देशीनाममाला : (रयणावली). प्रसिद्ध जैन आचार्य हेमचंद्र यांनी १२ व्या शतकात रचलेला प्राकृतमधील देशी शब्दांचा कोश.हा शब्दकोश प्राकृत भाषेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी आहे. आचार्य हेमचंद्र यांनीच रचलेल्या सिद्ध हेम शब्दानुशासन या प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथामधील आठव्या अध्यायातील काही समस्यांची पूर्ती करण्यासाठी आणि काही अवघड शब्दांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी देशीनाममाला या ग्रंथाची निर्मिती झाली. आचार्य हेमचंद्र यांनी या ग्रंथाला रत्नावली (संस्कृतनाम) असे म्हटले आहे. प्रख्यात जर्मन अभ्यासक जॉर्ज ब्यूह्लर यांनी या ग्रंथाचे पहिले हस्तलिखित शोधून काढले. यामध्ये हेमचंद्र यांनी आपल्या कामाची माहिती देताना याला देशीशब्दसंग्रह असे म्हटले आहे. मात्र जर्मनीतीलच अभ्यासक रिचर्ड पिशेल यांच्या मते हस्तलिखितात देशीनाममाला असे नाव येते त्यामुळे पिशेल आणि इतर विद्वानांनीही देशीनाममाला हेच नाव वापरले.

या शब्दकोशात ८ अध्याय असून ७८३ गाथा आहेत. यात देशी म्हणजेच अव्युत्पन्न शब्द १५०० आहेत. त्याचे अर्थ स्पष्ट करताना १८० तत्सम शब्द व १८५० तद्भव शब्द आणि संशययुक्त तद्भव शब्द ५२८ आले आहेत. अशा एकूण ३९७८ शब्दांचे संकलन आहे. या व्यतिरिक्त अनेक धातूंचे समानार्थी धातूदेखील दिले आहेत. या शब्दांचे संकलन अकारविल्हे केले आहे. ज्या शब्दांची व्युत्पत्ती व्याकरणाने सिद्ध करता येत नाही, संस्कृत कोशात जे शब्द सापडत नाहीत, तसेच लक्षणा या शब्दशक्तीने ज्यांचा अर्थ लावता येत नाही अशा देशी शब्दांचे संकलन या कोशग्रंथात केले आहे. आचार्य हेमचंद्र यांनी हेही स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे प्रचलित असलेले असंख्य शब्द आहेत ; परंतु या सर्व शब्दांचा या ग्रंथात समावेश केलेला नाही. जे शब्द खूप पूर्वीपासून प्राकृत साहित्यात, बोलीभाषेत प्रचलित आहेत तेवढ्याच शब्दांचे इथे संकलन केले आहे. या कोशातील काही शब्द हे द्राविड, कौल, मुंडा इत्यादी भाषांमधील आहेत. पी.डी. गुणे आणि रिचर्ड मॉरिस यांसारख्या अभ्यासकांच्या मते देशीनाममालामधील सर्वच शब्द देशी नाहीत. अर्थासाठी दिलेल्या शब्दांमध्ये काही संस्कृत तर काही द्राविड भाषांमधून आलेले आढळतात. या शब्दकोशात जे देशी शब्द आहेत, ते इतरत्र सहसा सापडत नाहीत. या शब्दांवरून तत्कालीन सामाजिक स्थिती, रीतीरिवाज, लोकांचे राहणीमान यासारख्या गोष्टींची माहिती होते. म्हणूनच हा शब्दकोश प्राचीन तसेच आधुनिक भारतीय भाषांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयोगी आहे.

देशी शब्दांचे स्पष्टीकरण देताना आचार्य हेमचंद्र यांनी उदाहरण म्हणून काव्यात्मक नवीन गाथा रचल्या आहेत. त्यात साहित्यिक सौंदर्य दिसून येते. या गाथांमध्ये शृंगाररसाचा अतिशय चपखलपणे उपयोग केला आहे. इतर कोणत्याही भाषेतील कोशात असे दिसून येत नाही, त्यामुळेच देशीनाममाला  हा ग्रंथ प्राकृत तसेच भारतीय कोशवाङ्मयात महत्त्वाचा ठरतो. इ.स.१६०१ मध्ये राजनगर, अहमदाबाद येथे जिनचंद्रसूरी यांनी टीकेसहित देशीनाममालेची प्रत तयार केली. हे ७९ पृष्ठांचे हस्तलिखित भावनगरमधील जैन संघ भांडारामध्ये आहे.  इ.स. १६०३ मध्ये कृष्णदास यांनी लिहिलेले ७२ पृष्ठांचे एक हस्तलिखित गुजराथमधील पाटणच्या भांडारात आहे. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था,पुणे येथेही याचे हस्तलिखित असून त्याचे संस्थेतर्फे प्रकाशन करण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Banerjee, Muralidhar,  The Desinamamala of Hemacandra, University of Calcutta, Calcutta,1931.
  • Pischel R (Edi),  The Desinamamala of Hemacandra, Bhandarkar Oriental Research Institute, Pune,1938.
  • जैन,प्रेमसुमन,प्राकृत रत्नाकर, राष्ट्रीय प्राकृत अध्यपन एवं संशोधन संस्थान, श्रवणबेळगोळ,२०१२.

समीक्षक : कमलकुमार जैन