संंगीताच्या आठ अंगांनी युक्त अशी गायकी म्हणजे अष्टांग गायकी. “अष्ट” म्हणजे आठ आणि आठ ही संख्या परिपूर्णता दर्शविते व ही संकल्पना भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या व परंपरेच्या विचारसरणीतून जन्माला आली आहे. प्राचीन काळापासून मंदिरांत/देवालयांत वैदिक मंत्र, स्तोत्रे व ईशस्तुती गायनासोबत दिवसातून आठ वेळा देवकृत्य करण्याची नियमबद्ध प्रथा आहे आणि त्याच अनुषंगाने हिंदुस्तानी संगीतांत विभिन्न राग गाण्याचे समयचक्र निर्माण झाले आहे. ज्यांत अष्टप्रहराची संकल्पना सर्व घराण्यांच्या गायकांना मान्य आहे. संगीताच्या आठ अंगांनी गायन करून गायक रागाला सजवतात, त्याचे सादरीकरण करतात.

ख्याल गायनशैली प्रचारात आल्यापासून ख्याल गायकीच्या घराण्यांत, प्रत्येकाची गायनशैली भिन्न असली तरीही, ख्याल गायकीची परिपूर्णता अष्टांग गायकीच्या रूपांत सर्व घराण्यांच्या विद्वान गायकांनी, गुरुंनी व संगीततज्ज्ञांनी एकमताने स्वीकारली आहे. अष्टांगगायनात पुढीलप्रमाणे गायनाचे पैलू असतात : आलाप, बोल-आलाप, बहेलावे, पूर्वांगबढत (स्थायी भरणे), उत्तरांग बढत (अंतऱ्याची बढत), उपजअंग, तान प्रस्तार आणि बोल-तान.

या संदर्भात काही विद्वानांच्या मते साहित्याचा भाग अष्टांग गायकी अंतर्भूत असत नाही. कारण ख्यालाच्या बंदिशीची निर्मिती तीन अंगांनी होते. रागांग, काव्यांग आणि लयांग किंवा तालांग. तेव्हा ख्याल गायकीच्या अष्टांगांत बोल-आलाप, बोल-तान व उपज अंगांत बंदिशीच्या काव्याचा भाग शब्दांना नादमय, भावमय करून व्यक्त होतोच. त्यामुळे साहित्याचे वेगळे असे अंग अष्टांग गायकीत नसते, किंबहुना ते बंदिशीचेच एक अंग आहे. तसेच खटका, मुरकी, मींड हे गायकीचे अंग नाही का? असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. खटका, मुरकी, मींड हे गमकेच्या सदरा खाली येतात व ती रागांची आभूषणे/अलंकार म्हणूनच ओळखली जातात. कारण त्यांचे प्रयोग रागांत विवादी स्वरांप्रमाणेच क्वचित किंचित मनाकस्पर्श या नात्याने मर्यादित रूपात केले जातात. ते अष्टांग गायकीचे अंग मानले जात नाही.

समीक्षण : सुधीर पोटे