जोशी, वेणीमाधवशास्त्री बाळाचार्य : (३ जुलै १८९६-१२ सप्टेंबर, १९८७)

वेणीमाधवशास्त्री जोशी यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला. महात्मा गांधीच्या आदेशावरुन त्यांनी शिक्षकीपेशा सोडून १९१५ साली असहकार चळ्वळीत भाग घेतला. पुढे १९२६ मध्ये सातारा येथील आर्यांग्ल वैद्यक महविद्यालयात त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यासक्रमपूर्ण केला. पुढे त्यांनी याच आर्यांग्ल आयुर्वेदिक महाविद्यालयात अध्यापक व पुढे  प्राचार्यपद भूषविले. आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने मुंबईत आयुर्वेद विज्ञान मंडळ, आयुर्वेद भवन व आयुर्वेद रुग्णालय या संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि प्रधान चिकित्सक म्हणून कार्य केले. १९४३ ते १९८७ पर्यंत गिरगावात आणि दादर येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला.

वेणीमाधवशास्त्री यांनी अ‍ॅलोपथीच्या क्षेत्रातील एम.डी, एफ.आर.सी.एस पदवीधारक अशा अनेक डॉक्टरांना आयुर्वेद शिकवला. ते नागपूर विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागात पारद संस्कार संशोधन योजनेचे प्रमुख होते. पारदाच्या अष्टसंस्काराची व्यवहार्यता पडताळण्यासाठीचा तो संशोधन प्रकल्प होता.

वेणीमाधवशास्त्रींना वैद्य खडीवाले यांच्या संशोधन संस्थेने अण्णासाहेब पटवर्धन स्मॄती पुरस्काराने सन्मानित केले. धातू संकल्पना हे वेणीमाधवशास्त्रींचे वैशिष्ट्य होते. शरीरामध्ये निरनिराळे अवयव हे निरनिराळ्या धातुघटकांच्या बव्हंशी सारत्वाने निर्माण होतात. शरीरातील रसादी सप्तधातू घटकांवरच शरीरधारणेची तसेच शारीर धातुघटकांच्या पोषणाची जबाबदारी असते त्यामुळे हे अवयव वर्ण, आकार, बल यांनी तर युक्त असतातच शिवाय वातादी दोषांच्या आक्रमणापासून सुरक्षित असतात. त्यांचा प्रतिकार ते करु शकतात. म्हणून व्याधीची चिकित्सा करताना केवळ वातादी दोषांचा विचार न करता दूषित झालेले अवयव कोणत्या धातुघटकांनी उत्पन्न झालेले आहेत याचा विचार त्यांनी केला. त्यांच्या चिकित्सेत चाळीशीनंतरच्या रुग्णात वृष्य व रसायनचिकित्सा करण्याला ते प्राधान्य देत असत. चाळीशीनंतर हळूहळू वातदोषाचा प्रकोप होत जातो. त्यामुळॆ शुक्रधातू, मज्जाधातू, अस्थिधातू हळूहळू क्षीण होत जातात. परिणामी शरीराची जननशक्ती कमी होते. त्यामुळॆ व्याधीचा प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता कमी होते. शरीराचे जननसामर्थ्य सक्षम करण्यासाठी वृष्य व रसायनचिकित्सा केली असता शरीराची व्याधी प्रतिकारक्षमता पुनश्च प्राकृत होते. वेणीमाधवशास्त्रींनी सूक्ष्म बीजरुप घर्षणशास्त्र चिकित्सापद्धती प्रस्थापित केली. रेशमी वस्त्र किंवा लोकरीच्या वस्त्राच्या सहाय्याने लाकडाच्या आसनावर बसून त्वचेवर घर्षण करणे. असे घर्षण केल्यामुळॆ उष्णता निर्माण होऊन त्वचेतील भ्राजकपित्त प्रदीप्त होते परिणामतः रस-रक्तप्रवाह सक्षम होऊन शरीरातील प्रतिकारशक्ती वर्धित होते.

मूलभूत औषधी द्रव्यापासून त्यांनी उत्कृष्ट औषधनिर्मिती केली. समुद्रात सापडलेल्या रक्तवर्णाच्या शिंपल्याची भस्मे करुन यकृत, प्लीहा वृद्धीमध्ये तसेच रक्तगत कर्करोग, काविळ आणि पाण्डु या व्याधींमध्ये उपयोग केला. प्रत्येक औषध चांगले खलून, सूक्ष्म करुन, योग्य त्या अनुपानातून, योग्य त्या कालात, सेवन करण्याचा आग्रह ते करीत असत. पंचकर्म चिकित्सेत विरेचन, मात्रा, बस्ती, जळवांद्वारे रक्तमोक्षण, प्रधमन नस्य, व लंघन या कर्मांवर त्यांचा पूर्ण भर होता.

गणेशपुरी येथे १९६२ साली ब्रह्मीभूत स्वामी मुक्तानंद महाराजांच्या आश्रमात कायाकल्पाचा (रसायनचिकित्सा) उपक्रम त्यांनी व इतर वैद्यांच्या मदतीने घडवून आणला.

वेणीमाधवशास्त्री मराठी विश्वकोशाच्या आयुर्वेदिय विभागाचे प्रमुख संपादक होते (१९६५), तसेच १९६८ साली ते आयुर्वेदिय महाशब्दकोशाचे प्रमुख संपादक होते. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक लेख लिहिले व ग्रंथनिर्मिती केली. वनस्पती गुणकर्म या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले.

वेणीमाधवशास्त्री अहमदनगर येथे भरलेल्या महाराष्ट्र प्रांतीय वैद्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आयुर्वेद व युनानी सिस्टीम ऑफ मेडिसीनचे सभासद होते आणि शुद्ध आयुर्वेद पाठ्यक्रम समितीचे सभासद होते. त्यांनी आयुर्वेद प्रवीण अभ्यासक्रमाची निर्मिती केली. ते निखिल भारतीय विद्यापीठाचे व मुंबई विद्यापीठ आयुर्वेद विभागाच्या परीक्षकांचे परीक्षक होते, याशिवाय मुंबई विद्यापीठातील आयुर्वेद विभागातील विविध समित्यांचे सदस्य व अध्यक्ष होते आणि आयुर्वेद सेवा संघ, नाशिक याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

संदर्भ :

  • वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी गौरविका, प्रकाशक – वैद्य स. प्र. सरदेशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार समिती, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था.

समीक्षक : आशिष फडके