भिसे, शंकर आबाजी (२९ एप्रिल, १८६७ – ७ एप्रिल, १९३५)

भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जगन्नाथ शंकर शेठ  हायस्कूल, मुंबई येथे झाले. शंकररावांचे वडील श्री. आबाजी भिसे हे जिल्हा न्यायाधीश होते. शंकररावांना लहानपणापासूनच शास्त्रीय मासिकांचे वाचन आणि लहान-सहान प्रयोग करण्याची आवड होती. मॅट्रिक झाल्यानंतर अकाउंटट जनरलच्या कचेरीत त्यांनी कारकूनाची नोकरी केली. त्या काळात त्यांनी जादूचे शास्त्रीय प्रयोग आणि मनासंबंधी वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. विविध कलाप्रकाश या शास्त्रीय विषयाला वाहिलेल्या पहिल्या मासिकाचे संपादकपद त्यांनी भूषवले.

शंकररावांना मुंबईत सुवर्णपदक व मानपत्र देऊन प्रोफेसर हा किताब बहाल करण्यात आला. पुण्यातही उद्योगवृद्धी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. एकदा त्यांना रेल्वेने प्रवास करताना काही अडचणी आल्या. त्यावर त्यांनी विचारपूर्वक संशोधन केले आणि पुढील स्टेशनचे नामदर्शक स्वयंचलित यंत्र आणि प्रवासोपयोगी डब्याचा स्वयंचलित दरवाजा यांचे शोध लावले. त्याकाळी पुण्यामध्ये पगडया वापरत असत. त्यांनी पगडया बनविण्याचे यंत्र बनविले तसेच काच कारखानाही काढला, कागदनिर्मितीचा अभ्यास केला. १८९६ मध्ये भारतात प्लेगची साथ आली तेंव्हा मुंबई, रेवदंडा याठिकाणी धार्मिक ऐक्य साधून प्लेगच्या साथीत महत्त्वाचे मदतकार्य केले. १८९७ मध्ये आग्रा लेदर फॅक्टरीचे पुनरुज्जीवन केले. त्याचवेळी भिसे यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. लंडनमधील ‘इन्व्हेंटर्स रिव्हयू अँड सायंटिफीक रेकॅार्ड’ यांच्यातर्फे एक स्पर्धा जाहीर केली होती. चहा, मीठ, साखर इत्यादीच्या मोठ्या राशीतून आपोआप वजन करुन छोट्या राशीचे वाटप करू शकणाऱ्या यंत्राला पारितोषिक जाहीर केले. अवघ्या १४ तासात भिसे यांनी मुदतपूर्व स्वयंमापक यंत्र बनवून पारितोषिक तर मिळवलेच परंतु औद्योगिक जगात या यंत्राने खळबळ उडवून दिली आणि लंडनच्या सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्टस् या संस्थेने त्यांना सन्माननीय सभासदत्व बहाल केले. अनेक देशीपरदेशी नियतकालिके, वर्तमानपत्रे यातून या स्वयंमापन यंत्राची सचित्र माहिती, लेख, संपादकीये लिहून आली आणि भारतातील भिसे यांना नवनिर्मितीचे मोठे संशोधक म्हणून जगन्मान्यता मिळाली.

सन १८९९ ते १९०८ या कालावधीत भिसे यांनी लंडन येथील वास्तव्यात रंगीत जाहिराती एकामागून एक प्रदर्शित करणारा दिवा व यंत्रणा बनविली, मालवाहक यंत्र (Auto fisher) पिष्टमापक यंत्र (ऑटोमॅटिक वेईंग, रजिस्टरींग अँड डिलिव्हरींग मशीन) बनविले. त्याचप्रमाणे दुचाकी स्थिर ठेवणारे स्वयंचलित यंत्रही बनविले. नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, शेठ गोकूळदास अशा भारतातील अनेक नामवंत व्यक्तींशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या मैत्रीच्या आणि आर्थिक सहाय्याच्या जोरावर त्यांनी संशोधन कार्यास झोकून दिले आणि मुद्रण व्यवसायात क्रांती घडविणारे भिसे टाईप यंत्र बनविले.  तसेच टंकयंत्रातील दोष-दुरुस्ती यंत्रही बनविले. भिसे टाईप यंत्राचे त्यांनी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स अशा अनेक देशात एकस्व मिळवले. या यंत्राने त्यांचे अनेक सन्मान झाले आणि लंडनमधील यंत्र तज्ज्ञांनी भिसे यांचा भारतीय एडिसन म्हणून गौरव केला. १९०८ च्या मद्रासमधील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार झाला. त्यांचे पुण्यात ‘संशोधन कार्य आकांक्षा आणि आव्हान’ या विषयावरचे जाहीर व्याख्यान खूपच गाजले. त्यांनी मुद्रण व्यवसायात  रोटरी मल्टीपल टाईपकास्टरचा शोध लावून प्रचलित यंत्राच्या तिप्पट कार्यक्षम यंत्र बनविले. सर रतन टाटा यांच्या सहाय्याने दि टाटा-भिसे संशोधन सिंडीकेट स्थापन केले. सुधारित यंत्र निर्मितीने मुद्रण क्षेत्रात नवे युग निर्माण केले. काही कारणाने टाटा-भिसे संशोधन सिंडिकेट बंद पडल्याने त्यांनी अमेरिकेस प्रयाण केले. अमेरिकेत अनेक विषयात संशोधन करुन नवीन तंत्राचा वापर करुन आयडीयल टाईपमास्टरची निर्मिती केली व त्याचे अमेरिकेत एकस्वही मिळविले. त्यानंतर टाईप कास्टींग, लीड, रुल, मशीनचा विकास आणि विक्री या उद्देशांनुसार  दि भिसे आयडियल टाईप कास्टर कार्पोरेशन या संस्थेची स्थापना केली. भिसे यांचे संशोधन चौफेर चालूच होते. आजारपणात ज्या औषधाने गुण आला त्याच औषधावर संशोधन व सुधारणा करुन त्याचे नांव बेसेलीन असे ठेवले व त्यासाठी दि अमेरिकन बेसेलीन कार्पोरेशनची स्थापना केली. दातदुखी, पोटदुखी, मलेरिया, इन्फ्ल्यूएन्झा, पायोरिया इत्यादी रोगांवर उपयुक्त असे बेसेलीनवर संशोधन करुन त्याचे नांव आयोमिडीन ठेवले. पहिल्या महायुध्दात या औषधाने महत्त्वपूर्ण कार्य बजावले. त्यांनी विद्युत् क्षेत्रातही अनेक शोध लावले. त्यांनी विद्युतशक्तीच्या सहाय्याने वायुंचे पृथ:करण, तारेने छायाचित्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था आणि विद्युतशक्तीच्या सहाय्याने ऊर्जाशक्तीवर चालणारी मोटार बनवली. औद्योगिक रसायनशास्त्रात  रोली नामक धुलाई द्रव्याची निर्मिती त्यांनी केली.

शंकर आबाजी भिसे यांचा न्यूयॉर्कमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. त्यांना डॅाक्टर ऑफ सायन्स आणि डॅाक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदव्या बहाल करण्यात आल्या. प्रसिद्ध लोटस फिलॉसॉफी सेंटर आणि विश्वमंदिर प्रतिकृती त्यांनी बनविली. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे डिसेंबर १९३० मध्ये जागतिक शास्त्रज्ञ थॉमस एल्वा एडिसन यांच्याशी त्यांची भेट झाली व पुढे त्यांचा स्नेह देखील त्यांना लाभला.

शंकर आबाजी भिसे यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

  समीक्षक : रघुनाथ शेवाळे