झाहा हदीद

डेम झाहा हदीद या इराकी-ब्रिटीश आर्किटेक्ट होत्या.  प्रित्झकर पुरस्कार प्राप्त करणार्या त्या पहिल्या महिला आहेत. हदीद त्यांच्या तीव्र, भावी, वास्तुकलेसाठी प्रसिद्ध झाल्या.  त्यांचे काम, डीकॉनस्ट्रक्शन, निओ फ्यूचरिझम आणि पॅरामीट्रिसिझम या शैलीत असल्याचे वर्णन केले जाते.

हदीदना आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २००४ साली त्यांना प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले.  यू.के.चा सर्वात प्रतिष्ठित आर्किटेक्चरल पुरस्कार, स्टर्लिंग पुरस्कार, त्यांना सलग २ वर्ष, (२०१० व २०११) मिळाला. २०१२ मध्ये राणी एलिझाबेथने (द्वितीय), आर्किटेक्चरच्या सेवेसाठी,  हदीदना ‘डेम’ बनविले. २०१६, मध्ये रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्ट्सकडून रॉयल गोल्ड मेडल मिळविणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

विट्रा फायर स्टेशन, र्‍हिन, जर्मनी.

हदीदच्या निर्मीती संपूर्ण जगभरात असून त्यांचा प्रत्येक प्रकल्प अद्वितीय व आर्किटेक्चर क्षेत्रात महत्त्वाचा आहे. विट्रा फायर स्टेशन, र्‍हिन, जर्मनी (१९९३); मेसनर माउंटन म्युझियम, इटली (२००६); गुआंगझौ ऑपेरा हाऊस, गुआंगझौ, चीन (२०१०); उन्हाळी ऑलिंपिकसाठी लंडन अॅक्वाटिक्स सेंटर (२०१२); हेयदर अलीयेव सेंटर, बाकू, अझरबैजान (२०१३); फिफा वर्ल्ड कप स्टेडियम, कतार (२०१९) ही हदीदची काही प्रसिद्ध कामे. हदीदचे लंडन, यू.के. मध्ये मोठे कार्यालय आहे.

झाहा मुहम्मद हदीद यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९५० रोजी बगदादमध्ये एका उच्चवर्गीय इराकी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुहम्मद अल-हज हुसेन हदीद मोसूलचे एक श्रीमंत उद्योगपती आणि राजकारणी होते. इराकमधील नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाची सहसंस्थापना त्यांनी केली व नंतर ते जनरल अब्द अल-करीम कासिम यांच्या सरकारचे अर्थमंत्री होते. झाहा यांची आई, वाजिहा अल-सबुनजी,  एक कलाकार होत्या. ‘माझ्या घरी, स्त्री पुरुषांत कधी भेद भाव नव्हता’ झाहा म्हणतात.

हेयदर अलीयेव सेंटर, बाकू, अझरबैजान

बालपणी झाहाचे वडील त्यांना दक्षिण इराकमधील प्राचीन सुमेरियन शहरांमध्ये नेत, तेव्हा
त्यांच्यात  वास्तुकलेची आवड निर्माण झाली असे झाहा सांगतात. १९६० च्या दशकात त्यांनी इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हुशार आणि महत्त्वाकांक्षी हदीदने त्यानंतर बेरूतच्या अमेरिकन विद्यापीठातून गणिताचे शिक्षण घेतले. आर्किटेक्चरल असोसिएशन (एए) स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये अभ्यास करण्यासाठी हदीद १९७२ मध्ये लंडनला गेल्या. तिथे रेम कूल्हास, इलिया झेंघेलिस आणि बर्नार्ड शूमी या दिग्गज वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली झाहा शिकल्या. झेंघेलिसने झाहाचे ‘आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट शिष्य’ असे वर्णन केले आहे. ‘आम्ही तिला 89 अंशांचा शोधक म्हणत. झाहा 90 अंशांवर काहीच करत नसत.’

