केन्झो टांगे
केन्झो टांगे, १९८७ च्या प्रीझ्कर आर्किटेक्चर प्राईजचे विजेते, हे जपानमधील आणि संपूर्ण जगातील सर्वात प्रतिष्ठित आर्किटेक्ट्सपैकी एक आहेत. शिक्षक, लेखक, आर्किटेक्ट आणि शहरी नियोजक, म्हणून पार पाडलेल्या आपल्या कामांसाठी व तरुण आर्किटेक्टस् वरील प्रभावाबद्दल आर्किटेक्चर समुदायात केन्झो टांगे यांचे आदरणीय स्थान आहे.
रिबा गोल्ड मेडल (१९६५) ऑलिम्पिक डिप्लोमा ऑफ मेरिट (१९६५) अमेरिकन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स गोल्ड मेडल (१९६६) फ्रेंच अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर ग्रँड मेडल ऑफ गोल्ड (१९७३) प्रिझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार (१९८७) या पुरस्कारांनी टांगेंना जगाने गौरविले आहे.
हिरोशिमा पीस सेंटर (१९४९) इसेजिंयू तीर्थस्थानाचे दर २० वर्षांनी होणारे पुनर्निर्माण (१९५३), टोकियो ऑलिम्पिक अरीना मैदान (१९६४), सेंट मेरी कॅथेड्रल, टोकियो (१९६४) जपानमधील कुवैत दूतावास (१९७०), सर्वोच्च न्यायालय इमारत पाकिस्तान (१९९३) ही केन्झो टांगेंच्या प्रसिद्ध कामांपैकी काही कामे होत.
केन्झो टांगेंचा जन्म जपानच्या शिकोकू बेटावर, ४ सप्टेंबर १९१३ रोजी, इमाबारी या छोट्या शहरात झाला. वडील सुमितोमो बँकेत मॅनेजर असल्यामुळे, टांगेंचा बालपणीचा काही काळ हॅनको आणि शांघाय या चीनी शहरांमध्ये गेला. त्यांचे शांघायचे निवासस्थान ब्रिटिश कॉलनीत असल्यामुळे हिरवागार लॉन व लाल विटांच्या पाश्चात्य शैलीत सजले होते. पण टांगेंच्या पालकांनी घराचा तिसरा मजला जपानी ततामी चटयांनी सुसज्ज केला होता. तरुण केन्झोंना ‘पूर्व आणि पाश्चात्य डिझाईन सांधण्याच्या शक्यतेबद्दल लवकरच जागरूकता आली’ असे त्यांनी नंतर एका मुलाखती सांगितले. एका काकांच्या मृत्यूनंतर ते आणि त्यांचे कुटुंब जपानला परतले व इमाबारीच्या शेतघरात राहू लागले.
माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, १९३० साली टांगे हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी हिरोशिमाला गेले. तिथे, एका परदेशी कला मासिकात, फ्रेंच – स्विस वास्तुविशारद, ले कॉर्ब्युझियरची कामे टांगेंना आढळली. त्या निर्मितींनी ते इतके प्रभावित झाले की आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९३५ साली टांगेंनी टोकियो विद्यापीठात आर्किटेक्चरच्या अभ्यासासाठी दाखला घेतला. शिक्षण पूर्ण करुन त्यांनी कुनिओ माईकावा यांच्या कार्यालयात आर्किटेक्ट म्हणून काम करण्यास सुरवात केली. माईकावा कॉर्ब्युझियरचे शिष्य असून कॉर्ब्युझियरच्या कार्यालयात त्यांनी आधी काम केले होते. टांगे सांगतात, ‘माझे २ शिक्षक आहेत मायकेल एंजेलो आणि ले कॉर्ब्युझियर. आणि मी रोमच्या प्रेमात आहे, युद्धानंतर मी १५० वेळा रोमला भेट दिली आहे.’
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी माईकावांचे कार्यालय सोडले आणि पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून टोक्यो विद्यापीठात परत गेले. त्यांना अर्बन डिझाइनची आवड निर्माण झाली आणि विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा संदर्भ घेऊन त्यांनी ग्रीक व रोमन बाजारपेठांचा अभ्यास सुरू केला. १९४६ मध्ये, टांगे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक झाले आणि त्याच साली त्यांनी ‘टांगे लेबॅारेटोरी’ उघडली. शहरी अभ्यासातल्या रूचीमुळे, दुसऱ्या महायुद्धानंतर, हिरोशिमाच्या पुनर्बांधणीसाठी टांगेंनी शहरी नियोजक म्हणून काम केले. १९४९ मध्ये हिरोशिमा पीस सेंटर आणि मेमोरियल पार्कसाठीची त्यांची रचना निवडली गेली आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले. १९५१ साली त्यांना सी.आय.ए.एम. ला आमंत्रित केले (काँग्रेस इंटरनॅशनल डी आर्कीटेक्चर मॉडर्न) जिथे त्याने हिरोशिमासाठीची आपली योजना सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर मिळविला. १९५० च्या दशकात, पारंपारिक जपानी घटकांना आधुनिक पाश्चात्य शैलीत एकत्रित करणारे ते पहिले जपानी आर्किटेक्ट होते. जपानच्या युद्धानंतरच्या
काळात, टांगे बऱ्याच सार्वजनिक वास्तू प्रकल्पांच्या डिझाइनमध्ये गुंतले होते.
