संगीतशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ. यासनारदी शिक्षा असेही म्हणतात. त्याचा लेखनकाल व कर्ता याविषयी मतभिन्नता असून निश्चित माहिती ज्ञात नाही. काही विद्वानांच्या मते हा ग्रंथ भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथापूर्वीचा असावा; किंवा तो इ.स.तिसऱ्या किंवा सहाव्या शतकातील असावा; या ग्रंथाचे कर्ते महर्षी नारद असून विद्वानांच्या मते नारद या पौराणिक व्यक्तीशी त्याचा काहीही संबंध नाही. शिक्षा ग्रंथ (पाणिनीय, मांडुकी, याज्ञवल्क्य आदी) हे मुख्यत: वैदिक मंत्रांच्या उच्चारणाचे व तत्संबंधीच्या व्याकरणाचे विवेचन करणारे ग्रंथ होत. नारदीय शिक्षा  या ग्रंथात वैदिक स्वरांचे सूक्ष्म पण विस्तारपूर्वक वर्णन आहे. सामवैदिक सप्तस्वर आणि संगीतातील सात षड्जादिक स्वर यांचा यात मेळ दर्शविला आहे. त्यामुळे संगीताच्या दृष्टीने अन्य शिक्षा ग्रंथांपेक्षा नारदीय शिक्षा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. हा ग्रंथ दोन प्रकरणात विभागलेला असून त्यांना प्रपाठक म्हणतात. प्रत्येक प्रपाठकाचे आठ-आठ भाग (खंडिका) असून व २३८ श्लोक आहेत.

पहिल्या प्रपाठकातील पहिल्या खंडिकेतील श्लोकात आर्चिक, गाथिक व सामिक या स्वरांची सामान्य चर्चा केली आहे. आर्चिक म्हणजे ऋक्पठनात प्रयुक्त होणारे स्वर, गाथिक म्हणजे ब्राह्मणग्रंथातील गाथा पठनास लागणारे स्वर आणि सामिक म्हणजे सामगीते गाण्यासाठी उपयुक्त स्वर होत. मंद्र सप्तकातील स्वर उरातून, मध्य सप्तकातील स्वर कंठातून व तार सप्तकातील स्वर शिरातून उत्पन्न होतात. प्रात:काली उरापासून, मध्यान्हकाली कंठातून व सायंकाली शिरातून निर्माण होणारे स्वर गायले जावेत. षड्ज हा स्वर नास (नाक), कंठ, उर (छाती), तालु (टाळु), जिव्हा (जीभ) व दात या सहा स्थानांपासून उत्पन्न होतो, अशी षड्ज या संज्ञेची व्युत्पत्ती स्पष्ट केली आहे. याच प्रकारे अन्य स्वरांची उत्पत्तिस्थाने सांगितली आहेत.

दुसऱ्या खंडिकेमध्ये सात स्वर, तीन ग्राम, एकवीस मूर्च्छना व एकोणचाळीस ताना यांची माहिती असून या समूहाला ‘स्वरमंडल’ ही संज्ञा दिली आहे. लयीसाठी वृत्ति हा शब्द वापरला असून शिकवताना विलंबित, प्रयोगामध्ये मध्य व अभ्यासासाठी दृत लयीचा उपयोग करावा असे सांगितले आहे. स्वर व देवता आणि स्वर व वर्णसंबंध याविषयीची चर्चा आहे. या खंडिकेतील सातवा श्लोक ‘स्वररागविशेषेण ग्रामरागा इति स्मृता: l (१.२-७)’ हा महत्त्वपूर्ण आहे. अशाप्रकारे ‘राग’ व ‘ग्रामराग’ या संज्ञांचा उल्लेख येथे मिळतो. राग संकल्पनेची अगदी सुरुवातीची अवस्था या ग्रंथात आढळून येते. षाडव, पंचम, मध्यम, षडजग्राम, मध्यमग्राम, कैशिकमध्यम व साधारित अशी सात ग्रामरागांची नावे, मूर्च्छनांची नावे व त्यांची स्वरलक्षणे सांगितली आहेत. नाट्यशास्त्राच्या संगीतात नारदांनी सांगितलेल्या मूर्च्छनांपैकी सात मूर्च्छना षड्जग्रामाच्या म्हणून दिल्या आहेत आणि त्या प्रसिद्धअसल्याचा उल्लेख केला आहे (१-२-१४).