हदीदला १९७७ मध्ये विशेष डिप्लोमा पुरस्कारासह, आर्किटेक्चरची पदवी मिळाली. त्यानंतर रेम कूल्हास व इलिया झेंघेलिस यांनी  स्थापन केलेल्या ऑफिस ऑफ मेट्रोपॉलिटन आर्किटेक्चर, ओएमए, साठी काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. १९८० साली त्यांनी लंडनमध्ये स्वत: ची आर्किटेक्चरल फर्म ‘झाहा हदीद आर्किटेक्ट्स’ उघडली.

मेसनर माउंटन म्युझियम

हदीदच्या वक्र आकाराच्या, तीक्ष्ण कोन असणाऱ्या आणि स्टील-कंक्रीट पासून बनलेल्या ईमारतींनी जरी आता आर्किटेक्चर क्षेत्रात कायमस्वरुपी कीर्ती उमटविली असली, तरी सुरुवातीचे अनेक वर्ष त्यांना नकाराला सामोरे जावे लागले. जणू काही समाज त्यांच्या निर्मितींसाठी तयारच नव्हता. १९८३ मध्ये हदीदने,  दी पीक,  हाँगकाँग मधील विरंगुळा व मनोरंजन केंद्रा साठीच्या डिजाईन स्पर्धेत विजय मिळवून आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त केली.

झाहा म्हणतात ‘दहा वर्षांची असल्यापासून मी मजेदार कपडे परिधान करत, विचित्र गोष्टी बोलत. मी मुद्दाम अपमानकारक वागत असे नाही, मी तशीच होते. लोकांच्या विचारसरणीशी जुळवून घेणे मला कधीच जमले नाही, प्रयत्न देखील केला नाही.आपण समाजाशीअनुरुप नसल्यास नेहमीच पूर्वग्रह आणि शिक्षा मिळते, कारण प्रत्येकाला तुम्हाला कंसात घालायचे असते. सर्वांनी एकाच साच्यातून बाहेर यावे अशी लोकांची इच्छा असते, मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि इमारतीच्या बाबतीतही तेच आहे; प्रत्येक इमारत एकसारखी असावी असे लोकांना वाटते, आणि जर आपण असे नाही करायचे ठरविले तर आपल्याला वधस्तंभावर चढवले जाते.’

हदीद ‘वक्र रेषांची राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्याचे वक्र रेषेवर प्रभुत्व  होते; आर्किटेक्चरल भूमितीला त्यांनी वेगळेच स्वातंत्र्य दिले ज्यामुळे आर्किटेक्चरला संपूर्ण नवी, अभिव्यक्तीपूर्ण ओळख मिळाली. जागतिक पातळीवर आर्किटेक्चर फील्डला आकार देऊन दिशा देण्यात हदीदचे मोठे योगदान आहे.

लंडन अ‍ॅक्वाटिक्स सेंटर

शिक्षण क्षेत्रात, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी, शिकागो येथील इलिनॉय युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, हॅम्बर्गमधील व्हिज्युअल आर्ट्स युनिव्हर्सिटी आणि अप्लाइड आर्ट्स युनिव्हर्सिटी व्हिएन्ना येथे हदीदचे अतिथी प्राध्यापकाच्या भूमिकेत महत्त्वाचे योगदान आहे. ‘आर्किटेक्चरला आणखी एक पैलू आहे जो लोक विसरतात. आर्किटेक्चर आनंददायक असले पाहिजे, एखाद्या विस्मयकारक जागेत असणे आनंददायक असले पाहिजे. एक छान खोली, ती किती लहान किंवा मोठी आहे हे महत्त्वाचे नसते. लोक ऐशो आरामा बद्दल गैरसमज करतात, ऐशो आरामाचा किंमतीशी काही संबंध नाही, हे आर्किटेक्चरने केले पाहिजे -आपल्याला मोठ्या प्रमाणात लक्झरीची कल्पना द्यायला पाहीजे.’ असे झाहा म्हणत.

३१ मार्च २०१६ रोजी हदीदचा मियामीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या ६५ वर्षाच्या होत्या.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव