एथिल क्लोराइडचे IUPAC नाव क्लोरोइथेन व रेणवीय सूत्र C2H5Cl आहे.
गुणधर्म : एथिल क्लोराइड हा रंगहीन, थोडा ठसका आणणारा (सामान्य तापमानाला) व ज्वलनशील वायू आहे. याचा उत्कलनबिंदू १२.५० से. असून घनता ०.९२१४ ग्रॅ./मिलि. इतकी आहे. हे पाण्यात अविद्राव्य असून अल्कोहॉलमध्ये विद्राव्य आहे. याचा विषारीपणा खूप कमी आहे.
संश्लेषण : एथिलीन आणि हायड्रोजन क्लोराइड यांच्या अभिक्रियेने एथिलीन क्लोराइड तयार केले जाते.
C2H4 + HCl → C2H5Cl
मुंबई, हैद्राबाद व बडोदा (वडोदरा) येथील रासायनिक कारखान्यांमध्ये एथिल क्लोराइडचे उत्पादन केले जाते.
उपयोग : या पदार्थाचा उपयोग किरकोळ शस्त्रक्रियेमध्ये तात्पुरती व स्थानिक बधिरता निर्माण करण्यासाठी करतात. उदा., दातांचे उपचार. यासाठी हे पिचकारीने शरीराच्या हव्या त्या भागावर फवारतात. हूंगूनही याने गुंगी येते, मात्र ती क्लोरोफॉर्म इतकी टिकत नाही.
टेट्राएथिल लेड, सल्फोनॉल इत्यादींच्या निर्मितीमध्ये, प्रशीतक म्हणून तसेच वायुकलिल (Aerosol) तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.
एथिल क्लोराइड हे एक स्वस्त एथिलीकारक (Ethylating agent) आहे. एथिल क्लोराइडची ॲल्युमिनियम धातूबरोबर अभिक्रिया होऊन एथिल ॲल्युमिनियम सेस्क्विक्लोराइड तयार होते. याचा वापर बहुवारिकीकरणात उत्प्रेरक म्हणून होतो. एथिल क्लोराइडचा वापर सेल्युलोजपासून एथिल सेल्युलोज बनवण्यासाठी होतो. एथिल सेल्युलोज हे रंग व सौंदर्य प्रसाधनात वापरतात.
समीक्षक : श्रीनिवास सामंत