तिसऱ्या खंडिकेमध्ये उत्तम गायकाची लक्षणे सांगितली आहेत. गायकाचे रक्त (रंजक), मधुर, पूर्ण, आलंकृत, प्रसन्न, व्यक्त, सुकुमार इत्यादी दहा गुण आणि शंकित, भीत, उध्दृष्ट, काकस्वर इत्यादी चौदा दोष सांगितले आहेत.

चौथ्या खंडिकेमध्ये स्वरांचे रंग व वर्ण यांचा संबंध दिला असून गांधार व निषाद यांना शूद्रत्व दिले आहे. तदनंतरच्या सात श्लोकांत शुद्ध ग्रामरागांचे वर्णन केले आहे. पुढे वेणूवर निघणाऱ्या स्वरांचा अनुक्रम सामवैदिक स्वरांची नावे देऊन दर्शविला आहे. पशुपक्षी यांच्या स्वराने (ओरडण्याने) कोणत्या स्वरांची कल्पना प्राचीन लोकांनी केली आहे, ते नमूद केले आहे. तसेच शरीरातील कोणत्या स्थानातून कोणत्या स्वराची उत्पत्ती होते ते देऊन स्वरनामांची काल्पनिक निरुक्ति दिली आहे. पुढील श्लोकांत स्वरदेवतांची माहिती आहे.

पाचव्या खंडिकेमध्ये सामस्वर व लौकिक स्वर यांचा संबंध स्पष्ट केला आहे. अनुक्रमाने हा संबंध पुढीलप्रमाणे दिला आहे : प्रथम – मध्यम, द्वितीय – गंधार, तृतीय – ऋषभ, चतुर्थ – षड्ज, पंचम (मंद्र) – धैवत, षष्ठ (कृष्ट) – निषाद, सप्तम (अतिस्वार्य) – पंचम.

सहाव्या खंडिकेमधील पहिल्या दोन श्लोकांत दारवी वीणा आणि गात्र-वीणा असे वीणेचे दोन प्रकार सांगून हाताच्या बोटांवर स्वरस्थाने कल्पून त्याच्या आधारे सामगायन केले जात असे. अशी गात्रवीणेची व्याख्या सांगितली आहे.

स्वरांप्रमाणेच मात्रा, अर्धमात्रा, द्विमात्रा इत्यादी स्वरोच्चारणाच्या कालावधीचे दिग्दर्शनही (शांत व निर्भय होऊन वर्णाचा उच्चार करणे) केले आहे.

सातव्या खंडिकेमध्ये प्रत्येक स्वरांच्या श्रुतींची संख्या व श्रुतींची नावे दिली आहेत. तसेच लघु, गुरू मात्रा, पादातील अक्षरसंख्या, मात्रासंख्या व छंद यांची चर्चा केली आहे.

आठव्या खंडिकेमध्ये सामगानाच्या क्रुष्टादी सात स्वरांची शरीरातील उत्पत्तिस्थाने सांगून गायन प्रभावी व्हावे; यासाठी देहशुद्धी, ध्यानधारणा, सदाचरण यांची आवश्यकता, अहंकार, कोप यांपासून दूर रहाणे, त्रिफळा, तूप इत्यादी पदार्थांचे सेवन करणे अशा हितकर बाबींचे सल्ले दिले आहेत.

प्राचीन संगीतातील श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी मूळ विषयांची चर्चा या शिक्षाग्रंथात थोडक्यात पण प्रथमच आली आहे, त्या दृष्टीने या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे.

संदर्भ :

  • देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, नागपूर, १९७९.
  • भट्ट,शोभाकर, श्रीनारदमुनिविरचिता सामवेदीया नारदीया शिक्षा, श्रीपीतांबरपीठ संस्कृत परिषद, दतिया, (म. प्र.), १९६४.
  • मालवीय, श्रद्धा, भारतीय संगीतज्ञ एवं संगीतग्रंथ, कनिष्क पब्लिशर्स,नई दिल्ली.
  • वर्मा, सिम्मी, प्राचीन एवं मध्यकाल के शास्त्रकारोंका संगीतमें योगदान, कनिष्क पब्लिशर्स, नई दिल्ली, २०१२.
  • The Oxford Encyclopedia of the Music of India Vol II, Sangeet Mahabharati – Oxford University Press, 2011.
  • Sreenivasrao’s blog,  http://sreenivasraos.com/tag/naradiyashiksha.

प्रतिक्रिया व्यक्त करा