श्रीरंगम, तिरूच्चीरपल्ली

देवळांचा विकास : भारतात गुप्त राजवटीच्या काळात मंदिर वास्तुकलेच्या जलद गतीने झालेल्या विकासाने आपला ठसा उमटवला. एकमेकांवर रचलेल्या स्वयंस्थित दगडी आणि वीट बांधकामाने लवकरच प्रारंभिक अवस्थेतल्या लाकडी बांधकामाची जागा घेतली. सातव्या शतकापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी दगडी देवळं, आणि काही अतिभव्य मंदिरे निर्माण झाली. प्रारंभिक काळात देवळांच्या स्थापत्यकलेवर बौद्ध शैलीचा प्रभाव आढळतो. त्या देवळांमध्ये बौद्ध शैलीप्रमाणे देवाची मूर्ती मध्यभागी असून प्रदाक्षिणापथ बौद्ध स्तुपातल्यासारखा अर्धगोलाकार आहे. गुप्त काळातल्या सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास सगळ्या इमारती तुलनेने लहान आकाराच्या आहेत. एक छोटा मध्यवर्ती गाभारा, त्याभोवती जाड भरीव दगडी बांधकाम आणि प्रवेशद्वाराशी किंवा इमारतीच्या कडेने एखादी पडवी असा त्याचं रूप आहे. अतिप्राचीन काळातली मंदिरे (उदा., सांची) येथील मंदिराची छप्परं सपाट होती. तथापि, देवळांवर शिखरं बांधायची शैली (जी पुढे उत्तर भारतीय देवळांची वैशिष्ट्य बनली) ह्याच काळात विकसित झाली आणि कालौघानुसार शिखरांची उंची वाढत गेली. तमिळ साहित्यात बऱ्याच देवळांचा उल्लेख आहे, उदा., सिलप्पटीकरम  ह्या महाकाव्यात ( इ.स ३-४ ) तिरूच्चीरपल्लीजवळच्या ‘श्रीरंगम’ देवळांचा आणि ‘तिरुपती’चा उल्लेख आहे .

बौद्ध आणि जैन लोकांनी धार्मिक विधींसाठी मानवनिर्मित लेण्यांचा वापर केला होता आणि वैदिक-हिंदूंनी त्याचे अनुकरण केले. तरी वैदिक-हिंदूंची लेण्यांतील प्रार्थनास्थळे तुलनेने दुर्मिळ आहेत आणि गुप्त काळाच्या आधीची कुठलीही लेण्यांतील प्रार्थनास्थळे अजूनपर्यंत सापडलेली नाहीत. उदयगिरीच्या मंदिर संकुलात काही लेणीसदृश प्रार्थनास्थळे आहेत पण ह्याचे उत्तम नमुने बदामी (जी चालुक्यांची सहाव्या शतकात राजधानी होती) येथे आढळतात. बदामीच्या लेण्यांमध्ये विष्णू, शिवा आणि हरिहर (विष्णू आणि शिवाचा एकत्रित अवतार) ह्यांच्या उत्तम शिल्पमूर्ती बघायला मिळतात, तसेच विष्णूच्या कृष्ण अवताराच्या काळातल्या गोष्टीही दगडात कोरलेल्या आढळतात. बदामी जवळच ऐहोळे आणि पत्तदक्कल येथे आपल्याला दक्षिणेतील प्राचीन मंदिरांचे काही नमुने आढळतात. ऐहोळे येथील काही मंदिरांचा निर्मितीकाळ साधारण पाचव्या शतकातल्या जवळपासचा असावा. या कारणासाठी कदाचित या ठिकाणाचा उल्लेख वैदिक-हिंदू देवळांच्या निर्मितीची प्रयोगशाळा असा केला जातो. चालुक्य सम्राटांनी त्यांच्या ७-८ व्या शतकातील राजधानी पत्तदक्कल येथे मोठ्या प्रमाणावर मंदिरांची बांधकामे केली. या देवळांमध्ये अंतर्भूत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैली ‘उत्तर भारतीय शैली’ आणि ‘दक्षिण भारतीय शैली’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या .

सातव्या शतकात चेन्नईच्या दक्षिणेला पल्लव प्रशासित ‘महाबलीपुरम’ येथे दगडांमध्ये बरीच छोटी देऊळं कोरली गेली, या देवळांना तमिळनाडूमधल्या धार्मिक स्थळांचे नमुने म्हणून बघितलं जातं. मम्मलापुरम आणि कांचीपुरम ही पल्लव साम्राज्याची (इ.स ४-९) चेन्नई जवळची दोन प्रमुख शहरं होती. पल्लवांची राजधानी कांचीपुरमचा उल्लेख ‘हजार मंदिरांचे शहर’ असाही केला जातो. त्यातील काही देवळे पाचव्या शतकातली आहेत. येथील बरीच देवळे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जातात. विष्णू, शंकर आणि देवीच्या विविध रुपानां समर्पित या देवळांना बऱ्याचदा राजाश्रय असायचा आणि काही धनिक मंडळीही मदत करत.

दक्षिणपूर्व देशातील आणि भारतातल्या मंदिरांच्या स्थापत्यशैलीत दृश्यमान रुपात बरीच समानता आढळते उदा., देवळांची शिखरे आणि प्रतिमाविद्या (Iconography), हिंदू देवदेवता, पुराणकथा आणि भिंतींवर दगडात कोरलेल्या नृत्यांगना इत्यादी. समानतेप्रमाणेच या देवळांत फरक देखील आहेत. उदा., कंबोडीया देशातील नोम बखेंग आणि कोह खेर इथल्या शिवाच्या देवळाची शिखरे डोंगरांच्या त्रिकोणासमान भासतात .

संदर्भ:

समीक्षक : श्रीपाद भालेराव