासाठी अनेक वेळा स्थलांतर करावे लागले. सुरुवातीच्या काळात तो श्ट्रौसबेर्क विद्यापीठात विद्यार्थी होता. अखेर त्याने व्हिएन्ना येथे शास्त्र आणि वैद्यकात अध्ययन पूर्ण केले. जमावाच्या हिंसात्मक आंदोलनाने त्याच्या मनात घृणा उत्पन्न झाली होती. इ. स. १७९५ मध्ये ऑस्ट्रियन मुत्सद्दी व्हेन्ट्सल कौनिट्स याच्या एलिनोरा या नातीशी त्याचा विवाह झाल्यावर त्याचा झपाट्याने उत्कर्ष झाला.

१८०६ मध्ये त्याची नेमणूक फ्रान्समध्ये वकील म्हणून करण्यात आली. पुढे तीन वर्षे नेपोलियनचा स्नेह संपादन करून तो बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहात बसला. १८०९ मध्ये अशी संधी आली असे वाटून त्याने ऑस्ट्रियन सरकारला फ्रान्सविरुद्ध युद्धास उद्युक्त केले; परंतु नेपोलियनने व्हाग्राम येथे ऑस्ट्रियाचा पराभव केला. तरीही १८०९ मध्ये त्याला ऑस्ट्रियन सम्राटाने परराष्ट्रमंत्री नेमले. तो अत्यंत वास्तववादी तसेच नेपोलियन व फ्रेंच राज्यक्रांतीचा कट्टर द्वेष्टा होता. त्याचप्रमाणे तो रशियाच्या विस्तारवादी धोरणाविषयीही साशंक असे. नेपोलियनचा पाडाव करताना यूरोपातील सत्तेचे संतुलन नाहीसे होऊ नये, असे त्याचे प्रयत्न होते. १८१० ते १८१३ ह्या काळात त्याने नेपोलियन व रशियाचा झार अलेक्झांडर यांना परस्परांविरुद्ध भडकविण्याचे धोरण अवलंबिले. ऑस्ट्रियन राजकन्या मारी ल्वीझ हिचा विवाह नेपोलियनशी जमविण्यात त्याचीच मध्यस्थी होती. रशिया आणि फ्रान्स यांच्या युद्धात त्याने दोघांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले. अखेर रशियातील माघारीनंतर १८१३ च्या ऑक्टोबरमध्ये नेपोलियनचा लाइपसिक येथे पराभव झाला. येथून पुढे मेटरनिखने नेपोलियनला सातत्याने विरोध करून १८१४–१५ मध्ये त्याच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. मेटरनिखच्या या कर्तृत्वामुळे जेत्या राष्ट्रांत ऑस्ट्रियास अग्रस्थान प्राप्त होऊन व्हिएन्ना येथे भरलेल्या परिषदेत (काँग्रेस ऑफ व्हिएन्ना) त्याला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले.

यूरोपच्या पुनर्रचनेचे कार्य मुख्यत्वे त्याच्या सिद्धांताप्रमाणे झाले. ह्या कार्यात क्रांतितत्त्वांना विरोध, यूरोपातील सत्तेचे संतुलन आणि सत्तेची वैधता ही तीन तत्त्वे त्याने अंगीकारली. ह्या तत्त्वांनुसार यूरोपमध्ये १७८९ ची स्थिती पुनःस्थापित करण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीने प्रसृत केलेली तत्त्वे मोडून काढणे, हेच मेटरनिखच्या धोरणाचे मूलतत्त्व होते. हुकूमशाही राज्ययंत्रणा हा त्याचा आदर्श होता, असे म्हटले तरी चालेल. त्याचप्रमाणे विध्वंसक युद्ध पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी यूरोपीय योजनाही त्याने अंमलात आणली. इंग्लंड, प्रशिया, रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांनी एकत्र येऊन शांतता टिकविण्यासाठी यूरोपीय संघ निर्माण केला. क्रांतीचे वारे नेस्तनाबूद करण्यासाठी एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत धोरणातही हस्तक्षेप करणे क्षम्य आहे, असे त्याचे मत होते.

ऑस्ट्रियाचा त्राता आणि नव्या यूरोपचा रखवालदार या नात्याने त्याची कामगिरी अजोड आहे. परंतु असहिष्णू, संरजामवादी धोरणामुळे मेटरनिखला पुढील क्रांती टाळता आली नाही. १८४८ मध्ये जेव्हा सर्व यूरोपभर क्रांतीचा उद्रेक झाला, तेव्हा मेटरनिख तत्त्वप्रणाली कोलमडून पडली व त्याला ऑस्ट्रिया सोडून इंग्लंडमध्ये आसरा घ्यावा लागला.

व्हिएन्ना येथे वृद्धापकाळी हताश अवस्थेत तो मृत्यू पावला.

संदर्भ  :

  • May, A. J. The Age of Metternich : 1814 – 1848, Toronto, 1963.
  • Schwartz., H. F. Ed. Metternich : The Coachman of Europe, Boston, 1962.