बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च अँसोसिएशन (बिट्रा) : (स्थापना – १९५४)

बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन बिट्रा या संक्षिप्त नावाने ओळखली जाते. सोसायटी नोंदणी कायदा १८६० अन्वये ह्या संस्थेची १९५४ साली नोंदणी झाली. त्यावेळी मुंबईच्या गिरणी मालकांच्या संघटनेने (बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन) पुढाकार घेतला होता. कापड उत्पादन उद्योगाच्या तांत्रिक विषयातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या ६३-६४ वर्षात खूप मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला फक्त एकत्रित कापड गिरण्यापुरती मर्यादित असलेली संस्थेची व्याप्ती नंतर विकेंद्रित यंत्रमाग, सुतगिरण्या, कापड प्रक्रिया उद्योग, मानवनिर्मित तंतू उद्योग, कापड उद्योगात वापरल्या जाणा-या यंत्रांचे उत्पादक, रंग आणि इतर रसायने उत्पादन करणारे उद्योग यांच्यापर्यंत विस्तारली आहे. एकूणच कापड उद्योगाला संशोधनाची जोड देऊन प्रगतीपथावर नेण्याचे महत्वाचे काम बिट्राने केले आहे.

साधारणपणे औद्योगिक क्षेत्रातील संशोधन व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर असले पाहिजे असे मानले जाते. त्या संशोधनाची उपयुक्तता ही त्याद्वारे मिळणा-या फायद्याशी जोडली जाते. हे प्रमाण मानून मर्यादित स्रोतांचा आणि साधनसामुग्रीचा वापर करत जास्तीत जास्त फायदा कापड उद्योगाला होईल यादृष्टीने सुरवातीपासूनच बिट्रा काम करत आली आहे. मूलभूत आणि उपयोजित संशोधन, विविध प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करणे, नाविन्यपूर्ण क्षेत्रात प्रवेश करून पर्याप्त तंत्रज्ञान विकसित करणे, त्याचबरोबर नवनवीन उपकरणे तयार करणे, कापड उद्योगातील वेगवेगळ्या विभागांचा अभ्यास करून उत्पादनाची  तसेच मनुष्यबळाची परिमाणे निश्चित करणे, आवश्यक परीक्षणे करून देणे, समस्या सोडवण्यासाठी सल्ला देणे व तोडगे शोधणे, यंत्रसामुग्री देखभालीची योग्यता तपासणे, ऊर्जा बचतीचे मार्ग शोधणे, कार्यरत व्यक्तींना प्रशिक्षण देणे, तसेच विकेंद्रित उद्योगासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित करणे इत्यादी अनेक आघाड्यांवर बिट्राने काम केले आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक उद्योग आणि शासन यांना संस्थेने तांत्रिक क्षेत्रात वेळोवेळी मदत केलेली आहे.

बिट्राचा पायलट प्लांट हे संस्थेचे एक बलस्थान मानले जाते. तिथे आवश्यक अशी यंत्रसामुग्री व परीक्षणासाठी लागणारी उपकरणे आहेत. त्यामुळे सूतकताई (स्पिनींग), विणाई (विव्हींग) आणि कापडावर करावयाच्या रासायनिक प्रक्रिया (केमिकल प्रोसेसिंग) या कापड उद्योगातील तिन्ही प्रमुख विभागांसाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाला गती देण्याचे काम ‘ बिट्रा ‘ अनेक वर्षे करत आहे. फोम प्रिंटींग ‘ हे बिट्राने विकसित केलेले तंत्रज्ञान उदाहरण म्हणून सांगता येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रॉकेल आणि पाणी यांची बचत करता आली. त्याशिवाय कापड सुकवण्याकरीता लागणा-या वाफेची बचतही साध्य करता आली. अशाच प्रकारे विविध रासायनिक प्रक्रियांची परिणामकारकता वाढवणे आणि त्या प्रक्रिया कमी खर्चात करणे याबाबतीत बिट्राने चांगले योगदान दिले आहे. कापडावर ज्वलनरोधक प्रक्रिया विकसित करण्याचे काम भारत सरकारने बिट्रावर सोपवले ही दर्जेदार कामाची पावतीच म्हणता येईल. प्लाझ्मा प्रक्रिया ही बिट्राने विकसित केलेली एक वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आहे.

आधुनिक काळातील सर्व प्रकारची तंत्रवस्त्रे (टेक्निकल टेक्सटाईल्स)  जशी भूवस्त्रे, गाळण वस्त्रे, मुखवटा तसेच अस्तराकरीता वापरली जाणारी वस्त्रे, बहुवारिकाचा लेप चढवलेली वस्त्रे, वैद्यकीय आणि मोटार उद्योगात वापरली जाणारी वस्त्रे, वाहक पट्टे, नायलॉनचे दोरखंड, मिश्र पदार्थाची उत्पादने अशा बहुआयामी वस्त्रांचे परीक्षण करण्याची क्षमता बिट्राकडे आहे.

प्रयोगशाळेतील संशोधनापुरता मर्यादित व्याप न ठेवता प्रत्यक्ष उत्पादनाला उपयुक्त अशी अनेक कामे बिट्राने केली आहेत. बदलत्या काळाबरोबर पर्यावरणस्नेही प्रक्रिया विकसित करण्यातही बिट्रा सहभागी आहे. या सर्वामुळेच संस्था राष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषकांची मानकरी ठरली आहे.

 संदर्भ :

समीक्षक : दिलीप हेर्लेकर