पद्म पुराण : प्राचीन भारतीय महापुराणांपैकी एक पुराण.या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णव पुराणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्ग,प्रतिसर्ग,वंश,मन्वंतर व वंशानुचरित या पाचही लक्षणांनी युक्त असे हे पुराण आहे. पुराणांच्या वर्गीकरणानुसार या पुराणाची गणना सात्त्विक पुराणात होते. या पुराणाची श्लोक संख्या ५५,००० असून ६२८ अध्याय आहेत. या पुराणाचा काही भाग इ.स. च्या पाचव्या शतकानंतरचा असला तरी त्याचा काही भाग त्यापेक्षा जुना आहे असे विद्वानांचे मत आहे. त्याचा उत्तरखंड सोळाव्या शतकानंतरचा असावा अशीही मते दिसून येतात. हे पुराण प्रथम विष्णूने ब्रह्माला सांगितले. पद्म पुराण सर्व पाप नष्ट करणारे पुराण समजले जाते.
हे पुराण बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतीत आढळते. सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताळ व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असले तरी देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्म, पाताल, सृष्टी व उत्तर अशा सहा खंडात विभागणी केली आहे.
सृष्टी खंड – या खंडात सृष्टीच्या क्रमाचे वर्णन आणि मनु, सूर्य, यदु, क्रोष्टु वंशांचे वर्णन आले आहे. देव व दानवांची उत्पत्ती,चंद्राची उत्पत्ती, रुद्राक्षाची उत्पत्ती इ. उत्पत्ती वर्णने आली आहेत. पुष्कर तीर्थाचे महत्त्व, शिव-पार्वती विवाह, गणेश व कार्तिकेयाचा जन्म, कार्तिकेयाचा पराक्रम, वामन अवतार, तारकासुराच्या जन्माची कथा, तुलसी स्तोत्राचे वर्णन असे महत्त्वाची माहिती देणारे अध्याय आहेत.यात नरोत्तम नावाचा ब्राह्मण व एका पतिव्रता स्त्रीचे आख्यान आले आहे. या खंडाच्या शेवटी सूर्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे. सूर्याचे मोठेपण असामान्य आहे.इतर देवांचे ध्यान केले जाते; परंतु सूर्य हा देव तर प्रत्यक्ष आहे म्हणून विशेष करून तो पूजनीय आहे.
भूमिखंड – या खंडात सुरूवातीला पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराचे वर्णन आले आहे. पृथु राजाचा जन्म व कथा, नौमित्तिक व अभ्युदयिक दानांचे वर्णन केलेले दिसते. पत्नी तिर्थाच्या प्रसंगात सती सुकलेची कथा आली आहे. नहुष ययातीची कथा, च्यवन ऋषींची कथा, कुंजल पक्षी व त्याचा मुलगा कपिंजलाचा संवाद, शिवधर्माचे कथन, वासुदेव स्तोत्र असे विविध विषय या भूमिखंडात आले आहेत. वेन राजाच्या कथेच्या निमित्ताने दिगंबर जैन संप्रदायाची ओळख होते.
स्वर्ग खंड – आदि सृष्टिच्या क्रमाचे वर्णन, भारतवर्षातील पर्वत व नद्या अशा प्रकारची भौगोलिक वर्णने येतात. तसेच, नर्मदा, काशी, प्रयाग इ. तीर्थांची वर्णने दिसून येतात. ब्रह्मचारी शिष्याने पालन करावयाचे नियम, गृहस्थाचा भक्ष्याभक्ष्य विचार, गृहस्थाने करावयाच्या दानधर्माचे वर्णन, तसेच, वानप्रस्थ व संन्यासाश्रमाचे वर्णन आले आहे. विशेष म्हणजे यात श्रीकृष्ण जन्माष्टमी बरोबर राधेच्या जन्माष्टमीचाही उल्लेख येतो.
पाताल खंड – वात्स्यायन मुनींनी संपूर्ण राम चरित्र सांगितले आहे. त्यातील संवाद विशेष वाचनीय आहेत. तसेच, श्रीकृष्ण महात्म्य सविस्तर आले आहे. सगुण-निर्गुण ध्यान महात्म्य, वैशाख महात्म्य, या वैशाख महात्म्या संदर्भात राजा महीरथाची कथा येते. नरक व स्वर्गाचे वर्णन इ. विषयांची माहिती या खंडातून मिळते.
उत्तर खंड – पद्म पुराणातील उत्तर खंड फार मोठा भाग आहे. आजही प्रचलित असलेल्या अनेक धार्मिक व्रतांचे, सणांचे वर्णन यात सापडते. माघ महिन्याचे महत्त्व, विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे वर्णन व महिमा, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा महिमा, मत्स्य, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण इ. विष्णूच्या अवताराच्या कथा तसेच, वेत्रवती व साभ्रमती या तीर्थांचे वर्णन आले आहे. या खंडाला जोडलेले क्रियायोगसार हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.अशाप्रकारे विविध विषय यात हाताळलेले दिसतात. शेवटी या ग्रंथाचा उपसंहार केलेला दिसतो.कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे असे मानले जाते.पद्म पुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात.
पहा : पुराणे व उपपुराणे
संदर्भ :
- Chatterjee, Asoke, Padma puran – A study, Sanskrit college, Calcutta, 1967.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर