वूल रिसर्च असोसिएशन (स्थापना – १९६३)

लोकरीवर संशोधन करणारी वूल रिसर्च असोसिएशन ही संस्था ठाणे, महाराष्ट्र येथे आहे. लोकर गिरणी मालकांच्या इंडियन वूलन मिल फेडरेशनद्वारा या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मुंबईतील व्ही.जे.टी.आय. या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत काही दिवस काम केल्यानंतर संस्थेने वरळीतील द सिंथेटिकअँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च अॅसोसिएशन (सस्मिरा) या संस्थेत कार्यालय थाटले. संस्थेने प्रत्यक्षात १९६५ पासून कामाला सुरुवात केली. ठाणे परिसरात त्यावेळी मॉडेला, रेमंड, ध्रुव, श्रीराम यांसारख्या नामवंत लोकरी वस्त्रांच्या  गिरण्या होत्या. वास्तविक, उत्तर भारतात लोकरीचा धंदा जोमात असताना तिचे संशोधन केंद्र मुंबईत योजले गेले. कारण भारतीय सीमेलगतचा भाग असुरक्षित होता. शिवाय मुंबई हा भाग जागतिक उलाढालीच्या दृष्टीने व्यापारकेंद्र म्हणून उपयुक्त होता. १९८० साली ६८,५०० चौ. मीटर जागेत ही संस्था स्थलांतरित झाली. १९९३ साली उभारलेला प्रायोगिक प्रकल्प (पायलट प्लांट) व १९९६ साली उभारलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा अशी संस्थेची प्रगती तेथे झाली. रंग आणि रसायनांचे सर्व विश्लेषण, टेक्सटाईल उद्योगामुळे होणारे प्रदूषण, अन्न-औषधांविषयी अभ्यास यांसारखे संशोधन सुरू झाले. बदलत्या काळानुरूप संस्था नाना तर्‍हेच्या विश्लेषण करणार्‍या अत्याधुनिक उपकरणांनी नियमितपणे सुसज्ज होत गेली आहे.

या संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळांत लोकरीच्या तंतू, धागा व कापडावर भौतिक चाचण्या केल्या जातात. तंतूची लांबी, मजबूती, तलमता, रंग इत्यादी बाबी तपासून त्याची गुणवत्ता ठरविली जाते. १७ मायक्रोनपेक्षा कमी व्यास असलेला तंतू तलम मानला जातो, तर ७० मायक्रोनपेक्षा जास्त व्यास असलेला तंतू जाडाभरडा समजला जातो. धागा जितका तलम, तितकी त्याची मजबूती जास्त व त्यावरील वळ्यांची संख्यादेखील अधिक असते. कमी तलम असलेल्या धाग्यात असलेली आतली पोकळी जास्त रुंदीची असते व त्यामुळे त्याची मजबूती कमी असते. तसेच विविध हवामानातील बाष्पानुसार तंतूच्या आकारात बादल घडून येतो. देशातल्या निरनिराळ्या भागात निर्माण  होणार्‍या लोकरीचे या संस्थेतील प्रयोगशाळेत विश्लेषण होते. तिथल्या रासायनिक चिकित्सा विभागात लोकर रंगविताना लाख, कात, झाडांची पाने या वनस्पतीजन्य घटकांचा कसा वापर होईल याबद्दल संशोधन केले जाते. भारतीय लोकरीपासून अधिक गुणवत्तेच्या जाजमासारख्या घरगुती उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठीचे संशोधन या संस्थेत होते. स्थानिक लोकरीत काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशातून आयात केलेली तलम लोकर मिसळून उत्कृष्ट दर्जाची जाजमे तयार करण्याचे संशोधन येथे झाले आहे. विशेष म्हणजे, तरुण उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, सिगारेटच्या फिल्टरमध्ये सेल्युलोज अॅसिटेटऐवजी पिवळी लोकर वापरली तर ती जास्त उपयुक्त ठरते व मरिनोच्या तलम लोकरीचा धूर शोषण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, यासंबधीचा अभ्यास येथल्या संशोधकांनी केला आहे.

लोकर रंगविणे हे एक अवघड काम असते. मेंढीपासून मिळवलेल्या नैसर्गिक लोकरीत अनेक प्रकारचे पदार्थ असतात. त्यामुळे लोकरीला पिवळसर छटा प्राप्त होते, हा पिवळसरपणा एकसारखा नसतो. परिणामी हे पदार्थ लोकरीत असताना त्याची रंगाई अवघड होऊन बसते. त्यामुळे लोकर गिरणीत आणल्यावर साबण व निर्मलकाच्या पाण्यात धुवून स्वछ करतात. त्यानंतर त्याची रंगाई केली जाते. लोकर रंगाईबाबतचा एक मोठा संशोधन प्रकल्प भारतीय शेती संशोधन परिषदेने (आय. सी. ए. आर.) वूल रिसर्च असोसिएशनकडे सोपवला. लोकरीवर  पडणारे डाग नाहीसे करणे, लोकरीपासून मेद पदार्थ मिळविणे, लोकरीच्या कापडावर घड्या पडू नयेत म्हणून स्वस्त व सोप्या रासायनिक प्रक्रिया शोधून काढणे इत्यादी संशोधन या संस्थेत चालू असते. येथल्या शास्त्रज्ञांनी लोकर थंड पाण्यात सतत रंगाई ही रंगविण्याची अभिनव आणि उपयुक्त पध्दती शोधण्याचे संशोधन केले आहे.

लोकरीविषयक प्रमाणे, चाचणी पध्दती सुधारित करणे, लोकर उत्पादनाशी निगडीत प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करणे यांसारखी कार्ये ही संस्था हाती घेत असते. आय.एस.ओ. 9000 आणि नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज (एन.ए.बी.एल.) प्रमाणपत्रांनी सन्मानित असलेली ही संस्था व तिची प्रयोगशाळा देशातील लोकर उद्योगाला  चालना देत असते.

संदर्भ:

  • तुस्कानो, जोसेफ, संशोधन विश्वात, विद्याविकास प्रकाशन, नागपूर

 समीक्षक : दिलीप हेर्लेकर