त्यांची १९६३ मध्ये ‘शहरी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक’ म्हणून पदोन्नती झाली. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यादीत, टाकाशी असादा, साचिओ ओटानी, तनीयो ओकी, कोजी कामिया, फुमीहिको माकी, अराता ईसोझाकी, किशो कुरोकावा आणि योशिओ तानिगुची या नावाजलेल्या आर्किटेक्टचा समावेश आहे. टांगे हे नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हार्वर्ड, येल, प्रिन्सटन, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, इलिनॉय इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ, अलाबामा आणि टोरंटो विद्यापीठे तसेच पॉलॅनटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ मिलान, आणि चीन बीजिंगमधील त्सिंगुआ युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांमध्ये ते व्याख्याता म्हणून कार्यरत होते.
टांगेची ‘टोकियो १९६० योजना’, टोकियो खाडीच्या पलीकडेपर्यंत पसरलेली एक भव्य अवास्तविक रचना, यामुळे मेटाबोलिस्ट चळवळीवर जोरदार परिणाम झाला. मेटाबोलिस्ट चळवळ ही युद्धानंतरची जपानी आर्किटेक्चरल चळवळ होती. आर्किटेक्चरल मेगास्ट्रक्चर (सर्वात मोठे, उंच, सर्वात लांब किंवा सर्वात खोल अशा अवाढव्य इमारती) यांची डिझाईन संघटनात्मक जैविक वाढी सारखी असावी अशी यामागची कल्पना होती. किकुटाकी आणि टांगे यांचे माजी विद्यार्थी कुरोकावा आणि माकी, यांनी मेटाबोलिस्ट चळवळीचे नेतृत्व करीत होते. टांगेंनी मेटाबोलिस्ट चळवळीचे जोरदार समर्थन केले.
जरी त्यांची शैली आधुनिकतावादी होती, तरी टांगेंना जपानी इतिहास आणि संस्कृतीतूनही प्रेरणा मिळाली. ते म्हणत ‘पूर्णपणे अनियंत्रित धारणेच्या रचना जास्त काळ टिकू शकत नाही.’ आर्किटेक्चरमध्ये असे काहीतरी असले पाहिजे जे मानवी हृदयाला आकर्षित करेल, परंतु तरीही मूलभूत रूपे, जागा आणि देखावे तर्कसंगत असावेत.सद्या
च्या काळात सर्जनशील कार्य, तंत्रज्ञान आणि मानवतेचे एक संघटन म्हणून व्यक्त केले जाते. परंपरेची भूमिका ही उत्प्रेरकाची आहे, जी रासायनिक अभिक्रिया वाढवते, परंतु शेवटच्या निकालात उपस्थित नसते. परंपरा निश्चितपणे निर्मितीच्या कृतीमध्ये भाग घेऊ शकते, परंतु ती स्वत: निर्मिती असू शकत नाही.’
प्रिझ्कर पुरस्कार ज्युरीने असे निवेदन केले की, ‘टांगे अशा आकारांवर येऊन पोहचतात ज्याने आपली अंतःकरणे उंचा
वतात कारण ते आकार प्राचीन आणि अंधुक आठवणीतल्या भूतकाळातून उदय पावतात आणि तरीही ते चित्तथरारक प्रकारे आजच्या वर्तमानातले असतात.’ त्यांच्या प्रिझ्कर पुरस्कार स्वीकृती भाषणात केन्झो म्हणाले, ‘मी जे अधी निर्मित केले ते पुन्हा करायची माझी इच्छा नाही. प्रत्येक प्रकल्प हा पुढचा प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठीचा स्प्रिंगबोर्ड (उड्डाण फळी) असतो, भूतकाळापासून सतत बदलणारा, प्रगतीशील भविष्याकडे जाणारा.’
मार्च २००५ मध्ये, वयाच्या ९१ व्या वर्षी केन्झो टांगे यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Matray James I. (2001) Japan’s Emergence As A Global Power USA: Greenwood press
- Peltason R., Ong-Yan G., P. ( 2010) The Pritzker Prize Laureates In Their Own Words London: Thames and Hudson
- https://www.archdaily.com/270043/happy-birthday-kenzo-tange
- https://www.notablebiographies.com/newsmakers2/2006-Ra-Z/Tange-Kenzo.html
- https://www.pritzkerprize.com/biography-kenzo-tange
- https://en.tangeweb.com/company/
समीक्षक : भालेराव श्रीपाद