सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिर्कोट) (स्थापना – १९२४)

 इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी या संस्थेने टेक्नॉलॉजीकल लॅबोरेटरी या छोट्या संशोधन संस्थेची स्थापना केली. १९६६ मध्ये ‘इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी’ बरखास्त करण्यात आली आणि प्रस्तुत प्रयोगशाळेचे नामकरण ‘कॉटन टेक्नोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ (सी.टी.आर.एल.) असे करण्यात आले.  देशातील कापूस उत्पादकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून उत्कृष्‍ट गुणवत्तेच्या कापसाची पैदास करून घ्यायची व त्या कापसाचे शास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण करून गुणवत्ता ठरवण्याचे कार्य या संस्थेने हाताळले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या फाळणीत उत्कृष्‍ट कापूस पिकविणारा जवळजवळ ४०% भाग पाकिस्तानात समाविष्ट झाला, तर बहुसंख्य सूतगिरण्या भारतात राहिल्या. त्याकाळी, जवळपास ४० लक्ष हेक्टर जमीन कापसाच्या लागवडीखाली होती व १८० किलोची एक गासडी (बेल) याप्रमाणे २२ लाख गासड्या कापूस पिकवला जात होता. १९७१-७२ साली जवळजवळ दुप्पट जमीन कापसासाठी वापरली गेली आणि उत्पादनही तिप्पट झाले. मध्यम व लांब तंतूच्या कापसाचा वापर करून तयार केलेला धागा कापसानुसार त्‍या दर्जाचा असतो. त्यामुळे कापूस आयात करण्याची विवंचना हळूहळू कमी होत गेली. १९७४-७५ मध्ये तर साडे एकाहत्तर लाख गासड्या कापूस पिकवला गेला. हा कापूस प्रामुख्याने लांब धाग्याचा असल्यामुळे कापसाच्या आयातीत घट झाली. या काळात लांब धाग्याचा २ लाख गासड्या कापूस निर्यात करण्यात आला. कापसाच्या लागवडीसाठी वापरलेल्या तंत्रामुळे सुजाता, सुविन हा कापूस तसेच हायब्रिड-४, वरलक्ष्मी, जयलक्ष्मी, जे.के.एच. सारख्या संकरित कापसाच्या लागवडीमुळे कापूस उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण होता आले व कापूस उत्पादनात आघाडी घेता आली. या सार्‍या घडामोडीत सी.टी.आर.एल. चा मोठा वाटा होता. सुरुवातीच्या काळात, कापसाचे विश्लेषण करताना तंतूचे भौतिक गुणधर्म व त्यापासून तयार केलेल्या धाग्यांची गुणवत्ता तपासली जाई. पुढे, जिनिंग (सरकीपासून तंतू वेगळे करणे), तंतूची सर्वांगीण परीक्षा व सूतकताई (तंतुपासून धागा तयार करणे – स्पिनिंग) या विषयाचा अभ्यास सुरु झाला. त्यासाठी आवश्यक ती उपकरणे निर्माण करण्यात आली. कापसाचा तंतू व धाग्यासंबधित भारतीय प्रमाण पद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी सी.टी.आऱ.एल.ने हातभार लावला होता.

इंडियन काउन्सिल ऑफ अॅंग्रिकल्चरल रिसर्च (आय.सी.ए.आर.) च्या अख्यत्‍यारित येणारी ही संस्था देशातील विविध राज्यातील शेतकी खात्याच्या सहकार्याने देशी कापसाची गुणवत्ता वाढवीत आहे. भारतीय कापसाच्या जिनिंग प्रक्रियेबाबत अभ्यास करणारी देशातील ही एकमेव संस्था आहे. तसेच कापसाच्‍या सूतकताईसाठी निरुपयोगी ठरणारे अति आखूड तंतू, कापसाच्या रोपट्याचे काही भाग आणि सरकीचा फायदेशीर वापर कसा करता येईल याविषयी तिथे संशोधन होत आहे. दरवर्षी देशाच्या विविध भागात पिकविल्या जाणार्‍या कापसाच्या हजारो नमुन्याचे शास्त्रोक्त विश्लेषण करून व त्यांची सूतकताई करून ही संस्था देशातील कापूस व्यापार उद्योगाच्या भरभराटीला हातभार लावते. तत्सबंधीचे अहवाल तयार करून ते विविध संबंधित संस्थांना, खात्यांना आणि कंपन्यांना  पुरवून उद्योगधंद्यात वाढ होण्यास हातभार लावत असते.

