बेकलँड, लिओ हेंड्रिक (१४ नोव्हेंबर, १८६३ – २३ फेब्रुवारी, १९४४)
मुळचे बेल्जियन असलेल्या परंतु अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेल्या लिओ हेन्ड्रिक बेकलँड यांचा जन्म बेल्जियममधील घेण्ट येथे झाला. त्यांचे रसायनशास्त्रातील पदवीचे शिक्षण बेल्जियममध्येच झाले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून, पीएच.डी. प्राप्त केली. तसेच अध्यापनाची सुरुवात त्यांनी तिथेच सुरू केली.
बेकलँड अमेरिकेच्या अभ्यास दौर्यावर गेलेले असताना, त्यांची कोलंबिया युनिव्हर्सिटीतील चार्ल्स एफ. चांडियर यांच्याशी भेट झाली. त्यांच्या आग्रहाखातर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तिथे त्यांनी अँथनी फोटोग्राफीक कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी केली, पुढे रसायन सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला मात्र आजारपण व आर्थिक घोटाळा यांमुळे नाउमेद होऊन, ते पुन्हा आधीच्याच कंपनीत रुजू झाले. येथेच त्यांनी वेलोक्स या कृत्रिम प्रकाशात छायाचित्र विकसित करता येणारा अनोखा कागद शोधला. त्या काळातील अमेरिकेतील आर्थिक मंदीमुळे त्यांची भागीदारीत असलेली नेपेरा ही कंपनी त्यांनी ईस्टमन कोडॅक कंपनीला विकली होती. त्या संबधात केलेल्या करारानुसार, त्यांना फोटोग्राफीक प्लेटवर २० वर्षे काम करता येणार नव्हते, म्हणून ते जर्मनीला गेले. तिथे त्यांनी इलेक्ट्रोकेमेस्ट्री या विषयाचा अभ्यास केला.
बेकलँड अमेरिकेला परतल्यानंतर त्यांनी अॅस्बेस्टॉस व लोखंडाच्या धातुपासून वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रोलाइट सेल विकसित केला ज्याचा वापर नायगारा धबधब्याजवळ उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रो केमिकल सयंत्रात केला गेला. १९०० सालाच्या सुमारास, फिनोल आणि फॉर्मेल्डिहाइड ही रसायने वापरुन सिन्थेटिक रेझीन हा बहुवारकीय (पॉलिमर) पदार्थ संश्लेषित करण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु उपयुक्त असा पदार्थ त्यातून हाती येत नव्हता. बेकलँड यांनी त्या दोन रसायनांच्या प्रक्रियेचे भिन्न स्थितीत निरीक्षण केले व बेकेलाइट या प्लास्टिकची निर्मिती केली. रेडियो, टेलिफोन, विद्युतरोधक इ.साठी उपयोगी पडणारा हा उपयुक्त पदार्थ जगभर लोकप्रिय झाला.
बेकलँड यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात १०० वेगवेगळ्या पदार्थांची एकस्वे मिळवली होती. जॉन स्कॉट मेडल, विलार्ड गिब्स अवॉर्ड, पर्किन मेडल, फ्रॅंकलिन मेडल असे पुरस्कार त्यांना लाभले. त्यांना ओहायोतील एक्रोन येथील नॅशनल इन्व्हेस्टर्स हॉल ऑफ फेममध्ये मानाचे स्थान देण्यात आले होते.
समीक्षक : अ. पां. देशपांडे