निसर्गतः वातावरणात नसणारे घटक दिसू लागले तर त्या ठिकाणी हवेचे प्रदूषण झाले असे म्हणतात. ही प्रदूषके भौतिक, रासायनिक तसेच जैविकही असू शकतात. हवेतील जैविक प्रदूषकांचा अभ्यास ‘वायुजीवशास्त्र’ या विज्ञानशाखेत केला जातो.
वातावरणातील जैविक प्रदूषणास कारण असणारे अनेक घटक आहेत. उदा., सूक्ष्मजीव व त्यांचे मृतावशेष, कीटकांचे पंख, जीवाणू, विषाणू, बुरशीजन्य पेशी, प्राण्यांच्या व वनस्पतींच्या मृतपेशी इत्यादी. तसेच शैवले, बुरशी, नेचे यांचे बीजकण (Spores), तसेच फुलझाडांचे परागकणही हवा दूषित करण्यास कारणीभूत असतात. रानावनात, वनस्पतींच्या आसपास हवेत परागकण मोठ्या प्रमाणात सापडतात, तर शहरातील कापड-गिरण्यांच्या परिसरात कापसाचे सूक्ष्म धागे मोठ्या प्रमाणात सापडतात.
हवेतील जैविक प्रदूषके गोळा करून ओळखणे, त्यांचे मापन करणे यासाठी दोन प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. एका पद्धतीत कृत्रिम पोषण माध्यम (Culture media) तबकडीवर पसरून मोकळ्या हवेत ठेवले जाते. या माध्यमावर हवेतील सूक्ष्मजीव गुरुत्वाकर्षणाने येऊन स्थिरावतात आणि वाढतात. दुसऱ्या पद्धतीत पंपाने ठरावीक वेगाने आणि काळासाठी हवा खेचून पोषण माध्यमावर सोडली जाते आणि सूक्ष्मजीव माध्यमावर चिकटतात. या पद्धतीत सूक्ष्मजीवांची संख्या हवेच्या प्रमाणात मोजता येते. आणखी एका पद्धतीत भिरभिऱ्याच्या पंखांना चिकटपट्टी लावून ते भिरभिरे ठरावीक काळासाठी मोकळ्या हवेत ठेवण्यात येते. सूक्ष्मजीव चिकटपट्टीवर चिकटतात. त्यांचे प्रकार ओळखून प्रत्येक प्रकाराची संख्या मोजता येते.
या तीनही पद्धतीत सूक्ष्मजीव – जीवित आणि मृत – पोषण माध्यमावर चिकटल्यावर प्रयोगशाळेत नेऊन अभ्यास केल्यास जीवांच्या जाती व प्रजाती ओळखणे सोपे जाते. पोषण माध्यमावर जीव वाढवून त्यांचा पुढील अभ्यास – जनुकीयसुद्धा – करता येतो. मृतावशेषावरून जीव ओळखण्यासाठी विशेष तज्ञतेची जरुरी असते.
संदर्भ : Meir, F.C. Aerobiology, 1930.
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.