या संस्थेचे १९९१ साली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन (सिर्कोट) असे नवे नामकरण झाले. अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या कापसाची गुणवत्ता सहज पडताळता यावी म्हणून तिथे मायक्रोस्पिनिंग ही तांत्रिक पद्धती सुधारित केली गेली आहे. एखाद्या नव्या जातीच्या कापसाची बाजारात जाहीर घोषणा करण्यापूर्वी, तो नवनिर्मित कापूस विविध शास्त्रीय कसोट्यांतून तावून सुलाखून निघालेला असतो. त्या कापसाची लागवड, त्याची संकरित जडणघडण (जेनेटिक्स), रोपट्याचे जीवनमान (फिजिओलॉजी), तो कापूस विशिष्ट रोग जिवाणूचा भक्ष्य होतो की काय याचे रोगनिदानशास्त्र (पॅथोलॉंजी), त्याची धागा आणि वस्त्र तयार करण्यासाठीची उपयुक्तता; याचा अभ्यास करावा लागतो. अखेर, सूत गिरण्यातील पर्यावरणात त्याची गुणवत्ता तपासून पहावी लागते. या सार्‍या प्रक्रियांतून पार पडल्यानंतर, उपलब्ध कापसाच्या जातीपेक्षा काही श्रेष्‍ठ गुणधर्म जर नवीन जातीने दाखविले तरच तो कापूस बाजारात आणला जातो.

तंतुंच्या जिनिंग, परीक्षण (टेस्टिंग) व सूतकताईसोबतच त्यांच्या अंतर्गत गुणधर्माचा व धागा विणताना आवश्यक असलेल्या गुणवत्तेचा अभ्यास या संशोधन संस्थेत केला जातो. आज आपल्या देशात सहा काउंट ते एकशे वीस काउंटपर्यंतचा धागा तयार होतो. (कापसाच्‍या तंतुंपासून तयार केल्‍या जाणार्‍या धाग्याच्या तलमतेची प्राथमिक मोजदाद त्यांच्या काउंटवरुन  केली जाते. ७६७.७ मीटर (८४०यार्ड) लांबीची धाग्‍याची एकलडी (हॅन्क) असते व एक पाउंड वजनात जितक्‍या लड्या बसतील, त्या आकड्याला त्या धाग्याचा कॉटन काउंट असे संबोधतात. जेवढा काउंट जास्त तेवढा धागा तलम व मजबूत असतो. कापसाच्या धाग्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यात पॉलिएस्टरचे फिलामेंट्स मिसळून मिश्रधागा तयार करतात. सुजाता, सुविन, एम.सी.यू.-५, हायब्रिड-४ यांसारख्या कापसाच्या तंतूत पॉलिएस्टरचे फिलॅमेंट्स मिसळून तयार होणारे मिश्रधागे विविधोपयोगी असतात, हे या संस्थेने संशोधनातून दाखवून दिले. विविध प्रकल्पाद्वारे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापसचे पीक कसे वाढविता येईल, याबद्दल सिर्कोट उत्पादकांना मार्गदर्शन करते. नॅप्थेलिन, अॅसिटिक अॅसिड किवा डायअमोनिअम फॉस्फेटसारख्या रसायनांचा सौम्य प्रमाणातला फवारा मारून प्रतिकूल परिस्थितीत पीक वाढविण्यास सहाय्य करणे, रोपांचे रक्षण व्हावे म्हणून योग्य किटकनाशके सुचविणे, तसेच रोपांच्या भरघोस वाढीसाठी प्रादेशिक आवश्यकतेनुसार खतांचा तपास घेणे; हे या संस्थेच्या कार्याचे आणखी काही पैलू आहेत.

