कंटूर

भू-पृष्ठभागावरील समान उंचीच्या बिंदू वा ठिकाणांना जोडणारी काल्पनिक रेषा म्हणजे कंटूर. कंटूर रेषांवरून जागेच्या भूदृश्याच्या उंच सखलतेविषयी कल्पना येते तसेच भूपृष्ठावरील पाण्याचा प्रवाह व निचरा कसा असेल या बाबत कल्पना येते. त्यामुळे कोणत्याही जागेवर कसल्याही प्रकारचे विकास काम (इमारत / रस्ते / उद्यान इत्यादी) करायचे असेल तर कंटूर सर्वेक्षण नकाशा गरजेचा असतो. कंटूर चे मापन एका अचल स्थल बिंदूपासून सहसा केले जाते. जसे जागेवरील विजेचा खांब, विहीर वा इतर बांधकामाचा संदर्भ. कंटूर नकाशावर जागेवरील झाडे, इमारती, विजेचे खांब, रस्ते इ. बाबी देखील दाखवलेल्या असतात.

कंटूर नकाशामुळे विकास कामात किती खणावे व भर घालावी लागेल, भूपृष्ठावरील पाण्याचे नियोजन कसे करावे लागेल, इमारतींची जोती किती उंचीवर ठेवावी हे सर्व निर्णय घेता येतात. जमिनीच्या क्षेत्रफळ व जमिनीचा एकूण उंचसखलपणा यावर कंटूर किती अंतराचे असावे हे ठरते. मोठ्या भौगोलिक जागेचा जसे डोंगर दऱ्या, यांचे कंटूर नकाशे ५ मी. व १० मी. अंतराचे असू शकतात, परंतु शहरातील प्रभाग व जागा यांचा एक मी. व अर्धा. मी. अंतराचा कंटूर नकाशा असू शकतो.

समीक्षक : श्रीपाद भालेराव