नागपूर येथे या संस्थेचे जिनिंग ट्रेनिंग सेंटर आहे. तंतूची लांबी, परिपक्वता, त्यातील स्फटिकतेचा अंश इ. भौतिक गुणधर्म शोधणे, तसेच ताग, लोकरीसारख्या नैसर्गिक तंतूंशी मिश्रण करून उपयुक्त मिश्रधागे तयार करण्यासबंधीचे संशोधन कार्य संस्थेत चालते. रंगविलेल्या तंतूंच्या अभ्यासासोबतच, ओपन-एंड-स्पिंनिंगसारख्या आधुनिक सूतकताई प्रक्रियेवर तिथे शोधकार्य  चालते. फळांचा रस पारदर्शक बनविण्याची क्षमता असलेल्या सेल्युलेज नावाच्या विकराचा ह्या संस्थेने अभ्यास केला असून, त्या विकराच्या साह्याने प्रक्रियायुक्त कापसाच्या तंतूतील पॉलिमर सेल्युलोजचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जात आहे. कपड्यावर घड्या पडू नयेत म्हणून ह्या संशोधन संस्थेत गॅमा-रेडीएशन प्रारणाचा सौम्य मारा करून पॉलिसेट ही प्रक्रिया शोधून काढली आहे. कापसाचे कपडे जळू नयेत म्हणून वस्त्राच्या अग्नी प्रतिरोधासंबंधी या संस्थेत संशोधन झाले आहे. कापसाच्या काही जातींची द्रव-शोषकता जास्त असते व त्याचा वैद्यकीय क्षेत्रात सर्जिकल कॉटन म्हणून वापर कसा करता येईल, याचाही इथे अभ्यास झाला आहे. सरकीमध्ये भरपूर प्रथिने असतात, पण त्यात गॉसिपोल नामक विषारी लवके असतात. तेव्हा विशिष्ट विकरांचा वापर सरकीपासून खाद्यतेल मिळविणे, कापसाच्या बोंडाच्या देठाची भुकटी तयार करून पुठ्ठे (पार्टीकल बोर्ड्स) तयार करणे, निरुपयोगी रोपट्यांपासून बायोगॅस निर्माण करणे इ. देखील सिर्कोटच्या यशस्‍वी संशोधनाद्वारे मिळालेली आणखी काही उत्‍पादने आहेत. अलीकडेच संस्थेने संशोधनासाठी केळे आणि नारळ यांच्या तंतूकडे लक्ष केंद्रित केले आहे. नॅनोटेक्नॉलॉजी व प्लाझ्मा टेक्नॉलॉजीचा वापर करून पर्यावरणस्‍नेही उत्पादन तयार करण्याचे तंत्रज्ञान तेथे विकसित होत आहे. याशिवाय, होतकरू तरुण मंडळींना ह्या संस्थेत कापसाशी निगडीत विविध तांत्रिक विषयावर प्रशिक्षण दिले जाते. कापूस तपासणीसाठी विश्लेषणपध्दती (टेस्ट-मेथड्स) आणि संबधित मालाविषयीची प्रमाणे (स्टॅण्‍डर्स) या संस्थेत विकसित होत असतात.

संस्‍थेचे मुख्‍यालय माटुंगा, मुंबई येथे आहे.

संदर्भ :

  • तुस्कानो, जोसेफ; संशोधन विश्वात, विद्याविकास प्रकाशन,नागपुर

समीक्षक: दिलीप हेर्लेकर